
-
मराठी चित्रपटसृष्टीचा आश्वासक नायक ऋषी मनोहर

रंगभूमीपासून पडद्यापर्यंतचा प्रवास
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सातत्याने नवे चेहरे दाखल होत असतात. काही कलाकार आपल्या पहिल्याच भूमिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात, तर काही आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करतात. या नव्या पिढीतील आश्वासक कलाकारांपैकी अभिनेता ऋषी मनोहर हे नाव विशेषत्वाने पुढे येताना दिसत आहे. रंगभूमीवर अभिनयाची भक्कम पायाभरणी करत ऋषीने विविध माध्यमांमधून स्वतःची वेगळी छाप पाडली आहे.
सहज अभिनयातून निर्माण केली स्वतंत्र ओळख

‘दादा, एक गुड न्यूज आहे’ या नाटकातून तसेच ‘पेट पुराण’ या लोकप्रिय वेबसिरीजमधून ऋषी मनोहर यांनी आपल्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली. सहज अभिनय, प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स आणि साकारलेल्या पात्रांमध्ये पूर्णपणे समरस होण्याची क्षमता ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी प्रेक्षकांचे आणि उद्योगातील जाणकारांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नायकाला साजेसं व्यक्तिमत्त्व आणि अभिनयाची खोली

आजच्या स्पर्धात्मक मनोरंजनविश्वात अभिनयातील वैविध्य आणि नायकाला साजेसं व्यक्तिमत्त्व या दोन्ही गुणांचा संगम क्वचितच पाहायला मिळतो. ऋषी मनोहर यांच्यामध्ये हे दोन्ही गुण प्रकर्षाने जाणवतात. प्रत्येक भूमिकेकडे गांभीर्याने पाहण्याची त्यांची वृत्ती आणि सातत्याने स्वतःला अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्याकडे एका आश्वासक अभिनेत्याच्या नजरेने पाहिले जात आहे.
‘कप बशी’ ठरू शकतो कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा
येत्या १९ जून रोजी प्रदर्शित होणारा ‘कप बशी’ हा चित्रपट ऋषी मनोहर यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाची आणखी एक नवी बाजू पाहायला मिळणार आहे. नव्या दमदार कलाकारांच्या शोधात असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ऋषी मनोहर हे नाव अधिक ठळकपणे समोर येत आहे.
भूमिकांमधून स्वतःला नव्याने शोधण्याचा प्रयत्न
आपल्या अभिनय प्रवासाबद्दल बोलताना ऋषी मनोहर म्हणतात, “प्रत्येक भूमिका माझ्यासाठी केवळ एक व्यक्तिरेखा नसते, तर स्वतःला नव्याने शोधण्याची संधी असते. अभिनेता म्हणून प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं, अधिक प्रामाणिक आणि अधिक परिणामकारक साकारण्याचा माझा प्रयत्न असतो. ‘कप बशी’मधील भूमिका माझ्यासाठी विशेष ठरली आहे. या भूमिकेतून प्रेक्षकांना माझ्या अभिनयाची एक नवी बाजू अनुभवायला मिळेल आणि त्या प्रवासाशी ते मनापासून जोडले जातील, अशी आशा आहे.”
उद्याचा दमदार चेहरा म्हणून ऋषीकडे लक्ष
रंगभूमीवर घडलेला आणि अभिनयातील प्रामाणिकपणा जपणारा ऋषी मनोहर हा चेहरा मराठी चित्रपटसृष्टीच्या नव्या पिढीतील महत्त्वाचा अभिनेता म्हणून उदयास येत आहे. आगामी काळात त्याच्या अभिनयाचा प्रवास आणखी उंची गाठेल, अशी अपेक्षा रसिक प्रेक्षक व्यक्त करत आहेत.
-
कृष्णाईच्या लेकी’मध्ये ‘शारदा’च्या भूमिकेत झळकणार अभिनेत्री एकता लब्दे

एकता लब्देची नव्या भूमिकेत एंट्री
अभिनेत्री एकता लब्दे हिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एकता झी मराठीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत ‘शारदा’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि निरागस व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या एकताने याआधीही अनेक भूमिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’मधील शारदा ही समजूतदार, जबाबदार आणि कुटुंबासाठी स्वतःच्या भावनांनाही बाजूला ठेवणारी मुलगी असून, या भूमिकेद्वारे एकता प्रेक्षकांसमोर एका नव्या रूपात येत आहे.
शारदा ही कृष्णाईची सावली

आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना एकता म्हणाली, “माझ्या व्यक्तिरेखेचं नाव शारदा आहे. शारदा ही शांत, अबोल आणि मनातलं मनात ठेवणारी मुलगी आहे. माझे आणि शारदाचे स्वभावगुण खूप वेगळे असल्यामुळे या भूमिकेसाठी मला अनेक गोष्टी अॅडजस्ट कराव्या लागत आहेत. शारदा ही कृष्णाईची सावली आहे. त्यामुळे तिला तिच्या दोन बहिणींचाही आईसारखाच सांभाळ करावा लागतो. प्रेमळ, सौजन्यशील, साधी, सुंदर आणि समजूतदार असा चेहरा या भूमिकेसाठी हवा होता. शारदाच्या भूमिकेसाठी मी योग्य वाटले, याचा मला आनंद आहे.”
कोल्हापुरी बोलीभाषेसाठी घेतली विशेष मेहनत
खूप महिन्यांनंतर पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभं राहताना उत्साहासोबत थोडी धाकधूकही असल्याचं एकताने सांगितलं. “या भूमिकेसाठी कोल्हापूरकडची भाषा वापरायची होती. मी कोकणातील असल्यामुळे भाषेवर विशेष काम करावं लागलं. स्थानिक लोकांचं निरीक्षण करून त्यांच्या बोलण्याची शैली समजून घेतली. सुरुवातीला योग्य उच्चारांची चिंता होती, मात्र दिग्दर्शक आणि सहकलाकारांनी खूप मदत केली,” असे ती म्हणाली.
मुंबईबाहेरील शूटिंगचा वेगळा अनुभव
मालिकेचं सुरुवातीचं शूटिंग साताऱ्यात झाल्यामुळे कुटुंबापासून दूर राहणं थोडं अवघड वाटत असल्याचं एकताने सांगितलं. मात्र प्रॉडक्शन हाऊस, सहकलाकार आणि संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळे हा अनुभव संस्मरणीय ठरल्याचं तिने नमूद केलं. “माझं, नारायणीचं आणि ट्विंकलचं खूप कमी वेळात छान बॉण्डिंग झालं आहे. आम्ही सेटवरही सख्या बहिणींप्रमाणे वावरतो,” असे ती म्हणाली.
निवेदिता सराफ यांच्याकडून मिळते प्रेरणा
मालिकेत कृष्णाईची भूमिका निवेदिता सराफ साकारणार असल्याचं समजल्यावर आपला आनंद अनावर झाला होता, असं एकताने सांगितलं. “निवेदिता सराफ, अश्विनी भावे आणि अलका कुबल या माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत. निवेदिता ताईंचे चित्रपट पाहतच मी मोठी झाले. अभिनयासाठीची प्रेरणा मला त्यांच्या भूमिकांमधून मिळाली आहे. त्या स्वभावाने अतिशय प्रेमळ आहेत. आम्ही साताऱ्यात एकत्र फिरलो, शॉपिंग केलं आणि खूप छान वेळ घालवला. त्या आम्हा सर्वांची आईसारखी काळजी घेतात,” असे एकता म्हणाली.
स्त्रियांच्या जिद्दीची प्रेरणादायी कथा
‘कृष्णाईच्या लेकी’ ही अशा स्त्रिया आणि मुलींची कथा आहे, ज्या आयुष्यातील संकटांवर आणि दुःखांवर मात करून जिद्दीने पुढे जात राहतात. कृष्णाईच्या तिन्ही लेकींचे स्वभाव वेगवेगळे आहेत. एक बेधडक आहे, एक खेळाडू आहे, तर एक आई आणि बहिणींना सांभाळणारी जबाबदार मुलगी आहे. या तिन्ही मुलींचा संघर्ष, नाती आणि स्वप्नांचा प्रवास प्रेक्षकांना नक्कीच भावणार आहे.
कधी आणि कुठे पाहाल मालिका?
‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका १५ जूनपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. :::
-
‘आउट ऑफ सिलॅबस’चा प्रेरणादायी टीझर प्रदर्शित; तरुणाईच्या स्वप्नांना आणि निसर्गप्रेमाला मिळाली नवी दिशा

