
-
Much-Acclaimed Marathi Film ‘Khalid Ke Shivaji’ Now Streaming on OTT Platforms

Film Now Available on Major OTT Platforms
After receiving widespread appreciation from audiences and critics during its theatrical run, the acclaimed Marathi film Khalid Ke Shivaji is now streaming worldwide on Apple TV, BookMyShow Stream, and YouTube Movies.
A Story Inspired by the Ideals of Chhatrapati Shivaji Maharaj
Presented by PP Cine Production, Khalid Ke Shivaji is an emotionally powerful film inspired by the timeless values of Chhatrapati Shivaji Maharaj. Through a sensitive and thought-provoking narrative, the film promotes humanity, equality, justice, and social harmony.
Powerful Cast and Creative Team
The film stars Priyadarshan Jadhav, Bharat Ganeshpure, Sushama Deshpande, Kailas Waghmare, Snehalata Tagde, and Krish More, who delivers a remarkable performance in the title role. Directed by Raj Pritam More, written by Kailas Waghmare, and produced by Michael Thevar and Sushama Thevar, the film has earned praise for its meaningful storytelling.
Director Raj Pritam More on the OTT Release

Expressing his happiness, director Raj Pritam More said that Khalid Ke Shivaji is his first Marathi feature film and represents nearly three years of dedication and hard work. He thanked producer Michael Thevar, the entire team, and the people of Akola for their support, adding that he is delighted the film is now reaching audiences worldwide through OTT platforms.
A Child’s Journey Towards Humanity and Equality
According to the director, the film tells the story of an innocent boy named Khalid who unknowingly becomes a victim of a flawed social system. As he searches for answers, he encounters discrimination based on caste, religion, gender, community, and ethnicity. Through a child’s perspective, the film encourages equality, humanity, and mutual respect.
Producer Michael Thevar’s Vision
Producer Michael Thevar said that society today needs stories that bring people together. Through Khalid’s innocent perspective, audiences discover the true meaning of Chhatrapati Shivaji Maharaj’s ideals. He believes the film conveys the powerful message that humanity stands above religion, caste, and all social divisions.
A Unique Story with a Powerful Message
The story revolves around a young Muslim boy named Khalid, who is mocked at school by being called “Afzal Khan.” Disturbed by the prejudice he faces, he embarks on a journey that ultimately leads him to the teachings and life values of Chhatrapati Shivaji Maharaj, helping him understand justice, compassion, and true leadership.
A Timely Narrative
Set against the backdrop of increasing religious and social polarization, the film’s unique premise—a Muslim child discovering the philosophy of Chhatrapati Shivaji Maharaj—has deeply resonated with audiences for its message of unity and harmony.
International and National Recognition
Khalid Ke Shivaji has received prestigious recognition by being officially selected for the Marché du Film at the Cannes Film Festival. It was also selected for the IFFI Indian Panorama, Goa 2025, and the India Focus Special Screening section at the Ajanta-Ellora International Film Festival.
Celebrating Vidarbha’s Culture
Shot across Akola, Amravati, and Nagpur, the film beautifully captures the authenticity of Vidarbha’s culture and the charm of the Varhadi dialect. It also provides a platform for several talented local artists from the region.
Now Streaming Worldwide
For viewers who missed the theatrical release—or wish to revisit this inspiring story—Khalid Ke Shivaji is now available on Apple TV, BookMyShow Stream, and YouTube Movies, offering a meaningful cinematic experience that celebrates humanity, equality, and the enduring ideals of Chhatrapati Shivaji Maharaj.
-
वारीशी आणखी घट्ट झालेलं नातं; रिंकू राजगुरूचं पहिलं विठ्ठलभक्तीपर अल्बम गीत ‘बाप विठुराया’ आज प्रदर्शित

मुंबई : पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढी वारीचे वेध लागतात. विठ्ठलनामाच्या गजरात लाखो वारकरी पंढरीकडे मार्गस्थ होत असताना आता अभिनेत्री रिंकू राजगुरूही आपल्या चाहत्यांसाठी एक खास भक्तिमय भेट घेऊन आली आहे. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी रिंकूचे वारीतील फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्या फोटोंमागे नेमकं काय सरप्राइज दडलं आहे, याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. आता त्या चर्चांवर पडदा पडला असून सारेगम मराठीच्या नव्या वारी विशेष गीतातून रिंकूचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘बाप विठुराया’मधून रिंकूचा नवा प्रवास
सारेगम मराठीच्या आगामी वारी स्पेशल गाण्याचं नाव ‘बाप विठुराया’ असून या गाण्यात रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. गाण्याची छोटी झलक सोशल मीडियावर प्रदर्शित होताच चाहत्यांमध्ये या गीताविषयी उत्सुकता वाढली आहे. भक्तिरस, वारीची परंपरा आणि विठ्ठलावरील श्रद्धा यांचा सुंदर संगम या गाण्यात पाहायला मिळणार आहे.
अजय गोगावले यांच्या आवाजाची भक्तिमय जादू

