हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द गीतकार समीर सामंत यांचा ‘निजात का तालिब.. ग़ालिब’ हा कार्यक्रम येत्या शनिवारी पुण्यात सादर होणार

‘मिर्जा ग़ालिब’ ह्या दोन शब्दांसाठी उर्दू शायरीच्या रसिकांच्या मनात एक हळवा कप्पा आहे.. आज ग़ालिबच्या काव्याला प्रेम, आदर, सन्मान, लोकप्रियता सारं सारं भरभरून मिळताना आपण पाहतो….

पण ग़ालिबच्या हयातीत त्याच्या भावनांना, शब्दांना, विचारांना समजणारे फार मोजके लोक होते..

गालिबच्या काव्यात काय नाही? प्रेम, विरह, ओढ, विवंचना, सौंदर्यवर्णन, धार्मिक संकल्पना, सांस्कृतिक एकात्मता, समाज दर्शन, तत्वज्ञान, विसंगतीवर व्यंगात्मक टीका.. अशा अनेक विषयांना ग़ालिबने आपल्या खास शैलीत मांडलं..

जेव्हा भारतात राजकीय सत्तांतर होत होतं.. सामाजिक संघर्ष चालू होता.. जनसामान्यांना आर्थीक विवंचना ग्रासत होत्या त्या अठराशेच्या उत्तरार्धात मिर्जा ग़ालिब आपल्या उर्दू आणि फारसी काव्यातून आपले विचार मांडत होता…

आयुष्याची नश्वरता हीच दुःखातून मुक्तीची आशा आहे त्यामुळे जोवर आयुष्याचा तुरूंगवास आहे तोवर दुःखाचं बंधन असणारच हे ग़ालिब जाणून होता…
“मौत से पहले आदमी गम से निजात पाये क्युं..”
ह्या गालिबच्या ओळीत तो हेच सत्य सांगतो..
निजात.. म्हणजे मुक्ती..
आणि आपलं आयुष्य हा मुक्तीच्या वाटेवरला प्रवास आहे.. या वाटेवरील अंतिम टप्पा.. म्हणजे मुक्ती.
आयुष्यात इच्छा, ओढ, तलब (शोध) असावा तो मुक्तीचा..
हे गालिबच्या आयुष्याचं तत्वज्ञान..
ग़ालिब आयुष्यभर ह्या निजात(मुक्ती) चा तालिब(इच्छुक/शोधक) राहिला.

शेवटचा मुघल बादशाह बाहदुरशाह जफर याच्या दरबारात ग़ालिबने फक्त काव्यच नव्हे तर इतिहास लिहीण्याचं काम ही हाती घेतलं होतं… महर-ए-नीमरोज़ या ग्रंथात त्याने मुघल साम्राज्याचं इतिहासलेखन केलं..
महर-ए-नीमरोज़ म्हणजे मध्यान्हीचा सूर्य.. तत्कालीन मुघल साम्राज्याला भर दुपारी तळपणारा सूर्य म्हणताना ग़ालिब ला ही जाणीव होती की आता हा सूर्य मावळतीला जाऊ लागला आहे.. तत्कालीन बदलत्या परिस्थिती चं वर्णन ग़ालिबच्या पत्रांतही वाचायला मिळतं..

अठराशे सत्तावन्न च्या उठावाचा साक्षीदार..
काळाच्या पलिकडलं काव्य लिहीणारा कवी..
धार्मिक संकल्पनेपेक्षा भारतीय संस्कृतीला अधिक महत्व देणारा लेखक..
व्यक्तीगत जीवनातील दुःखांतही आयुष्याकडे सकारात्मकतेने पहाणारा तत्वज्ञ..
अशा ह्या मिर्जा असदउल्लाह खां ‘गालिब’ ला समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजेच..

‘निजात का तालिब.. ग़ालिब’ हा कार्यक्रम..येत्या शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी, संध्याकाळी ६.३० वाजता.. पत्रकार भवन पुणे येथे
सादर होणार आहे.

सादरकर्ते आहेत, कट्यार काळजात घुसली, उबंटु, बंदिश बॅंडिट्स अशा अनेक प्रसिद्ध कलाकृतींना आपल्या गीतलेखनाने सजवणारे कवी, शायर, गीतकार *समीर सामंत* आणि ह्या कार्यक्रमात ग़ालिबच्या गजलांना आपल्या अर्थवाही सुरांनी सजवणार आहेत सुप्रसिद्ध गायिका गायत्री सप्रे ढवळे.

Leave a comment