MPSCच्या स्वप्नांसोबत निसर्गसंवर्धनाचा संदेश
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांच्या संघर्षमय प्रवासासोबतच निसर्गरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देणाऱ्या ‘आउट ऑफ सिलॅबस’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. MPSCची स्वप्नं उराशी बाळगणाऱ्या तरुणांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा पुस्तकांच्या चौकटीबाहेर जाऊन समाजासाठी आणि पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देते.
‘पुस्तकांच्या पलीकडे…’ या टॅगलाईनचा प्रभाव
चित्रपटाची ‘पुस्तकांच्या पलीकडे…’ ही टॅगलाईनच त्याचा आशय स्पष्ट करणारी आहे. टीझरमध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीत गुंतलेली काही तरुण मुलं दिसतात. मात्र केवळ वैयक्तिक यशाच्या मागे धावण्याऐवजी हीच तरुणाई निसर्गसंवर्धनासाठी झटताना दिसते. करिअर, जबाबदारी, समाज आणि पर्यावरण यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न या कथेतून मांडण्यात आला आहे.
अजिंक्य राऊत आणि अद्वयीच्या अभिनयाची झलक
टीझरमध्ये अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री अद्वयी यांच्या भूमिका विशेष लक्ष वेधून घेतात. भावनिक प्रसंग, प्रेरणादायी संवाद आणि निसर्गाशी असलेली नाळ यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखा प्रभावी वाटतात. त्यांच्यासोबत शेषपाल गणवीर, सानिका तोरस्कर, अभिजित रामचंद्र, मिलिंद शिंदे आणि कमलेश सावंत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
सामाजिक जाणीव आणि वास्तववादी मांडणी
आजच्या तरुण पिढीसमोर असलेली स्पर्धा परीक्षांची धावपळ, वाढता ताण आणि पर्यावरण संवर्धनाची गरज या विषयांना चित्रपटात संवेदनशीलतेने हाताळण्यात आले आहे. त्यामुळे ‘आउट ऑफ सिलॅबस’ हा केवळ मनोरंजन करणारा चित्रपट नसून विचार करायला भाग पाडणारा अनुभव ठरण्याची शक्यता आहे.
तांत्रिक बाजूही भक्कम
चित्रपटाचे लेखन अनिकेत कोरडे यांनी केले असून दिग्दर्शन नवीन देशबोनिया यांचे आहे. डॉ. सुगत जी. वाघमारे यांनी ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’च्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन मनोहराराव ढोकणे यांनी AI क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहिले असून चित्रपटाच्या सादरीकरणात तांत्रिक नाविन्य जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
संगीत आणि छायांकनाची विशेष जमेची बाजू
संगीतकार मोहित कुलकर्णी यांनी चित्रपटाला संगीत दिले असून वैशाली सामंत, अभय जोधपूरकर आणि गोपाळ गावंडे यांच्या आवाजातील गाणी कथानकाला अधिक भावनिक बनवतात. मनीष केदार व्यास आणि सुधीर वड्डेली यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली असून अनिल विठ्ठल थोरात यांनी संकलन केले आहे.
सोशल मीडियावर वाढली चर्चा
टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. प्रेरणादायी विषय, वास्तववादी मांडणी आणि तरुणाईला साद घालणारी कथा यामुळे ‘आउट ऑफ सिलॅबस’बद्दलची उत्सुकता वाढली आहे. समाजाला सकारात्मक दिशा देणारा आणि तरुणांना प्रेरणा देणारा हा चित्रपट ठरेल, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.
-
रोहित परशुरामचा नवा प्रवास; ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साकारणार ‘शंकर’ची दमदार भूमिका

‘अप्पी आमची कलेक्टर’नंतर झी मराठीवर पुनरागमन
‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील अर्जुन या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता रोहित परशुराम आता पुन्हा एकदा झी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेत तो ‘शंकर’ ही महत्त्वाची भूमिका साकारणार असून या व्यक्तिरेखेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोल्हापूरच्या मातीतला रांगडा शंकर

