Home

  • रितेश देशमुख करणार ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचे होस्टिंग

    संपूर्ण महाराष्ट्र गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता, तो क्षण आता जवळ आला असून कलर्स मराठी आणि JioCinema वर ‘बिग बॉस मराठी’ चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेळी बिग बॉस मराठीचे होस्टिंग बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. कलर्स मराठी आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर “बिग बॉस मराठी” चा व्हिडिओ शेयर केला आला असून त्यामध्ये बिग बॉसचा डोळा त्याच सोबत बॅालीवूडचा स्टयलिश हिरो आणि महाराष्ट्राचा मराठमोळा मुलगा सुपरस्टार रितेश देशमुख देखील दिसत आहे. या नव्या सिझनचे हे नवे सरप्राईज असणार असून या सिझनमध्ये  एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.


    हिंदीमधल्या अफाट यशानंतर ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. “बिग बॉस मराठी”चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला. प्रेक्षक या कार्यक्रमावर बेहद फिदा झाले. “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझनने मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जोरदार चर्चा झाली. आता त्याच ‘बिग बॅास’ मराठीच्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय. 

    बिग बॅासचे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये बिग बॅासच्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

  • कान्स मध्ये झळकला “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस”

    हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील “शोले” हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. आपल्या नावामुळेच चर्चेत असलेल्या “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच प्रतिष्ठित अशा कान्स फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये करण्यात आले. याप्रसंगी चित्रपट निर्माते शेहजाज सिप्पी,सगून वाघ यांचा सत्कार पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आणि निर्मात्या श्रीदेवी शेट्टी वाघ आणि जीत वाघ यांचा सत्कार स्वाती म्हसे I.A.S.MD महाराष्ट्र चित्रपट मंच आणि सांस्कृतिक विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या हस्ते करण्यात आला. रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या चित्रपटला मिळाला.

    राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो, सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर जीत वाघ असोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम बालकलाकार श्रीरंग महाजन अशी दमदार स्टारकास्ट असून अभिनेते आनंद इंगळे,समीर धर्माधिकारी हे पाहुण्या कलाकारच्या भूमिकेतुन आपल्या भेटीस येणार आहेत.

  • सर्वात जास्त कमाई करणाऱ्या 10 अभिनेत्यांच्या यादीत टायगर श्रॉफ, रणवीर सिंग आणि विकी कौशल यांचा समावेश

    बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करून  अनेक अभिनेते त्यांचा अभिनयाने कायम प्रेक्षकांना आपलंसं करत आले आहेत. अभिनयाची जादू दाखवून त्यांचा चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. ‘यूआरआय’, ‘वॉर’ आणि ‘पद्मावत’ यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली आहे.

    टायगर श्रॉफ -वॉर
    बॉलीवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ त्याच्या ॲक्शनर ‘वॉर’सह अव्वल स्थानावर आहे. जो 2019 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 53.35 कोटी रुपयांची ब्लॉकबस्टर ओपनिंग केली होती आणि कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर एकूण 318 कोटींचे कलेक्शन केलं.

    टायगर श्रॉफ ते रणवीर सिंग पर्यंत बॉलिवुड मध्ये सर्वात जास्त कमाई करणारे चित्रपट असलेले हे अभिनेते

    रणवीर सिंग – ‘पद्मावत’
    रणवीर सिंग स्टारर ‘पद्मावत’ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 302 कोटींच्या एकूण कलेक्शनसह हा चित्रपट 2018 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून उदयास आला.

    विकी कौशल – ‘यूआरआय’
    विकी कौशल स्टारर URI ला त्याच्या थीम आणि कथानकासाठी लोकांमध्ये प्रचंड ओळख मिळाली. या चित्रपटाने अंदाजे 245 कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे विकी कौशल हा हजारो वर्षांच्या अभिनेत्यांपैकी एक बनला आणि त्याच्या श्रेयावर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला.

