
क्लिअर पुरस्कृत पाचव्या टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत बंगाल विझार्ड्स, गुजरात पँथर्स या संघांनी विजयी सलामी दिली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या लढतीत बंगाल विझार्ड्स संघाने हैद्राबाद स्ट्रायकर्स संघाचा 46-34 असा पराभव केला. महिला एकेरीत बंगालच्या मारिया तिमोफिवाने हैद्राबादच्या एलेन पेरेझला 10-10 असे बरोबरीत रोखले. तर पुरूष एकेरीत बंगालच्या श्रीराम बालाजीने हैद्राबादच्या निकी पोनाचाचा 16-04 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. तर, मिश्र दुहेरीत बंगालच्या मारिया तिमोफिवा व अनिरुद्ध चंद्रशेखर यांना हैद्राबादच्या एलेन पेरेझ व साकेत मायनेनी यांनी 05-15 असा पराभव करून ही आघाडी कमी केली. पुरुष दुहेरीत श्रीराम बालाजीने अनिरुद्ध चंद्रशेखरच्या साथीत साकेत मायनेनी व निकी पोनाचा यांचा 15-5 असा पराभव बंगाल विझार्ड्स संघाला विजय मिळवून दिला. श्रीराम बालाजी याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

दुसऱ्या चुरशीच्या सामन्यात दिल्ली बिनीज ब्रिगेड संघाने पुणे जगवार्स संघावर 38-42 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. महिला एकेरीत पुण्याच्या डायना मर्सिनकेविकाने दिल्लीच्या सहजा यमलापल्लीचा 12-08 असा पराभव केला. पुरूष एकेरीत दिल्लीच्या डेनिस नोव्हाकने पूनायच्या लुकस रोसोलचा 13-7 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत पुण्याच्या डायना मर्सिनकेविका व रित्विक बोलीपल्ली यांनी दिल्लीच्या सहजा यमलापल्ली व जीवन नेद्दूचेझियन यांना 10-10 असे बरोबरीत रोखले. पुरुष दुहेरीत दिल्लीच्या जीवन नेद्दूचेझियन व डेनिस नोव्हाक यांनी पुण्याच्या रित्विक बोलीपल्ली व लुकास रोसोल यांचा 11-9 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
पंजाब पेट्रीएट्स संघाने बेंगळुरू एसजी माव्हरिक्स संघावर 41-39 असा विजय मिळवला. महिला एकेरीत पंजाबच्या कोनी पेरीनने बेंगळुरूच्या अरीना रोडीनोव्हाचा 13-7 असा तर, पुरूष एकेरीत बेंगळूरुच्या रामकुमार रामनाथनने पंजाबच्या दिग्विजय प्रताप सिंगछा 11-9 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत पंजाबच्या अर्जुन कढे व कोनी पेरीन जोडीने अरिना रोडीनोव्हा व विष्णू वर्धन यांचा 12-8 असा तर पुरुष दुहेरीत बंगळुरूच्या रामकुमार व विष्णू वर्धन यांनी पंजाबच्या दिग्विजय प्रताप सिंग व अर्जून कढे यांचा13-7 असा पराभव केला.

अखेरच्या लढतीत गुजरात पँथर्स संघाने मुंबई लियोन आर्मी संघाचा 46-34 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून कारमान कौर थंडी, सुमित नागल, मुकुंद ससी कुमार, यांनी सुरेख कामगिरी बजावली. कारमान कौर थंडीला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