‘बाप विठुराया’ या गीताला प्रसिद्ध गायक अजय गोगावले यांचा दमदार आणि भावपूर्ण आवाज लाभला आहे. भक्तिगीतांच्या सादरीकरणातील त्यांच्या खास शैलीमुळे या गीताला आणखी भावनिक उंची मिळाली आहे. अनेक वर्षांनंतर रिंकू आणि अजय गोगावले पुन्हा एकत्र काम करत असल्याने या गाण्याबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.
‘वारी आणि माझं नातं अजून घट्ट झालं’ – रिंकू राजगुरू

या गाण्याविषयी बोलताना रिंकू राजगुरू म्हणाली, “माझं पहिलं अल्बम गीत विठ्ठलावर चित्रीत होत आहे, याचा मला खूप आनंद आहे. माझं आणि विठ्ठलाचं नातं खूप जुनं आहे. विठ्ठलावर माझी अपार श्रद्धा आहे. तो माझ्या प्रत्येक क्षणी माझ्यासोबत असतो. मी त्याच्याशी मनमोकळ्या गप्पाही मारते. विठ्ठल हा माझ्या आयुष्यातील अत्यंत हळवा आणि जवळचा भाग आहे. त्यामुळे हे गाणं करण्याची संधी मिळणं, हे त्याच्याच इच्छेने घडलं असावं असं मला वाटतं. आजवर मी कधीही अल्बम गीत केलं नव्हतं, कारण माझी काम निवडण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. पण हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. अजय गोगावले यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आणि सारेगम मराठीसोबतही काम करता आलं, याचाही आनंद आहे. माझं हे पहिलंच अल्बम गीत असल्यामुळे ते माझ्या मनाच्या खूप जवळचं आहे. प्रेक्षकांनाही ते तितकंच आवडेल, अशी आशा आहे.”
रिंकूचा कधीही न पाहिलेला लुक

या गीतातून रिंकू राजगुरूचा आतापर्यंत कधीही न पाहिलेला, साधा, सात्त्विक आणि आकर्षक लुक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वारीची परंपरा, विठ्ठलभक्ती आणि मराठी संस्कृतीचं सौंदर्य या गाण्यातून अनुभवायला मिळणार असून रिंकूसाठीही हा अनुभव अत्यंत खास ठरला आहे.
आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला ‘बाप विठुराया’
रिंकू राजगुरूच्या पहिल्या अल्बम गीताची उत्सुकता आता अखेर संपली आहे. ११ जुलै रोजी ‘बाप विठुराया’ हे गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून विठ्ठलभक्तीचा हा सुरेल प्रवास रसिकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-
मराठी रसिकांची ‘घबाडकुंड’ला दमदार साथ; दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस ८.१० कोटींची कमाई

तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर दिमाखदार घोडदौड कायम
मराठी, हिंदी आणि हॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित असतानाही ‘घबाडकुंड’ या रहस्य, थरार आणि भयपटाने प्रेक्षकांची पहिली पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी नोंदवली आहे. वेगळ्या आशयामुळे या चित्रपटाला सर्व स्तरांतील प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुलचे फलक झळकत आहेत.
मोठ्या स्पर्धेतही ‘घबाडकुंड’ची वेगळी छाप
‘राजा शिवाजी’, ‘तुंबाडची मंजुळा’, ‘देऊळ बंद २’ या मराठी चित्रपटांसोबतच बॉलिवूडमधील ‘कॉकटेल’, ‘में वापस आऊंगा’, ‘वेलकम टू द जंगल’ आणि हॉलिवूडमधील ‘द ओडिसी’, ‘स्पायडर-मॅन’ तसेच ‘ऑब्सेशन’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांची स्पर्धा असतानाही **’घबाडकुंड’**ने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. दमदार कथा आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर चित्रपटाने प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली आहे.
दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस ८.१० कोटींचा टप्पा
दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस **’घबाडकुंड’**ने बॉक्स ऑफिसवर तब्बल ८.१० कोटी रुपयांची कमाई करत यशाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. आता तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची यशस्वी वाटचाल सुरू असून, प्रेक्षकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस अधिक मजबूत होताना दिसत आहे.
प्रभावी कथानक आणि तांत्रिक बाजूचं कौतुक
चित्रपटातील प्रभावी लेखन, दिग्दर्शन, कलाकारांचा दमदार अभिनय, उत्कंठावर्धक संवाद, पार्श्वसंगीत, उत्कृष्ट छायांकन आणि तांत्रिक मांडणी या सर्वच बाबींचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही **’घबाडकुंड’**ची जोरदार चर्चा रंगली असून, सकारात्मक प्रतिक्रिया आणि वर्ड ऑफ माऊथमुळे नव्या प्रेक्षकांची उत्सुकता सातत्याने वाढत आहे.
वाढले शो, आगाऊ बुकिंगलाही प्रतिसाद
पहिल्या आठवड्यापासून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर अनेक चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचे शो वाढवण्यात आले आहेत. कुटुंबासह, मित्रमंडळींसोबत आणि ग्रुप बुकिंगद्वारे मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळत आहेत. विविध तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवरही चित्रपटाला उत्कृष्ट रेटिंग मिळत असून, यशाची ही घोडदौड कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
मराठी चित्रपटांवरील प्रेक्षकांचा वाढता विश्वास
‘आयकॉन द स्टाईल’ प्रस्तुत, निर्माते डॉ. रसिक कदम आणि दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांचा ‘घबाडकुंड’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. रहस्य, थरार आणि भयाचा वेगळा अनुभव देणाऱ्या या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद हा केवळ एका चित्रपटाच्या यशापुरता मर्यादित नसून, दर्जेदार मराठी चित्रपटांवर प्रेक्षकांचा वाढता विश्वास अधोरेखित करणारा आहे. तिसऱ्या आठवड्यातही **’घबाडकुंड’**ची यशस्वी घोडदौड कायम राहील, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.
-
‘आऊट ऑफ सिलॅबस – पुस्तकांच्या पलीकडे’च्या भव्य प्रीमियर सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष; चित्रपटाच्या टीमसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची हजेरी