    कार्तिक आर्यन – ‘भूल भुलैया 2
    ‘भूल भुलैया 2’ मध्ये प्रेक्षकांनी कार्तिक आर्यनला यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात पाहिले. प्रेक्षकांच्या गमतीशीर हाडांना गुदगुल्या करणाऱ्या या चित्रपटाने तब्बल 186 कोटींची कमाई केली आहे.

    वरूण धवन – ‘दिलवाले’
    वरुण धवनने ‘दिलवाले’मध्ये रोमान्स, कॉमेडी आणि ॲक्शन यांचे सहज मिश्रण केले. या रोम-कॉमने श्रोत्यांच्या मनाला भिडले आणि सुमारे 148 कोटी रु. कमावले.

    आता चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्यांना त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्स मध्ये बघण्यासाठी उत्सुक आहेत.

    https://www.instagram.com/p/C6_gTxCPzM_/?igsh=cGNtaXR3N2t4d2ox

  • ‘रमा राघव’चा 400 भागांचा टप्पा पार, प्रेक्षकांचे  मिळाले भरभरून प्रेम

    कलर्स मराठीवरील ‘रमा -राघव’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. ही मालिका घराघरात पोहोचली असून सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रेक्षकवर्ग या सगळ्यांवर भरभरून प्रेम करत आहेत. याच प्रेमामुळेच आज ‘रमा -राघव ’ या मालिकेने 400 भागांचा टप्पा गाठला आहे. ‘रमा- राघव’च्या  संपूर्ण टीमने सेटवर केक कापून उल्हासीतपणे हा दिवस साजरा केला .     

    या मालिकेतील रमा आणि राघव यांच्यावर प्रेक्षकांनी कायमच प्रेम केले. कधी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, तर कधी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दोघांवर अनेक संकटेही आली, मात्र त्या प्रत्येक संकटावर त्यांनी एकमेकांना साथ देत मात केली. प्रत्येक वेळी रमा राघवच्या मागे खंबीरपणे उभी राहिली.

    ‘रमा राघव’ मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर असून मालिकेत येणारे एक नवे वळण प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. रमा राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहितांनी मनावर दगड ठेऊन रमा राघवला वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा वनवास रमा राघवच्या आयुष्यात नवे वादळ आणणारा होता. त्यांच्या आयुष्यात अद्वैत दादरकर आणि वीणा जगताप या दोन नवीन पात्रांचा प्रवेश झाला आहे. रमा राघवचा सुरू झालेला हा वनवास आणि या पार्श्वभूमीवर या दोघांमुळे अजून कोणते आणि काय होईल ट्विस्ट निर्माण होईल हे  पाहाणे खूप मनोरंजनात्मक ठरेल.

    रमा आणि राघवच्या आयुष्यात आणखी काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहा ‘रमा-राघव’ , सोम – शुक्र, रात्री ९:३० वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.

  • ठाकूर अनुप सिंग साकारणार “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज”

    महाराष्ट्राचा महासिनेमा “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटाच्या भव्य यशानंतर उर्विता प्रॉडक्शन्सने भव्य आणि बिग बजेट अशा “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” या चित्रपटाची घोषणा केली होती. सुरुवातीपासूनच अत्यंत गोपनीयता पाळल्याने छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका कोण साकारणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, त्यातच श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरने ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती.  छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत पुणे येथे संस्थापक, अध्यक्ष नवनाथ पठारे पाटील यांच्या सूर्योदय प्रतिष्ठान आयोजित भव्यदिव्य अशा सोहळ्यात हजारो शिवशंभू भक्तांच्या उपस्थितीत  “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ठाकूर अनुप सिंग याने छत्रपती संभाजी महाराजांच्या अवतारात सोहळ्यामध्ये प्रवेश केला आणि हजारोंच्या गर्दीतील प्रत्येकाला शंभूराजांचे दर्शन मिळाल्याचे समाधान व अप्रूप पाहायला मिळाले. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमुळे ठाकूर अनुप सिंग छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले.

    मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज

    पोस्टरमध्ये पार्श्वभूमीला भगवान शंकराची मूर्ती व त्यांचे साधक असून त्यांच्या पुढे एका हातात भगवा झेंडा व दुसऱ्या हातात त्रिशूल घेतलेले, अंगावर वार आणि डोळ्यात धार असलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे रौद्र रूप दर्शविण्यात आलेले आहे. अतिशय नेत्रदीपक अशा या पोस्टरमुळे चित्रपट भव्य आणि ऍक्शनपॅक्ड असणार आहे असे दिसून येत आहे. आता या चित्रपटात अजून कोणकोणते कलाकार कोणत्या भूमिका साकारणार? याची उत्कंठा चित्रपट रसिकांमध्ये वाढलेली आहे.

    पुणे येथे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यात अवतरले शंभूराजे

    पुण्यात जन्म झालेला अभिनेता ठाकूर अनुप सिंग हा आकर्षक व्यक्तिमत्व आणि पिळदार शरीरयष्टीसाठी ओळखला जातो, त्याने आपल्या उत्तम अभिनयाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रामुख्याने तेलुगु आणि काही तामिळ व कन्नड चित्रपट गाजवले आहेत. त्याने सूर्या बरोबर सिंघम ३, अल्लू अर्जुन बरोबर सूर्या द सोल्जर, रवी तेजा सोबत खिलाडी, साई धरम तेज बरोबर विनर तसेच विद्युत जामवाल बरोबर कमांडो २ हा हिंदी अशा अजूनही चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या सोबतच 2013 च्या महाभारत टीव्ही मालिकेत त्याने धृतराष्ट्राची भूमिका केली होती. ठाकूर अनुप सिंग मूलतः एक बॉडीबिल्डर असल्याने आपल्या शरीराची खूप काळजी घेतो, त्याने 2015 मध्ये बँकॉक, थायलंड येथे झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व उत्तुंग आणि बलदंड होते त्यामुळे ठाकूर अनुप सिंग याने ही भूमिका साकारताना आपल्या व्यक्तिमत्वावर आणि शरीरावर विशेष मेहनत घेतली आहे.

    मराठी चित्रपटसृष्टीत बिग बजेट चित्रपट फार कमी प्रमाणात बनतात त्यापैकीच एक “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” चित्रपट आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनकार्याचा पट खूप भव्य आणि साहसी आहे त्यामुळे मोठ्या पडद्यावरसुद्धा तो भव्यदिव्यच दिसला पाहिजे असे निर्मात्यांचे ठाम मत होते त्यामुळे या चित्रपटाची निर्मितीमूल्ये ही अतिशय उच्च दर्जाची ठेवताना बजेटची चिंता न करता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर भव्य चित्रपट पाहण्याचा समृद्ध अनुभव मिळेल असा चित्रपट बनविण्यात आला आहे. 

    उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित आणि संदीप रघुनाथराव मोहितेपाटील प्रस्तुत “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” चित्रपटाचे निर्माते शेखर रघुनाथराव मोहितेपाटील, सौजन्य सूर्यकांतजी निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा आणि केतनराजे निलेशराव भोसले आहेत तर तुषार विजयराव शेलार यांनी दिग्दर्शन केले आहे तसेच कथा आणि पटकथा संदीप रघुनाथराव मोहितेपाटील आणि डॉ. सुधीर निकम यांनी लिहिली आहे. “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” हा चित्रपट दोन भागात मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून यातील पहिला भाग २०२४ मध्ये लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • अंजली पाटील आणि शारीब हाश्मी यांचा ‘मल्हार’ येतोय

    व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.  ३१ मे २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार.