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “मी शंकर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. गावच्या सावकार मातोश्रींचा मुलगा, व्यायामाची आवड असलेला आणि कोल्हापूरच्या मातीत वाढलेला रांगडा तरुण. एका बिनधास्त आणि मनमोकळ्या मुलीच्या प्रेमात पडल्यावर त्याच्या आयुष्यात घडणारे बदल, प्रेम आणि आई यांच्यामध्ये समतोल साधताना होणारी त्याची गोड दमछाक आणि त्याचा भावनिक प्रवास या भूमिकेतून पाहायला मिळणार आहे.”
ऑडिशनपासून मालिकेपर्यंतचा प्रवास
या भूमिकेची संधी कशी मिळाली याबद्दल सांगताना रोहितने एक खास आठवण शेअर केली. “मी ‘कमळी’ मालिकेच्या सेटवर आदित्यला भेटायला गेलो होतो. त्यावेळी दिग्दर्शक अनिकेत साने झी मराठीसाठी नवी मालिका करत असल्याचं समजलं. मी लगेच त्यांना भेटलो, ऑडिशन दिली. त्यानंतर अनेक फेऱ्या, सीन वर्क आणि चर्चेनंतर मला ही भूमिका मिळाली. झी मराठीच्या कुटुंबात पुन्हा सहभागी होणं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.”
भूमिकेसाठी खास तयारी
‘शंकर’ साकारण्यासाठी रोहित विशेष मेहनत घेत आहे. कोल्हापुरी बोलीभाषा, लहेजा, शारीरिक बांधा आणि व्यक्तिरेखेची मानसिकता समजून घेण्यासाठी तो सातत्याने तयारी करत आहे.
“कोल्हापुरी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतोय. भरपूर व्यायाम, योग्य आहार आणि नियमित दिनचर्या पाळतोय. स्क्रिप्टचं सखोल वाचन करत आहे, जेणेकरून शंकर अधिक प्रामाणिकपणे साकारता येईल,” असे तो सांगतो.
निसर्गरम्य वातावरणात रंगतंय चित्रीकरण
मालिकेचे चित्रीकरण मुंबईबाहेरील सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात सुरू आहे. हिरवाई, मोकळं वातावरण आणि गावाकडच्या जीवनशैलीमुळे कलाकारांना काम करताना वेगळी ऊर्जा मिळत असल्याचे रोहितने सांगितले.
“गावाकडचं वातावरण शंकरसारखी व्यक्तिरेखा जगण्यासाठी खूप मदत करतं. संपूर्ण टीमसाठी हा अनुभव संस्मरणीय ठरत आहे,” असे तो म्हणाला.
निवेदिता सराफ यांच्यासोबत काम करण्याचा आनंद
मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल रोहित विशेष भावूक झाला आहे.
“निवेदिता सराफ यांच्या प्रोजेक्टमध्ये फक्त एका दृश्यात उभं राहायलाही मला आनंद झाला असता. इथे तर मी मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळणार आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व, अभिनयातील सहजता आणि सकारात्मक ऊर्जा प्रेरणादायी आहे,” असे रोहितने सांगितले.
प्रेक्षकांच्या प्रेमाची अपेक्षा
‘अप्पी आमची कलेक्टर’मधील अर्जुन या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आता ‘शंकर’लाही तितकंच प्रेम मिळेल, असा विश्वास रोहितला आहे.
“साताऱ्याच्या मातीतला अर्जुन आणि कोल्हापूरच्या लाल मातीतला शंकर मला जणू भावंडांसारखे वाटतात. अर्जुननंतर आता शंकरच्या रूपात मी पुन्हा प्रेक्षकांसमोर येतोय. त्यांनी जसं आतापर्यंत प्रेम दिलं, तसंच प्रेम आणि आशीर्वाद शंकरलाही मिळेल, अशी अपेक्षा आहे,” असे तो म्हणाला.
१५ जूनपासून भेटणार ‘कृष्णाईच्या लेकी’
स्त्रीशक्ती, स्वाभिमान आणि नात्यांचा भावनिक प्रवास उलगडणारी ‘कृष्णाईच्या लेकी’ ही नवी मालिका १५ जूनपासून दररोज सायंकाळी ७ वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘हिल पोरी हिला’ची देशभरात क्रेझ; यूट्यूब इंडिया ट्रेंडिंगमध्ये २४व्या क्रमांकावर गाण्याची झेप

गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांच्या जोडीची जादू
दादा कोंडके यांच्या अजरामर गाण्याला नव्या अंदाजात सादर करण्यात आलेल्या ‘हिल पोरी हिला’ या गाण्याने सध्या सोशल मीडियासह यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता हे गाणे आता देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून, यूट्यूब इंडियाच्या ट्रेंडिंग यादीत २४व्या क्रमांकावर पोहोचले आहे.
या गाण्यात पहिल्यांदाच महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील आणि विनोदाचा बादशाह भाऊ कदम ही जोडी एकत्र झळकली आहे. त्यांच्या केमिस्ट्रीने आणि दमदार सादरीकरणाने प्रेक्षकांची मनं जिंकली असून सोशल मीडियावर या जोडीची जोरदार चर्चा रंगली आहे.
दादा कोंडके यांच्या गाजलेल्या गाण्याचा नवा अवतार

दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ या चित्रपटातील ‘हिल हिल पोरी हिला’ हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरले होते. तब्बल ५२ वर्षांनंतर या गाण्याला आधुनिक संगीत, नवी दृश्यभाषा आणि आकर्षक सादरीकरणाची जोड देत त्याचे रिमेक व्हर्जन प्रेक्षकांसमोर आणण्यात आले आहे.
जुन्या गाण्याचा आत्मा कायम ठेवत नव्या पिढीला भावेल अशा पद्धतीने केलेल्या सादरीकरणामुळे हे गाणे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.
कोकणातील निसर्गरम्य लोकेशन्सची साथ
या गाण्याचे चित्रीकरण कोकणातील सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात करण्यात आले आहे. हिरव्यागार डोंगररांगा, समुद्रकिनारे आणि मनमोहक लोकेशन्समुळे गाण्याच्या दृश्यांना विशेष उठाव मिळाला आहे.
गाण्यात गौतमी पाटील आणि भाऊ कदम विविध आकर्षक लूकमध्ये दिसतात. पारंपरिक नऊवारी साडीपासून रेट्रो आणि वेस्टर्न स्टाईलपर्यंत अनेक वेगवेगळ्या रूपांमध्ये दोघांनीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद
‘हिल पोरी हिला’ प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. गाण्यातील नृत्य, संगीत, लोकेशन्स आणि गौतमी-भाऊ यांच्या नव्या जोडीचे नेटकऱ्यांनी विशेष कौतुक केले आहे.
“गौतमीचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळाला”, “भाऊ कदम आणि गौतमीची जोडी भन्नाट आहे”, “जुन्या गाण्याला दिलेला नवा ट्विस्ट अप्रतिम” अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
देशभरात लोकप्रियतेचा नवा टप्पा
यूट्यूब इंडियाच्या ट्रेंडिंग यादीत २४व्या क्रमांकावर झेप घेत ‘हिल पोरी हिला’ने आपल्या लोकप्रियतेची जोरदार नोंद केली आहे. महाराष्ट्रातील लोकसंगीत, नृत्य आणि मनोरंजनाची ताकद पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यात या गाण्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
-
‘देऊळ बंद २’च्या अभूतपूर्व यशाचा जल्लोष; स्वरूप स्टुडिओसमध्ये प्रवीण विठ्ठल तरडे यांचे विशेष स्वागत

यशाच्या निमित्ताने स्वरूप स्टुडिओसला भेट
‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ या चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानिमित्त सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी ठाणे येथील स्वरूप स्टुडिओस या चित्रपट निर्मिती संस्थेला विशेष भेट दिली. स्वरूप स्टुडिओससोबतच्या आगामी चित्रपट प्रकल्पाच्या निमित्ताने ही भेट आयोजित करण्यात आली होती.
केक कापून साजरा केला आनंदोत्सव
यावेळी अभिनेता अंकुश चौधरी, स्वरूप स्टुडिओसचे सचिन नारकर आणि विकास पवार यांनी ‘देऊळ बंद २’ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल प्रवीण विठ्ठल तरडे यांचे अभिनंदन केले. चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी प्रवीण तरडे यांच्या हस्ते खास केक कापण्यात आला आणि उपस्थितांनी हा संस्मरणीय क्षण उत्साहात साजरा केला.
‘हा स्वामींचा आशीर्वाद’ – प्रवीण विठ्ठल तरडे
या प्रसंगी बोलताना प्रवीण विठ्ठल तरडे म्हणाले, “’देऊळ बंद २’च्या यशाचा आनंद संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी साजरा करत आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. प्रेक्षकांनी चित्रपटावर दाखवलेलं प्रेम आणि मिळालेला प्रतिसाद हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. या यशामागे प्रेक्षकांची श्रद्धा आणि विश्वास हीच खरी ताकद आहे.”
यशाचा प्रवास कायम चर्चेत
‘देऊळ बंद २’ने प्रदर्शित झाल्यापासून महाराष्ट्रभरात प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. चित्रपटाच्या यशानिमित्त सुरू असलेल्या विविध भेटीगाठी आणि सत्कार कार्यक्रमांमधून संपूर्ण टीमचा उत्साह आणखी वाढताना दिसत असून, मराठी चित्रपटसृष्टीत या यशाची चर्चा कायम आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘देऊळ बंद २’च्या संपूर्ण टीमचे कौतुक

वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित आणि प्रवीण विठ्ठल तरडे लिखित-दिग्दर्शित ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट सध्या महाराष्ट्रभर बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर चित्रपटाच्या कलाकार आणि तंत्रज्ञांच्या टीमने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
मुंबई येथे पार पडलेल्या या विशेष भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘देऊळ बंद २’च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. समाजातील विविध स्तरांतील प्रेक्षकांना एकत्र आणण्याची ताकद या चित्रपटात असल्याचे सांगत त्यांनी चित्रपटाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे, निर्माते कैलास वाणी, अभिनेत्री स्नेहल तरडे, अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अतुल कुडले, सुनील पालकर, तंत्रज्ञ संकेत धोटकर, छायाचित्रकार प्रशांत मिसळे, जगदीश चव्हाण तसेच लीड मीडिया पीआर आणि मार्केटिंगचे कुशल कोंडे आणि अनुप गोरे उपस्थित होते.
यावेळी प्रवीण विठ्ठल तरडे म्हणाले, “प्रेक्षकांनी ‘देऊळ बंद २’ला भरभरून प्रेम दिलं आहे. महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे आम्ही मनापासून ऋणी आहोत. त्यातच राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून मिळालेलं हे कौतुक आमच्या संपूर्ण टीमसाठी प्रेरणादायी आहे.”
प्रदर्शनानंतर ‘देऊळ बंद २’ने ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत असून, दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची घोडदौड कायम आहे. शेतकरी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच स्तरांतील प्रेक्षक सहकुटुंब चित्रपटगृहांकडे वळताना दिसत आहेत.
स्वामी समर्थांच्या भक्तीचा संदेश, भावनिक कथानक आणि प्रभावी सादरीकरणामुळे ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरला असून, त्याच्या यशाचा प्रवास अजूनही वेगाने सुरू आहे.
-
कान्सच्या रेड कार्पेटवरील प्राजक्ताच्या सौंदर्याला ‘निरुपा सारीज’चा साज