चित्रपटसृष्टी, उद्योग, समाजकारण आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
तरुणाईचा संघर्ष, शिक्षण व्यवस्थेतील वास्तव आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा आगामी मराठी चित्रपट ‘आऊट ऑफ सिलॅबस – पुस्तकांच्या पलीकडे’ याचा भव्य विशेष प्रीमियर शो नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्याकडे चित्रपटसृष्टीसह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि उद्योग क्षेत्राचे विशेष लक्ष लागले होते. चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.
प्रेरणादायी आशय असलेला चित्रपट

Adu-Tishu Production & Music प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि चित्रपट निर्माते डॉ. सुगत ग्यानेश्वर वाघमारे यांनी केली असून, आमदार डॉ. संजय कुटे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन नवीन देशबोनिया यांनी केले असून, कथा आणि लेखन अनिकेत रामचंद्र कोरडे यांचे आहे. संकलनाची जबाबदारी अनिल विठ्ठल थोरात यांनी सांभाळली आहे.
पुस्तकांच्या चौकटीपलीकडे जाऊन आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारा हा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
कलाकारांनी शेअर केले चित्रीकरणाचे अनुभव

या खास प्रीमियर सोहळ्याला चित्रपटातील अजिंक्य राऊत, अद्वयी वाघमारे, शेषपाल गनवीर, अभिजित रामचंद्र आणि सानिका थोरसकर हे कलाकार उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत चित्रपटाच्या निर्मितीमागील अनुभव आणि आठवणी शेअर केल्या.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
या विशेष सोहळ्याला National Stock Exchangeचे Managing Director आणि CEO आशिष चौहान यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच आमदार डॉ. संजय कुटे (जळगाव जामोद), रणधीर सावरकर (अकोला पूर्व), हरीश पिंपळे (मूर्तीजापूर), नारायण कुचे (बदनापूर), किसन वानखडे (उमरखेड), वसंत खंडेलवाल (विधान परिषद सदस्य), हेमंत पाटील (नांदेड) आणि श्वेता महाले (चिखली) यांच्यासह चित्रपटसृष्टी, राजकारण, समाजकारण, उद्योग आणि विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे हा प्रीमियर एक भव्य, दिमाखदार आणि संस्मरणीय सोहळा ठरला.
प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाची जोरदार चर्चा
समाजाभिमुख आशय, प्रेरणादायी कथा आणि तरुणांना नवी दिशा देणारा संदेश यामुळे ‘आऊट ऑफ सिलॅबस – पुस्तकांच्या पलीकडे’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय ठरला आहे. प्रीमियरला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तरुणाईसह सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या मनात हा चित्रपट नक्कीच स्थान निर्माण करेल, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला.
-
मनाला भिडणाऱ्या ‘तुला पाहता’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच

१९७१ आणि २०२६ मधील दोन प्रेमकहाण्यांचा भावस्पर्शी प्रवास १० जुलैपासून मोठ्या पडद्यावर
आजवर अनेक प्रेमकथा पडद्यावर आल्या, मात्र ‘तुला पाहता’ हा चित्रपट एका नव्हे तर दोन वेगवेगळ्या काळातील प्रेमकहाण्या एकाच कथेतून उलगडणार आहे. १९७१ आणि २०२६ या दोन कालखंडांतील दोन प्रेमप्रवास प्रेक्षकांना या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते मुश्ताफ खान यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्याला सिनेपोलिसचे हेड ऑफ डिपार्टमेंट – प्रोग्रामिंग अँड डिस्ट्रिब्युशन मयांक श्रॉफ, अभिनेते सुशांत शेलार आणि चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
१० जुलैला मराठी आणि हिंदी भाषेत जागतिक प्रदर्शित
ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. पहिल्याच चित्रपटात निर्माती, लेखिका आणि दिग्दर्शिका अशा तिहेरी भूमिकेत त्यांनी काम केले आहे. १० जुलै रोजी हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे.
तगडी तांत्रिक बाजू आणि दमदार कलाकारांची फळी