    ‘मल्हार’चे पोस्टर आणि शीर्षकाची झलक पाहून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असेल ! ही कथा गुजरात प्रदेशामधील कच्छच्या ग्रामीण भागात घडत असून तीन वेगवेगळया कथा येथे घडताना दिसणार आहेत. ज्या एकमेकांशी संबंधित आहेत. पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल नक्कीच उत्सुकता निर्माण झाली असेल, याची खात्री आहे.

    कलाकार कोण ?

    ‘मल्हार’चे निर्माते प्रफुल पासड असून या चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, हृषी सक्सेना, बालकलाकार श्रीनिवास पोकळे, विनायक पोद्दार, मोहम्मद समद, अक्षता आचार्य आणि रवी झंकाल प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल कुंभार यांनी केले आहे.

    या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल कुंभार म्हणतात, “हा चित्रपट गावाकडील अनेक विषयांवर आधारित असून यात अनेक पात्रांचा समावेश आहे. प्रत्येक पात्राची एक वेगळी कथा आहे. मैत्री, प्रेम,विश्वास अशी भावनात्मक जोड प्रेक्षकांना यात बघायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा एक नवा अनुभव असेल असे म्हणायला हरकत नाही. ‘मल्हार’ला प्रेक्षक पसंती दर्शवतील याची मला खात्री आहे.”

  • ‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

    आज भारतात ‘मंजुमल बॉईज’ आणि ‘अवेशम’सारखे प्रादेशिक चित्रपट गाजत आहेत. ओटीटीवरील ‘पंचायत’, ‘फॅमिली मॅन’सारख्या वेब शो चे विषय लक्षवेधी ठरत असताना मराठी सिनेमाही मागे राहिलेला नाही. मराठीत खूप दिवसांनी फ्रेश कंटेंट असलेला एक भन्नाट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या लाल मातीचा सुगंध लाभलेला आणि शहरी भागातील प्रेक्षकांनाही धरून ठेवणारा ‘विषय हार्ड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. संगीतप्रधान कथानकाच्या जोडीला एक वेगळंच आकर्षण असलेला मराठी मातीतील रांगडा अभिनेता सुमित या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करत असून, कसलेली अभिनेत्री पर्ण पेठेने आपल्या अभिनयाच्या बळावर या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. ‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.

    बर्डबॅाय एन्टरटेन्मेंट आणि कोल्हापूर टॅाकिज याची निर्मिती असलेल्या ‘विषय हार्ड’चे निर्माते गीतांजली सर्जेराव पाटील, सर्जेराव बाबूराव पाटील आणि सुमित पाटील आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या सुमित यांनीच कथालेखनही केलं आहे. ‘चल… चल… चल… पळ… पळ… पळ…, कोण पळतंय पुढे?’ असं म्हणत ‘विषय हार्ड’चं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ग्रामीण-निमशहरी भागातील एका रस्त्यावर एका मागोमाग एक धावणारी माणसं पोस्टरवर दिसतात. त्या सर्वांच्या पुढे एक बाईक आहे. त्यावर एक तरुण आणि तरुणी आहेत. ‘पुढे रस्ता बंद आहे’, असं लिहिलेला फलक दिसतो आणि ‘विषय हार्ड’ हे शीर्षक येतं. येत्या जुलै महिन्यात डायरेक्ट थेटरमध्ये असं रांगड्या कोल्हापूरी भाषेत लिहिलं वाक्य ‘विषय हार्ड’च्या प्रदर्शनाची घोषणाही करतं. सर्वांच्या पुढे पळणाऱ्या बाईकवर बसले आहेत मुख्य भूमिकेतील पर्ण पेठे आणि सुमित… या चित्रपटाच्या निमित्ताने पर्ण आणि सुमित प्रथमच एकत्र आले असल्याने प्रेक्षकांना एका नव्या कोऱ्या जोडीची आॅनस्क्रीन केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे. पर्ण-सुमितच्या जोडीला हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.

