FILM REVIEW. छापा- काटा

विनोदी फुल’टॉस’

काही वर्षांपूर्वी चित्रपट सृष्टीत प्रत्येक कलाकार आपल्या अभिनयाची वेगळी शैली निर्माण करून त्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करायला धडपडत असायचा. भूमिका कोणतीही असो डोळे मिटून फक्त आवाज जरी कानावर पडला तरी अभिनेता कोण असेल हे सहज ओळखता येईल अशी शब्द फेक या अभिनेत्यांची असायची. पण गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांची आवड बदलली शैलीदार अभिनयाला काट मारून नैसर्गिक अभिनय करण्यावर भर दिला जाऊ लागला आहे. पण अजूनही शैलीदार अभिनय आवडणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे आणि अशा प्रेक्षकांसाठी व्यवसायिक गणिताचा अभ्यास करून खास त्यांच्यासाठी चित्रपट लिहिले जात असतात.

मागील आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘छापा काटा‘ हा चित्रपट पाहताना तो अभिनेते मकरंद अनासपुरे यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिला गेला आहे असं वाटतं.

सिनेमाची गोष्ट: नामदेव उर्फ नाम्या ( मकरंद अनासपुरे) या चित्रपटाच्या नायकाचं वय उलटून गेलंय तरी लग्न झालेलं नाही. नाम्या ( कधीही न ऐकलेल्या) विविध योजना, विमा विकणारा एक एजंट आहे, जो रस्त्यात भेटेल त्या माणसाला गोडी गुलाबीनं ‘गिऱ्हाईक‘ बनवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतोय. वडिलांच्या मृत्यूनंतर घराची जबाबदारीचे ओझे अंगावर पडल्यावर तीन बहिणींपैकी दोन बहिणींचं लग्न लग्न लावून मोठ्या भावाचं कर्तव्य त्यानं पार पाडलंय. घरातील शेंडेफळ अर्चना (रिना मधुकर) समीरच्या (ऋतुराज फडके) प्रेमात पडली आहे, त्याच्या वडिलांना श्रीमंत घरातील सून हवी आहे. अर्चनाचं लग्न लागावं म्हणून आपण खूप श्रीमंत आहोत अशी थाप नाम्या समीरच्या वडिलांना मारतो. पहिल्यांदा बोलणी करायला जाताना एका मित्राची उधार घेऊन गाडी वेळ मारून नेतो, पण म्हणतात ना कसलही सोंग आणता येत पण पैशाचं आणता येत नाही. अर्चनाच्या लग्नासाठी गर्भश्रीमंत असल्याचा दिखावा कसा करता येईल या विचारात असतानाच एक अजब संधी नाम्याकडे चालून येते. करोडोच्या संपत्तीची एकुलती एका वारस असलेल्या हट्टी मुलीचा खोटा नवरा बनण्याची. त्याचं होतं असं की, एका खरोखरच्या गर्भश्रीमंत आजोबांना ( मोहन जोशी) त्यांच्या शनाया या नातीसाठी (तेजस्विनी लोणारी) सरळ साधा, निर्व्यसनी आणि आपल्या मातीतील जावई हवा आहे. पण शनायाचं एका शहरी मुलावर प्रेम आहे. करोडोंची संपत्ती मिळविण्यासाठी ती नाम्याला ‘कॉन्ट्रॅक्ट मॅरेज‘ करण्याची ऑफर देते. नाम्याच्या तत्वात बसत नसतानाही बहिणीच्या लग्नासाठी तो शनायाची ऑफर स्वीकारतो. शनायाला आजोबांची संपत्ती मिळते का? नाम्याच्या बहिणीचं लग्न लागतं का तसेच नाम्या आणि शनायाच्या खोट्या लग्नाचं पुढे काय होतं या प्रश्नांची उत्तरं हा सिनेमा पाहताना मिळतील.

कथानकातील गोंधळ घोटाळे, लपवाछपवी, शह काटशहाचा खेळ प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. पण अनेक अनेक प्रसंगाची पुनरावृत्ती होते. या प्रसंगांना संकलकाने कात्री लावली असती तर सिनेमाची गती आणखी वाढली असती. काही घटना एखादं नाटक चित्रित केल्यासारखे चित्रित केले आहेत. बघण्याचा कार्यक्रम, लग्नाची बोलणी… मराठी चित्रपटात वारंवार दिसणाऱ्या या प्रसंगाना मातब्बर कलाकार मंडळीनी इम्प्रोवायजेशन करून हे प्रसंग खुलवले आहेत असं जाणवतं. या सिनेमात काही उणीवा असल्या तरी सिनेमा रंजक झालाय आणि याचं बरचसं क्रेडिट या सिनेमातील अनुभवी कलाकारांना जातं. मकरंद अनासपुरे यांच्या नेहमीच्या पठडीतील ही भूमिका आहे. त्यांनी या विनोदाच्या खेळपट्टीवर सहकलाकारांच्या संवादाला फुलटॉस बॉल समजून हास्याचे षटकार ठोकले आहेत. विजय पाटकर यांचा मामा जेव्हा जेव्हा नाम्यावर संशय व्यक्त करतो तेव्हा तेव्हा कावळ्याचे ओरडणे ऐकू येतं, हे प्रसंग धमाल उडवतात. मराठवाडी बोलीभाषेतील मकरंद आणि टायमिंग सेन्स असलेले विजय पाटकर यांची जोडी पडद्यावर दिसली की हास्याचे कारंजे फुलायला लागतात. मोहन जोशी यांचा आजोबा लक्षात राहतो. तेजस्विनी लोणारी यांनी साकारलेली स्टायलिश शनाया भूमिकेला साजेशी आहे. चित्रपटात अनेक नवीन कलाकार आहेत, कॅमेरा समोर हा नवखेपणा जाणवतो. पण अनुभवी कलाकार सोबत असल्यामुळे हा नवखेपणा कमी करण्यात दिग्दर्शकाला यश मिळालं आहे.

थोडक्यात काय तर, वेगळ्या धाटणीचे, हटके चित्रपट पाहून कंटाळला असाल तर दोन घटका मनोरंजन करायला साध्या सरळ कथानकाचा छापा काटा हा विनोदी चित्रपट पाहायला हरकत नाही. हवं खिशातील नाणं टॉस करून पाहा.