
संग्राम सिंह सध्या त्याचा नवा चित्रपट ‘उड़ान जिंदगी की’ मुळे चांगलाच चर्चेत आहे. एवढेच नव्हे तर जवळ जवळ सहा वर्षानंतर संग्राम सिंह एक पैलवान म्हणूनही पुन्हा कुस्तीच्या मैदानात उतरत आहे. दुबई प्रो कुस्ती चँपियनशिप २०२४ मध्ये संग्राम सिंह पाकिस्तानी मल्लाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. संग्राम सिंहला यामुळे संपूर्ण देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
संग्राम सिंह याने नुकतीच बाबा रामदेव यांची भेट घेतली आणि त्यांना त्याचा आगामी चित्रपट उड़ान जिंदगी की बाबत माहिती दिली. बाबा रामदेव यांनी त्याला चित्रपटाबाबत शुभेच्छा देतानाच दुबई प्रो कुस्ती चँपियनशिपमध्ये कुस्ती खेळण्यापूर्वी एक सल्लाही दिला.
बाबा रामदेव यांनी संग्राम सिंहला म्हटले, “आपले जीवन एक संघर्ष आहे, हा संघर्ष करताना कधी हरायचे नाही आणि कधी थांबायचेही नाही. जीवनातील प्रत्येक कामामध्ये पारदर्शकपणा आणि संयमाची खूप गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने त्याला काय करायचे आहे, कसला विचार करायचा आहे, काय पाहायचे, काय खायचे आणि कसे आपल्या मनावर नियंत्रण ठेवायचे हे लक्षात घेतले पाहिजे. त्याने स्वतःकडे कधीही हीन भावनेने पाहू नये, तर त्याने स्वतःला नेहमी एक योद्धा म्हणून पाहिले पाहिजे. तरच तो युद्धात विजयी होऊ शकतो. असा सल्लाही बाबा रामदेव यांनी संग्राम सिंहला दिला.
यावेळी संग्राम सिंहने बाबा रामदेव यांना ते एक यशस्वी व्यावसायिक कसे बनले असा प्रश्न केला असता, बाबा रामदेव म्हणाले, “व्यवसाय करताना सुरुवातीलाच मोठा नफा कसा होईल याचा विचार न करता व्यवसाय केला पाहिजे. लोकांना आपण काही तरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कमाईची लालसा नसावी. तसेच आपल्या तत्वांशीही कधीही तडजोड़ करू नये. जे काही करू ते वेगळे आणि काही तरी नवे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे संयम ठेवण्यास शिकले पाहिजे.”
संग्राम सिंह लवकरच उड़ान जिंदगी की चित्रपटात दिसणार आहे. नायक म्हणून त्याचा हा पहिलाच व्यावसायिक चित्रपट असून यात तो एका 25 वर्षीय पैलवानाची भूमिका साकारीत आहे. कुस्तीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात पिता-पुत्राची कथा सादर करण्यात आलेली आहे. हा चित्रपट आजच्या तरुणांना प्रेरित करणारा आहे. हा चित्रपट 21 फेब्रुवारी रोज देशभर प्रदर्शित केला जाणार आहे.