चित्रपटाचे छायांकन पुष्कर झोटिंग, ध्वनिआरेखन रोहित प्रधान, संगीत दिग्दर्शन रोहन प्रधान आणि रोहन गोखले, तर नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे यांनी केले आहे.
चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे यांच्यासह नचिकेत लेले, मानसी पाटील, निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजाणे आणि आकाश शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नव्या आणि अनुभवी कलाकारांच्या अभिनयाचा सुरेख संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
‘चित्रपटाचा ट्रेलर मनाला भावणारा’ – मुश्ताफ खान
ट्रेलर लाँच सोहळ्यात बोलताना अभिनेते मुश्ताफ खान म्हणाले, “‘तुला पाहता’ हे चित्रपटाचं शीर्षक मला खूप आवडलं. चित्रपटाचा ट्रेलर अतिशय सुंदर आणि मनाला भावणारा आहे. या चित्रपटाला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.”
दोन काळ… दोन प्रेमकथा… एक भावनिक प्रवास
चित्रपटाच्या कथानकात ऐन तारुण्यात प्रेमात आकंठ बुडालेला एक तरुण अचानक आपल्या प्रेयसीच्या आयुष्यातून निघून जातो. अनेक वर्षांनंतर तो निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून पुन्हा तिच्यासमोर उभा राहतो. त्याच्या अचानक परतण्याने तिच्या आयुष्यात कोणते भावनिक वादळ निर्माण होते, याची हळवी कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
याचबरोबर २०२६ मधील एका तरुण जोडप्याची आधुनिक प्रेमकथाही चित्रपटात समांतरपणे उलगडते. प्रेम, नातेसंबंध, एकत्र कुटुंब व्यवस्था, आठवणी आणि आयुष्याचे बदलते प्रवाह अशा अनेक भावनिक पैलूंना स्पर्श करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणार आहे.
टीझर आणि गाण्यांनंतर ट्रेलरलाही उत्स्फूर्त प्रतिसाद
चित्रपटाच्या टीझरला आणि गाण्यांना सोशल मीडियावर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. संवेदनशील लेखन, मनाला भिडणारं संगीत, प्रभावी अभिनय आणि भावनिक कथानकामुळे ‘तुला पाहता’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करेल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.
१० जुलैपासून मराठी आणि हिंदी भाषांमध्ये जगभर प्रदर्शित होणारा ‘तुला पाहता’ हा चित्रपट प्रेक्षकांना प्रेम, नाती आणि आठवणींचा एक सुंदर भावविश्व अनुभवायला देणार आहे.
-
पावसाच्या साक्षीने रंगला ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि ‘सनई चौघडे’मधील खास वटपौर्णिमा सोहळा

समर-स्वानंदीच्या प्रेमाला मिळणार नवं वळण, तर ‘सनई चौघडे’मध्ये संकटाची चाहूल

पावसाळ्याच्या आगमनासोबत महाराष्ट्रात सण-उत्सवांची चाहूल लागते. त्यातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. यंदा झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि ‘सनई चौघडे’ या मालिकांमध्येही वटपौर्णिमेचा सोहळा विशेष पद्धतीने रंगणार असून, प्रेम, भावना आणि अनपेक्षित घडामोडींची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
समर करणार प्रेमाची कबुली?

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत समर आणि स्वानंदीच्या नात्यात आता नवं वळण येणार आहे. समर स्वानंदीला मोकळ्या माळरानावर फिरायला घेऊन जातो आणि त्यानंतर एका प्लांट नर्सरीमध्ये तिच्यासाठी खास सरप्राईज ठेवतो. सुंदर फुलं आणि रोपांच्या मदतीने त्याने ‘I Love You’ असा संदेश तयार केलेला असतो. आपल्या मनातील भावना व्यक्त करत समर स्वानंदीच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत असतो.
दोघे मिळून वृक्षारोपणही करतात. मात्र स्वानंदीने अद्याप प्रेमाची कबुली दिलेली नसल्यामुळे समर तिला म्हणतो, “जर आपल्या नात्यात तसं काही नसेल, तर वटपौर्णिमेची पूजा करू नका.” त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी समर येणार की नाही, याची चिंता स्वानंदीला सतावत असते. पण तिला एक सुखद धक्का बसतो. समर आधीच वडाच्या झाडाजवळ उपस्थित राहून इतर महिलांसोबत पूजा करत असतो. या क्षणानंतर स्वानंदी आपल्या प्रेमाची कबुली देणार का? दोघांच्या नात्याची नवी सुरुवात होणार का? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
पावसात शूटिंगचा अविस्मरणीय अनुभव – तेजश्री प्रधान