ठाणे : यंदाच्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवामध्ये मराठी कलाकारांनी खास मराठमोळा ठसा उमटवला. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कान्सच्या रेड कार्पेटवर पारंपरिक नऊवारी साडीत केलेल्या आकर्षक एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, तिच्या या चर्चित लूकला ठाण्यातील निरुपाज येवला पैठणी अँड सिल्क सारीजच्या खास साडीचा साज लाभला होता.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि मनोरंजनविश्वात प्राजक्ताच्या या लूकची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. मोरपिशी छटेतील नऊवारी, त्यावर भरजरी शेला, पारंपरिक नथ, ठुशी, कमरपट्टा आणि मराठमोळा दागिन्यांचा साज अशा संपूर्ण लूकमधून तिने महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जागतिक मंचावर अभिमानाने सादर केली.
कान्सच्या रेड कार्पेटवर सहसा वेस्टर्न गाऊन्स आणि ग्लॅमरस फॅशन पाहायला मिळते. मात्र, प्राजक्ताने भारतीय परंपरा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला प्राधान्य देत नऊवारीची निवड केल्याने तिचा लूक सर्वांपेक्षा वेगळा आणि उठून दिसणारा ठरला. फॅशनप्रेमींसह मराठी प्रेक्षकांनीही तिच्या या निर्णयाचे भरभरून कौतुक केले आहे.
‘निरुपा सारीज’ने तयार केलेल्या या साडीमध्ये पारंपरिक विणकाम, आकर्षक रंगसंगती आणि आधुनिक एलिगन्स यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. मराठमोळ्या साड्यांची समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम या निमित्ताने झाले असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
प्राजक्ताने स्वतः सोशल मीडियावर कान्समधील अनुभव शेअर करत ‘मराठी ठसका’ जागतिक रेड कार्पेटवर घेऊन जाण्याचा आनंद व्यक्त केला होता. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. निरुपाज सारीज हा खात्रीशीर येवला पैठणी आणि सिल्क साड्या देणारा ब्रँड आहे. प्राजक्तासह चित्रपट सृष्टीतील सुबोध भावे, अभिजित खांडकेकर, अपूर्वा नेमळेकर, पूजा सावंत’ सिद्धार्थ चांदेकर, केतकी माटेगावकर, हेमल इंगळे, पल्लवी पाटील आदी कलाकारांनी निरुपाज भेट देत येथील साड्यांचे कौतुक केले आहे.
‘निरुपा सारीज’च्या संस्थापिका निरुपा तायडे म्हणाल्या, “भारतीय साडी ही केवळ फॅशन नसून संस्कृती आणि परंपरेची ओळख आहे. प्राजक्ता माळीसारख्या लोकप्रिय अभिनेत्रीने जागतिक मंचावर आमच्या साडीची निवड करणे हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. कान्ससारख्या प्रतिष्ठित मंचावर ठाण्यातील ब्रँडची झळाळी पाहायला मिळाल्याने स्थानिक फॅशन उद्योगातही उत्साहाचे वातावरण असून, भारतीय पारंपरिक साड्यांची जागतिक लोकप्रियता पुन्हा अधोरेखित झाली आहे.”
-
म्हणून नव्या दिग्दर्शकांसोबत काम करायला आवडतं – सई ताम्हणकर

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर कायमच वेगळ्या धाटणीच्या भूमिका स्वीकारताना दिसते. विविध विषय, नवे प्रयोग आणि आव्हानात्मक व्यक्तिरेखा यांमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आता सई लवकरच ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटातून एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक विविध कोरगांवकर यांनी केले असून, नव्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा अनुभव सईने नुकताच शेअर केला आहे. नव्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना मिळणाऱ्या अनुभवांविषयी बोलताना तिने आपल्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणींनाही उजाळा दिला.

सई म्हणाली, “नवीन व्यक्तीसोबत आणि त्यांच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी काम करणं नेहमीच खास असतं. अशा वेळी मला माझ्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण होते. जेव्हा मी या इंडस्ट्रीत नवीन होते, तेव्हा अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता. त्यांच्यामुळेच मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली. आज जर मी एखाद्या नव्या दिग्दर्शकाला किंवा कलाकाराला तीच सकारात्मक भावना देऊ शकत असेन, तर ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आणि समाधान देणारं असतं.”
ती पुढे म्हणाली, “मला नेहमी वेगवेगळ्या कार्यपद्धती असलेल्या दिग्दर्शकांसोबत काम करायला आवडतं. प्रत्येक दिग्दर्शकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे नवीन वातावरण, नवीन विचारसरणी आणि वेगळ्या प्रकारचं काम करण्याची संधी मिळते. एखाद्याच्या पहिल्याच आणि त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाचा भाग होणं ही खूप समृद्ध करणारी भावना असते. नव्या प्रतिभेला आणि नव्या आवाजांना पाठिंबा देण्यात एक वेगळंच समाधान मिळतं.”
सईने आजवर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. ‘मटका किंग’मध्ये नागराज मंजुळे, ‘डब्बा कार्टेल’मध्ये हितेश भाटिया, ‘अग्नी’मध्ये राहुल ढोलकिया, ‘ग्राउंड झिरो’मध्ये तेजस प्रभा विजय देवोस्कर आणि ‘मिमी’मध्ये लक्ष्मण उतेकर यांच्यासारख्या दिग्दर्शकांसोबत तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
सईच्या अभिनयातील सातत्य, भूमिकांची वैविध्यता आणि प्रत्येक व्यक्तिरेखेला दिलेला वेगळा स्पर्श यामुळे ती आजही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आहे. ‘तुंबाडची मंजुळा’मधील तिची नवी भूमिका आणि नवोदित दिग्दर्शकासोबतची ही नवी जुळवाजुळव प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे. आगामी काळातही सई अनेक दर्जेदार आणि वेगळ्या कथांचा भाग होणार असल्याची चर्चा आहे.
-
४ जूनपासून ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत संत सखूच्या निस्सीम भक्तिगाथेचं नवं आवर्तन