    दिग्दर्शक सुमित यांनी दिपक भिकाजी माडकेर यांच्या साथीने चित्रपटाची पटकथा व संवादलेखन केलं आहे. नंदकुमार गोरुले, सुदर्शन खोत, साहिल कुलकर्णी, सुमित पाटील, रिषभ पाटील, विशाल सदाफुले यांनी लिहिलेल्या गीतांना साहिल कुलकर्णी यांनी संगीत दिलं आहे. स्वप्नील बांदेकर आणि विनायक सुतार यांनी कला दिग्दर्शन केलं असून, ओंकार शेटे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. वेशभूषा सायली घोरपडे यांची, तर संकलन सौरभ प्रभुदेसाई यांचं आहे. डिओपी अभिषेक शेटे आणि जय पारीख यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संदीप गावडे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. जुलैमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • “झाड” चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र

    वाढतं तापमान, काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशातच वनसंपदेच्या जपणुकीचा मुद्दा आता चित्रपटातून  मोठ्या पडद्यावर येत आहे. झाड या चित्रपटात झाडांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं असून, २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

    योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या “झाड” या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्म्स यांनी केली आहे. सचिन बन्सीधर डोईफोडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन बन्सीधर डोईफोडे यांनीच केलं आहे. गणेश मोरे आणि प्रशांत मुरकुटे सहदिग्दर्शक आहेत. सतीश सांडभोर यांनी छायांकन,  शरद ठोंबरे, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. आदर्श शिंदे आणि जान्हवी अरोरा यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. चित्रपटात डॉ. दिलीप डोईफोडे, प्रकाश धोत्रे, संदीप वायबसे, शिवलिंगआप्पा बेंबळकर,  कैलास मुंडे,  प्रल्हाद उजागरे, प्रशांत मुरकुटे, संजीवकुमार मेसवाल, जोशना नेहरकर, दुर्वास चौरे, दत्तात्रय मुंडे, देवई डोईफोडे, मच्छिंद्र डोईफोडे, प्रियंका नेहरकर, ओमकार डोईफोडे, करण डोईफोडे,  माऊली सानप, काजल डोईफोडे, पंकजा वायबसे, जान्हवी कदम, राजवी डोईफोडे, आर्यन हजारे अशी स्टारकास्ट आहे. 

    “झाड” चित्रपट २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार

    झाड वाचवण्यासाठी, झाड लावण्यासाठी आणि झाड जगवण्यासाठी केलेला संघर्ष, पर्यावरण संवर्धनाचा या देशाला दिलेला कानमंत्र असं या चित्रपटाचं आशयसूत्र आहे. आजवर चित्रपटांतून सामाजिक विषय हाताळले गेले असले, तरी पर्यावरण संवर्धन, झाडांचं जतन-संगोपन हा विषय चित्रपटातून मांडला गेल्याचं फारसं पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळे आजच्या ज्वलंत आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाची मांडणी “झाड” या चित्रपटातून कशी करण्यात आली आहे, याबाबत नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • दामोदर नाट्यगृहासाठी मराठी कलाकार आमरण उपोषणाला बसणार

    गेली अनेक महिने गाजत असलेल्या दामोदर नाट्यगृहाच्या प्रश्नावर नाटय कलाकार आक्रमक झाले आहे.  “सुधारित आराखडा सादर केल्याशिवाय नाट्यगृहाच्या तोडकामाची बंदी उठवली जाणार नाही” असे शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही आणि विधानपरिषदेत मा उदय सामंत यांनी  शासनाच्या वतीने तसे सांगितल्यानंतरही सोशल सर्विस लीगने निवडणूक आचार संहितेच्या आडून गुपचूप नाट्यगृहाचे तोडकाम सुरू केल्यामुळे दामोदर नाट्यगृहाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मा. प्रशांत दामले व  बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष मा. नीलम ताई शिर्के-सामंत यांनी यशवंतराव नाटय संकुलात  आज दि. 15 मे 2024 रोजी पत्रकार परिषद घेतली.