या विशेष भागाच्या चित्रीकरणाविषयी अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली, “प्रेक्षक ज्या प्रसंगाची आतुरतेने वाट पाहत होते, त्याच वेळी मुंबईत पहिला पाऊसही आला. त्यामुळे वटपौर्णिमेचा प्रसंग शूट करताना वातावरण अधिकच सुंदर झालं. गेले काही महिने प्रचंड उष्णतेत शूटिंग सुरू होतं. त्यामुळे पावसाचा गारवा कलाकारांसोबतच तंत्रज्ञांसाठीही खूप दिलासादायक होता.”
ती पुढे म्हणाली, “पावसात शूटिंग करताना चिखल, साड्या, इलेक्ट्रिकल उपकरणं अशा अनेक अडचणी असतात. पण यावेळी प्रत्येकजण पावसाचा आनंद घेत काम करत होता. समर आणि स्वानंदीच्या नात्याचा हा महत्त्वाचा टप्पा प्रेक्षकांच्या मनालाही नक्कीच भिडेल.”
‘सनई चौघडे’मध्ये वटपौर्णिमेसोबत संकटाची चाहूल

दुसरीकडे ‘सनई चौघडे’ मालिकेतही वटपौर्णिमेचा उत्सव आनंदात साजरा होताना दिसणार आहे. मात्र मालिकेच्या परंपरेप्रमाणे सणासुदीच्या वातावरणात एक मोठं संकटही येणार आहे. जय खानोलकर अडचणीत सापडणार असून, शर्वरी त्याला त्या संकटातून कशी बाहेर काढते, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
पावसाळ्यात शूटिंग म्हणजे मोठं आव्हान – जुई गोगरी
आसावरीची भूमिका साकारणारी जुई गोगरी म्हणाली, “पावसाळ्यात शूटिंग करणं खरंच खूप आव्हानात्मक असतं. वसईहून ठाण्याला सेटवर पोहोचण्यासाठी ट्रेन, कॅब आणि वाहतुकीच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही पावसात शूटिंग करण्याची एक वेगळीच मजा असते.”
ती पुढे म्हणाली, “पावसात रोमँटिक प्रसंग खूप सुंदर दिसतात, पण त्यामागे संपूर्ण टीमचे मोठे कष्ट असतात. मेकअप, केस, साड्या, इलेक्ट्रिकल उपकरणं आणि सततचा पाऊस यामध्ये प्रत्येक गोष्ट सांभाळावी लागते. आमच्या संपूर्ण टीमने एकमेकांची खूप काळजी घेतली. त्यामुळे हा अनुभव कायम लक्षात राहील.”
प्रेम, भावना आणि परंपरेचा सुंदर संगम

समर-स्वानंदी आणि आसावरी-गौतम यांच्या नात्यातील प्रेमळ क्षण, वटपौर्णिमेचा पारंपरिक सोहळा आणि पावसाळ्याची मनमोहक पार्श्वभूमी यामुळे झी मराठीवरील हे विशेष भाग प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहेत.
पाहायला विसरू नका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ दररोज सायंकाळी ७.३० वाजता आणि ‘सनई चौघडे’ रात्री ८.३० वाजता, फक्त झी मराठीवर.
-
MPSC च्या स्वप्नांसोबत निसर्गरक्षणाचा संघर्ष उलगडणाऱ्या ‘आऊट ऑफ सिलॅबस’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

३ जुलैपासून चित्रपटगृहात रंगणार प्रेरणादायी प्रवास
निर्माते डॉ. सुगत ग्यानेश्वर वाघमारे यांच्या अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक प्रस्तुत ‘आऊट ऑफ सिलॅबस’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पुस्तकांच्या चौकटीपलीकडे जाऊन आयुष्याचे खरे धडे शिकवणाऱ्या एका प्रेरणादायी प्रवासाची झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळत असून, चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

MPSC च्या तयारीतून सुरू होणारा आयुष्याचा खरा प्रवास
टेंबूरखेड या छोट्याशा गावातील काही तरुणांच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगत MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या या तरुणांना वाटत असतं की, पुस्तकांमध्येच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दडलं आहे. मात्र नियती त्यांच्यासमोर असा एक गंभीर विषय उभा करते, जो त्यांच्या अभ्यासक्रमात नसला तरी आयुष्याच्या खऱ्या परीक्षेचा भाग ठरतो. निसर्गसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत हे तरुण संकटांचा सामना कसा करतात, याची प्रेरणादायी आणि थरारक मांडणी या चित्रपटात करण्यात आली आहे.
अनुभवी टीमची साथ