‘सखा माझा पांडुरंग’मध्ये ८ वर्षांची लीप; संत सखुबाईंच्या भूमिकेत सान्वी जांबेकर
सन मराठीवरील लोकप्रिय भक्तिमय मालिका ‘सखा माझा पांडुरंग’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून संत सखुबाईंच्या भक्तिमय प्रवासाने रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत बालकलाकार स्वराली खोमणे हिने साकारलेल्या संत सखुबाईंच्या बालपणीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आता मालिकेत ८ वर्षांची लीप घेण्यात येणार असून संत सखुबाईंच्या आयुष्यातील नवा अध्याय उलगडणार आहे.
या नव्या पर्वात संत सखुबाईंची भूमिका अभिनेत्री सान्वी जांबेकर साकारणार आहे. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या नव्या पर्वाच्या निमित्ताने मालिकेची पत्रकार परिषदही सेटवर पार पडली. यावेळी मालिकेतील कलाकार, निर्माते संगीत कुलकर्णी आणि संपूर्ण टीम उपस्थित होती. येत्या ४ जूनपासून दररोज सायंकाळी ७.३० वाजता हे नवं आवर्तन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
संत सखुबाईंचा संघर्ष नव्या रूपात
मालिकेबद्दल बोलताना निर्माते संगीत कुलकर्णी म्हणाले, “संत सखुबाई या एक सामान्य स्त्री असल्या तरी विठ्ठलभक्तीत त्यांनी स्वतःला पूर्णपणे अर्पण केलं. आयुष्यातील प्रत्येक संकटाला त्यांनी धैर्याने सामोरं जात भक्तीचा मार्ग स्वीकारला. आजच्या काळातील प्रत्येक स्त्रीसाठी त्या प्रेरणास्थान आहेत. संत सखुबाईंबद्दल उपलब्ध माहिती तुलनेने कमी असल्याने त्यांच्या जीवनप्रवासाचा परिचय प्रेक्षकांना करून देण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला जात आहे. ८ वर्षांच्या लीपनंतर त्यांची निस्सीम भक्ती आणि संघर्ष नव्या रूपात समोर येणार आहे. हा संघर्ष केवळ त्यांच्यापुरता मर्यादित न राहता समाजासाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.”
‘ही भूमिका साकारणं म्हणजे आशीर्वाद’
संत सखुबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री सान्वी जांबेकर म्हणाली, “संत सखुबाईंची भूमिका साकारण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी मोठं भाग्य आहे. प्रेक्षकांनी या मालिकेवर आणि सखुवर प्रचंड प्रेम केलं आहे, त्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. या भूमिकेसाठी मी मालिकेचे आधीचे भाग अनेकदा पाहिले आहेत. सखुच्या स्वभावातील आणि भावविश्वातील प्रत्येक बारकावा समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मालिकेची संपूर्ण टीम मला खूप सहकार्य करत आहे. पहिल्या भागाच्या चित्रीकरणादरम्यान तब्बल २४ तास पाण्यात भिजत शूटिंग केलं. संत सखुबाईंच्या आयुष्यातील संकटांचा सामना करताना त्यांची श्रद्धा कधीच ढळली नाही. त्याच भावनेने मी ही भूमिका साकारत आहे. छोट्या सखुवर जसं प्रेम प्रेक्षकांनी केलं, तसंच प्रेम मला देखील मिळेल, अशी आशा आहे.”
भक्ती, श्रद्धा आणि संघर्षाचा नवा अध्याय
८ वर्षांच्या लीपनंतर ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत संत सखुबाईंच्या जीवनातील अधिक खडतर आणि प्रेरणादायी प्रवास उलगडणार आहे. विठ्ठलभक्ती, श्रद्धा, त्याग आणि संकटांवर मात करण्याची ताकद यांची सांगड घालणारा हा नवा अध्याय प्रेक्षकांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी ठरणार आहे.