    विधानसभेत तोडकामाला स्थगिती दिलेली असताना सुद्धा तोडकाम केलं आहे त्याचा निषेध तीव्र निषेध प्रशांत दामले आणि नीलम शिर्के-सामंत यांनी केला. 

    या पत्रकार परिषदेत त्यांनी नाट्यगृह आरक्षण बदलावर तीव्र आक्षेप घेतला आणि खालील  मागण्या शासना पुढे ठेवल्या आहेत.

    1) नाट्यगृहाचे आणि शाळेचे बांधकाम एकाच वेळी सुरु करून एकाच वेळी संपवणे आणि हे लिखित स्वरूपात असावे.

    2) प्रस्तावित दामोदर नाट्यगृह किमान 750 आसनांचे नाट्यगृह असणे अत्यावश्यक आहे. 

    3) नाट्यगृहाचा वाढीव  FSI नाटकाशी संबंधित उपक्रमासाठीच वापरला जावा. 

    4) दामोदर नाट्यगृहाच्या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना आणि सहकारी मनोरंजन मंडळाच्या डोअर किपर्सना पूर्वीप्रमाणेच नव्या नाट्यगृहात काम मिळावे.  तोपर्यंत त्यांना पर्यायी रोजगार मिळावा.

    5) नव्या दामोदर नाट्यगृहात पूर्वीप्रमाणेच सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय/तालमीची जागा असावी. त्यासाठी प्रस्तावित आराखड्यात त्याची तशी नोंद असावी. नव्या नाट्यगृहाचे निर्माण होईपर्यंत सहकारी मनोरंजन मंडळास वापरण्यायोग्य पर्यायी जागा मिळावी. लेखी करार व्हावा.

    6) शाळा व नाट्यगृह ह्यांचे एन्ट्री गेट वेगवेगळे असावे. 

    7) नाट्यगृहाचे भाडे हे मर्यादित असावे.

    10) नाट्यगृह तळ मजल्यावरच असावे.

    ह्या सर्व मागण्यासाठी आम्ही  मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेणार आहोत. 

               दोन्ही संस्था ह्या मराठी माणसांशीच संबंधित असल्याने हा प्रश्न समोपचाराने सोडवावा हीच आमची अपेक्षा आहे. पण मुजोरपणा करून कोणी नाट्यगृहाचा घास घेऊ पाहिल, तर  दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी नाट्यपरिषद/ मराठी नाट्य कलाकार आमरण उपोषण करतील, असे वक्तव्य  प्रशांत दामले यांनी केलं.

    नीलम शिर्के -सामंत यांनी याप्रसंगी दामोदर नाट्यगृहाशी संबंधित त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या.  नमन दशावतार, शक्ती तुरे यांसारख्या ग्रामीण भागातील लोककलांचे  माहेरघर असलेल्या दामोदर नाट्यगृहात नव्या कलाकारांना हक्काचा आश्रय मिळत होता. गेली शंभर वर्ष अव्याहतपणे नाट्यकलेचा वारसा जपणाऱ्या दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ याचं अस्तित्व टिकलं पाहिजे. आणि शासनाने विधिमंडळात यावर उत्तर दिलेलं असतानाही कुणी मुजोरपणे नाट्यगृहावर हातोडा घालत असेल तर त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे…

    शासन कला आणि कलाकारांसाठी संवेदनशील आहे त्यांनी कलाकारांना न्याय द्यावा अन्यथा मीही प्रशांत दामलें सोबत आमरण उपोषण करिन अशी ग्वाही दिली. याप्रसंगी प्रशांत दामले, नीलम शिर्के-सामंत, यांच्यासह जेष्ठ कलाकार उपेंद्र दाते, मेघा घाडगे, अपेक्षा कदम,  अजित भुरे, दिलीप जाधव, परमानंद पेडणेकर, रत्नकांत जगताप, सतीश लोटके, माई मीडिया च्या शीतल करदेकर, सूरज,  गणेश तळेकर, निलांबरी खामकर, राजू तुलालवर, आधी नाट्यकर्मी तसेच सहकारी मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद तांबे, के राघव कुमार, श्रीधर चौगुले, दक्षता गीसावी, श्रावण धाटोबे, रुपेश कदम, राहुल पवार, अमोल तेली आदी पदाधिकारी तसेच डोअर किपर्स उपस्थित होते.