डॉ. सुगत ग्यानेश्वर वाघमारे यांनी अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिकच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखक अनिकेत कोरडे यांच्या कथेला दिग्दर्शक नवीन देशबोनिया यांनी प्रभावीपणे पडद्यावर साकारले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सचिन मनोहरराव ढोकणे यांनी ‘एआय क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे.
संगीत, छायांकन आणि तांत्रिक बाजूही भक्कम
चित्रपटाच्या संगीताची धुरा मोहित कुलकर्णी यांनी सांभाळली असून वैशाली सामंत, अभय जोधपूरकर आणि गोपाळ गावंडे यांच्या आवाजातील गाणी चित्रपटाला अधिक भावनिक उंची देणार आहेत. मनीष केदार व्यास आणि सुधीर वड्डेली यांनी छायांकनाची जबाबदारी पार पाडली असून संकलन अनिल विठ्ठल थोरात यांनी केले आहे.
दमदार कलाकारांची फळी
चित्रपटात अजिंक्य राऊत, अद्वयी आणि शेषपाल गणवीर प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. त्यांच्यासोबत सानिका तोरस्कर, अभिजित रामचंद्र, मिलिंद शिंदे आणि कमलेश सावंत यांसारख्या अनुभवी कलाकारांच्या भूमिका चित्रपटाची ताकद वाढवणार आहेत.
टीझरनंतर ट्रेलरलाही उत्स्फूर्त प्रतिसाद
यापूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाची चर्चा आणखी रंगली आहे. तरुणाईची स्वप्ने, सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि संघर्षातून उभा राहणारा आशावाद यांचा सुंदर मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
३ जुलैपासून चित्रपटगृहात
‘आऊट ऑफ सिलॅबस’ हा चित्रपट केवळ मनोरंजन करणारा नाही, तर विचार करायला लावणारा आणि सकारात्मक प्रेरणा देणारा अनुभव ठरेल, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे. “पुस्तकांच्या पलीकडे… आयुष्याच्या खऱ्या परीक्षेची गोष्ट!” अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट येत्या ३ जुलैपासून राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकतं का? मराठी ZEE5ची नवी सीरिज ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ घेऊन येतेय एक वेगळी प्रेमकथा

२४ जूनपासून मराठी ZEE5वर होणार प्रदर्शित
प्रेम, महत्त्वाकांक्षा, सत्तासंबंध आणि आत्मसन्मान यांचा वेध घेणारी ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही नवी ओरिजिनल वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी ZEE5ने या सीरिजची घोषणा केली असून अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि जान्हवी उदय प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. दिग्दर्शक गौरव पत्की यांनी दिग्दर्शित केलेली ही सीरिज २४ जून २०२६ रोजी मराठी ZEE5वर प्रदर्शित होणार आहे.
कॉर्पोरेट जगतात फुलणाऱ्या प्रेमाची कथा
‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही कथा अनन्या आणि ऋषी या दोन महत्त्वाकांक्षी तरुण प्रोफेशनल्सभोवती फिरते. कामाच्या ठिकाणी झालेली ओळख हळूहळू मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात बदलते. समान स्वप्ने, एकमेकांविषयीचे आकर्षण आणि भावनिक जवळीक यामुळे ते प्रेमात पडतात. मात्र, ज्या कॉर्पोरेट वातावरणात व्यावसायिक मर्यादा आणि पदानुक्रम महत्त्वाचा असतो, तिथे हे नातं टिकवणं त्यांच्यासाठी मोठं आव्हान ठरतं.
कॉफी ब्रेकपासून भावनिक नात्यापर्यंतचा प्रवास
कुणाच्याही नकळत एकमेकांकडे पाहणे, कॉफी ब्रेकमधील खास क्षण, ऑफिसमधील लांबणाऱ्या गप्पा आणि रात्री उशिरापर्यंत चालणारे फोन कॉल्स यामुळे अनन्या आणि ऋषी यांच्यात एक खास नातं निर्माण होतं. मात्र दिवसेंदिवस हे प्रेम लपवणं कठीण होत जातं. कामाच्या ठिकाणच्या अपेक्षा, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या त्यांच्या नात्याची कठोर परीक्षा घेतात.
रोमान्ससोबत वास्तवाचाही वेध
वेगवान कॉर्पोरेट जीवनशैली, आधुनिक आयुष्यातील ताणतणाव आणि नात्यांमधील गुंतागुंत यांची वास्तववादी मांडणी या सीरिजमध्ये करण्यात आली आहे. प्रेमातील रोमांच, भावनिक असुरक्षितता, आत्मशोध आणि वैयक्तिक आनंदासाठी घ्यावे लागणारे कठोर निर्णय या सर्व गोष्टी कथानकाचा भाग आहेत. प्रेमासाठी मोजावी लागणारी किंमत स्वीकारण्यास अनन्या आणि ऋषी तयार आहेत का, हा प्रश्न सीरिजमध्ये उलगडत जातो.
ही प्रेमकथा वेगळी का आहे?
‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही केवळ प्रेमकथा नाही, तर दोन व्यक्तींच्या आयुष्यातील भावनिक आणि व्यावसायिक संघर्षाची कथा आहे. अनन्या आणि ऋषी यांच्यातील सहज, नैसर्गिक आणि हळूहळू फुलणारी केमिस्ट्री ही या सीरिजची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. प्रेम आणि करिअर यांच्यातील संघर्ष, आत्मसन्मान आणि वैयक्तिक मूल्ये यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न या कथेला वेगळेपण देतो.
‘आजच्या पिढीशी जोडणारी कथा’ – हेमा व्ही. आर.
झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर आणि मराठी ZEE5च्या बिझनेस हेड हेमा व्ही. आर. म्हणाल्या, “आजच्या व्यावसायिक जगाशी जवळून जोडलेली आणि वास्तववादी वाटणारी प्रेमकथा पडद्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही सीरिज केवळ प्रेमकथेपुरती मर्यादित राहत नाही, तर महत्त्वाकांक्षा, कामाच्या ठिकाणच्या मर्यादा आणि वैयक्तिक मूल्ये यांच्यातील संघर्षाचाही वेध घेते. अनेक तरुण व्यावसायिक त्यांच्या आयुष्यात ज्या द्विधा मनःस्थितीचा सामना करतात, त्याचे प्रतिबिंब या कथेत दिसेल.”
‘प्रेम आणि करिअरचा समतोल साधण्याची कथा’ – गौरव पत्की
दिग्दर्शक गौरव पत्की म्हणाले, “अनन्या आणि ऋषी यांची गोष्ट ही प्रेम आणि करिअर यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुण पिढीची कथा आहे. वेगवान कार्यसंस्कृती, शहरी जीवनातील गुंतागुंत आणि विशीतील अनिश्चितता यांचा सामना करत स्वतःचा मार्ग शोधणाऱ्या या जोडप्याची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. ही सीरिज प्रेमाच्या अपूर्ण, तरीही सुंदर रूपांचा गौरव करते.”
भूमिकांबद्दल काय म्हणाले सिद्धार्थ आणि जान्हवी?
ऋषीची भूमिका साकारणारा सिद्धार्थ मेनन म्हणाला, “ही नेहमीची प्रेमकथा नाही. व्यावसायिक मर्यादा आणि वैयक्तिक भावना यांच्यातील संघर्ष अनुभवण्याची संधी या भूमिकेमुळे मिळाली. आजच्या कार्यसंस्कृतीशी जोडलेली ही कथा प्रेक्षकांना नक्कीच आपलीशी वाटेल.”
तर अनन्याची भूमिका साकारणारी जान्हवी उदय म्हणाली, “करिअरमधील महत्त्वाकांक्षा, भावना आणि वैयक्तिक मर्यादा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक तरुणांची ही कथा आहे. अनेक आव्हानांचा सामना करत असतानाही प्रेमात असलेली दोन माणसं एकमेकांसाठी कशी विकसित होत जातात, हे या कथेत सुंदरपणे दाखवण्यात आलं आहे.”
२४ जूनपासून पाहा ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’
एक वेगळी प्रेमकथा, ताज्या दमाची जोडी, कॉर्पोरेट जगतातील वास्तव आणि भावनिक गुंतागुंत यांचा सुरेख मिलाफ असलेली ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही वेब सीरिज २४ जून २०२६ पासून मराठी ZEE5वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
जागतिक संगीत दिन विशेष: ‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं – प्राप्ती रेडकर