  • कार्मिक फिल्म्सचा ‘अरनमानाई ४’ हिंदीतही डब होणार….

    २४ मे रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

    मागील काही दिवसांपासून ‘अरनमानाई ४’ या तमिळ चित्रपटाने दक्षिणेकडे बॅाक्स ऑफीसवर अक्षरश: धुमाकूळ घालत रसिकांवर मोहिनी घातली आहे. ३ मे रोजी प्रीमियर झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. ‘अरनमानाई ४’ जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला आहे. २४ मे रोजी ‘अरनमानाई ४’ हिंदीमध्येही रिलीज होणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना थरारक अनुभव देत मंत्रमुग्ध केले असून, आता हा चित्रपट हिंदी भाषिक प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचण्यास सज्ज झाला आहे.

    ‘अरनमानाई ४’मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुंदर सी. यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं असून, खुशबू सुंदर आणि एसीएस अरुण कुमार यांच्यासह साजिद कुरैशी आणि सुशील लवानी यांनी यशस्वीपणे चित्रपट निर्मितीची धुरा सांभाळली आहे. बाक नावाच्या भयानक भूताच्या विश्वात नेणारा ‘अरनमानाई ४’ पूर्व भारतीय लोककथांच्या सफरीवर नेणारा आहे. तमिळनाडूच्या कोवूरमधील रहस्यमय पार्श्वभूमीवर आधारलेला हा चित्रपट कुटुंबातील चांगल्या आणि वाईट शक्तींमधील संघर्षाचे चित्रणही करतो.

    कलाकार कोण

    आजची सर्वात मोठी पॅन इंडिया स्टार असलेली तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना या दोन तगड्या अभिनेत्री यात मुख्य भूमिकेत आहेत. थरारक अनुभव देणारा दोघींचा अभिनय अखेरपर्यंत खिळवून ठेवणारा आहे. ई. कृष्णसामी यांची सिनेमॅटोग्राफी आणि हिप-हॉप तमिझाद्वारे तयार केलेल्या हळूवार साउंडट्रॅकमुळे चित्रपटातील रहस्यमय वातावरण अधिकच गडद बनते. या चित्रपटातील प्रत्येक दृश्याला रोमांचक वातावरणाची किनार जोडण्यात आली आहे.

    दहा दिवसात ६६ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय करणाऱ्या ‘अरनमानाई ४’ या चित्रपटाने केवळ व्यावसायिक पातळीवर यश संपादन केले नसून, भारतीय सिनेमाच्या कथाकथन क्षमतेच्या कक्षाही रुंदावण्याचे काम केले आहे. रहस्य, हास्य आणि उत्साहाचा एकत्रित अनुभव देणाऱ्या या ब्लॅाकबस्टर चित्रपटाचा आनंद जगभरातील प्रेक्षकांना लुटता यावा यासाठी कार्मिक फिल्म्सने ‘अरनमानाई ४’ हिंदीत डब करण्यात आला आहे. अनोख्या आणि शक्तिशाली कथा सिल्व्हर स्क्रीनवर आणण्यासाठी कार्मिक फिल्म्स ही निर्मितीसंस्था ओळखली जाते.

    २४ मे रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन ‘अरनमानाई ४’ पाहायला विसरू नका. मोठे डाव आणि अशांत आत्मे असलेल्या एका अलौकिक प्रवासासाठी सज्ज व्हा.