संगीताचा वारसा घरातूनच मिळाला
झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील ‘सावली’ हे पात्र गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तिचा मधुर आवाज, संघर्षमय प्रवास आणि भावनिक कथा यामुळे सावलीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. जागतिक संगीत दिनानिमित्त सावलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने संगीताशी असलेल्या आपल्या नात्याविषयी आणि या भूमिकेमुळे मिळालेल्या अनुभवांविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला.
प्राप्ती सांगते, “माझे बाबा प्रवीण रेडकर हे गायक आहेत. ते लाईव्ह शोज करतात. त्यामुळे संगीत आणि गायनाची आवड मला लहानपणापासूनच होती. गावी असताना बाबा आणि काकांसोबत भजनाला जायचे, तिथे गाणी गायचे आणि आजही गाते. मात्र अभिनय क्षेत्रात आल्यामुळे गायनाकडे तितकं लक्ष देता आलं नाही.”
‘सावली’मुळे संगीताच्या आणखी जवळ गेले
सावली या व्यक्तिरेखेने प्राप्तीला संगीताशी पुन्हा नव्याने जोडले. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “सावली साकारताना मी संगीताच्या आणखी जवळ गेले आहे. कारण मालिकेत सावलीला जो आवाज दिला आहे तो गायिका केतकी माटेगावकरचा आहे आणि ती माझ्या आवडत्या गायिकांपैकी एक आहे. त्यामुळे या पात्राशी आणि तिच्या संगीतप्रवासाशी मी अधिक भावनिकरित्या जोडली गेले.”
‘माझे माहेर पंढरी २.०’ गाणं ठरलं खास
मालिकेतील ‘माझे माहेर पंढरी २.०’ हे गाणं सावलीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर दाखवण्यात आलं आहे. सारंग आणि मेहेंदळे कुटुंबाला अनेक दिवसांपासून ऐकू येणारा आवाज ताराचा नसून सावलीचाच आहे, हे सत्य उघड होतं. या प्रसंगाचं चित्रीकरण करताना आलेल्या भावनिक अनुभवांविषयी प्राप्ती म्हणाली, “हे गाणं शूट करताना मी खरोखर रडत होते. सावलीने इतकं सहन केलं आणि आता तिला प्रेम करणारा नवरा मिळाला, ज्याने तिला तिची खरी ओळख आणि हक्काचं कौतुक मिळवून दिलं. त्या सर्व भावना अनुभवताना मला प्राप्ती म्हणूनही खूप वाईट वाटत होतं. हे गाणं माझ्या मनाच्या खूप जवळचं आहे.”
‘संगीत म्हणजे आयुष्याची थेरपी’
जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांना शुभेच्छा देताना प्राप्ती म्हणाली, “संगीत म्हणजे एक प्रकारची थेरपी आहे. ते माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतं. मी खूप आनंदी असताना गाणी ऐकते, उदास असताना किंवा राग आला तरी संगीताचीच साथ घेते. प्रत्येक मूडमध्ये संगीत माझ्यासोबत असतं आणि मी त्याच्याशी रिलेट करू शकते.”
दोन वर्षांनंतरही प्रेक्षकांचं प्रेम कायम
‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेला दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी प्रेक्षकांचं प्रेम आजही तितकंच कायम आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत प्राप्ती म्हणाली, “मालिकेला दोन वर्षं झाली आहेत, पण प्रेक्षकांचं प्रेम आजही पहिल्या दिवसाइतकंच आहे. हे प्रेम असंच कायम राहू द्या आणि सावलीवर असाच भरभरून आशीर्वाद ठेवा.”
तेव्हा पाहायला विसरू नका ‘सावळ्याची जणू सावली’, दररोज दुपारी १ वाजता, फक्त झी मराठीवर.
-
थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार उलगडणार २४ जुलैला

२०१४ मधील भीषण दुर्घटना मोठ्या पडद्यावर
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात ३० जुलै २०१४ रोजी घडलेली दरड दुर्घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तींपैकी एक मानली जाते. मुसळधार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग कोसळून संपूर्ण गावच मातीखाली गाडले गेले होते. या दुर्घटनेत १५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी प्रदर्शित होत असून त्या भीषण वास्तवाचा थरार प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानासह साकारला भव्य चित्रपट
अत्याधुनिक तंत्रज्ञान, माळीण गावाचा उभारलेला भव्य सेट आणि वास्तवदर्शी मांडणी ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. नुकतेच चित्रपटाचे पोस्टर आणि मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातून त्या काळातील भीषण परिस्थिती आणि मानवी संघर्ष प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
तगडी निर्मिती टीम आणि दमदार कलाकारांची साथ
ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनचे संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रुपेश राणे, अरुण कोंजे, दत्ता गायकर आणि राजु राणे हे सहनिर्माते आहेत. आरआरएएन स्टुडिओज प्रोडक्शनचे नंदू मेहेर, रुपेश राणे, अरुण कोंजे आणि राजु राणे यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.
चित्रपटाची संकल्पना, कथा आणि पटकथा राजु राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजु राणे यांनी लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, स्वर्गीय रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक आणि अनुज ठाकरे हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
संगीत, व्हीएफएक्स आणि तांत्रिक बाजूही भक्कम
राजा फडतरे यांनी चित्रपटाचे छायांकन केले असून युवराज गोंगले यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी आणि हरिदास शिंदे यांच्या आवाजातील गाणी चित्रपटाला अधिक भावनिक उंची देणार आहेत. कला दिग्दर्शन नितेश नांदगावकर यांनी केले असून व्हीएफएक्सची जबाबदारी रहमान अब्दुल्ला यांनी सांभाळली आहे. महेश भारंबे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
ग्रामस्थांच्या अनुभवांवर उभी राहिलेली कथा
या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कथानकासाठी केलेलं सखोल संशोधन. दिग्दर्शक राजु राणे यांनी माळीण गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्या आठवणी आणि अनुभव जाणून घेत कथेला वास्तवाची जोड दिली आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजन न राहता एका वेदनादायी इतिहासाचा दस्तऐवज ठरण्याची शक्यता आहे.
एक हृदयस्पर्शी आणि थरारक अनुभव
एक संपूर्ण गाव एका सकाळी निसर्गाच्या कोपाने नाहीसं झालं होतं. त्या वेदना, संघर्ष आणि आशेची कहाणी ‘एक होतं माळीण’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. दमदार कथा, प्रभावी कलाकार, उत्कृष्ट व्हीएफएक्स आणि भावस्पर्शी संगीत यांच्या जोरावर हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला हा चित्रपट अखेर २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
