
मुंबई, 26 सप्टेंबर 2024: टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या मोसमासाठी पार पडलेल्या लिलावासाठी आठही फ्रँचायझी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरल्याचे चित्र होते. मुंबईतील सहारा स्टार येथे पार पडलेल्या या लिलावाकरिता भारताचे महान टेनिस पटू लिएंडर पेस, सानिया मिर्झा, महेश भूपती यांच्यासह रकुलप्रीत सिंग व सोनाली बेंद्रे या सिने तारकाही एकत्र आल्यामुळे ही संध्याकाळ सनसनाटी ठरली.
४ फेऱ्यांच्या अत्यंत चुरशीच्या लिलावानंतर सर्व संघांनी स्पर्धात्मक बोली लावून जगभरातील गुणवान खेळाडूंमध्ये आपला संघ निवडला.
आर्मेनियाची २२ वर्षीय एलिना एव्हानेस्यान प्रथमच या स्पर्धेत खेळत असली तरी तिला ४२.२० लाख अशी सर्वोच्च किंमत देऊन प्रियेश जैन यांच्या मालकीच्या व तापसी पन्नूचा पाठिंबा असलेल्या पंजाब पेट्रियॉट्स संघाने खरेदी केले. अन्य संघांकडून कडवी चुरस मिळाल्यानंतर पेट्रियॉट्स संघाने सर्वाधिक बोली लावून विश्वक्रमवारीतील ४७ व्या स्थानी असलेल्या एलिनाला महिला गटातील डायमंड श्रेणीतून मिळवले. पेट्रियॉट्स संघाने पुरूष गटातील प्लॅटिनम श्रेणीतील अर्जुन कढेची ५ लाख या मूळ किंमतीला खरेदी केली. तसेच लिलावाच्या अखेरपर्यंत संयम राखताना मुकूंद ससीकुमारची ६.८०लाख रुपयाला खरेदी केली.

आर्मेनियाची एलिना एव्हानेस्यान सर्वात महागडी खेळाडू

गतविजेत्या बेंगळुरू एसजी पायपर्स संघाने दुसऱ्या क्रमांकाच्या महागड्या खेळाडूची खरेदी करताना दोन वेळचा ग्रॅण्ड स्लॅम मिश्र दुहेरी विजेता ऑस्ट्रेलियाचा मॅक्स पर्सेल याच्यासाठी ४२ लाख रुपये मोजले. रोहन गुप्ता यांच्या मालकीच्या व एसजी स्पोर्टसचा मुख्य अधिकारी महेश भूपती याचा पाठिंबा असलेल्या बेंगळुरू संघाने लिलावात उशिरा भाग घेतला. तरीही ऑलिम्पिक पटू अंकिता रैनाला ५लाख रुपयांत खरेदी करताना आपल्या संघाची ताकद वाढवली. त्यांनी दुहेरी स्पेशा लिस्ट अनिरुद्ध चंद्रशेखर याची सुद्धा ४ लाख रुपयाला खरेदी केली.
गतवर्षीच्या उपविजेत्या बंगाल विझार्ड्स संघाने सानिया मिर्झाचा पाठिंबा मिळवला असून क्रोएशियाच्या पेट्रा मॅट्रिकला ३५ लाख रुपयांत खरेदी करताना बरीच बचत केली. तसेच, बंगाल संघाने श्रीराम बालाजी याची केवळ ६.२०लाख रुपयांत खरेदी करून मोठीच बचत केली. तसेच निकी पोनाच्चा खेळाडूला ३.८०लाख रुपयांत खरेदी करताना पहिली फेरी गाजवली.

रामकु पतगिर यांच्या मालकीच्या गुजरात पँथर्स संघाने गेल्या काही वर्षातील लिलावाचा अभ्यास केल्याचे दाखवून दिले आणि सुमित नागलची ३५ लाख या मूळ किंमतीला तर भारतातील अव्वल क्रमांकाची सहजा यमलापल्ली हिची ७.८०लाख रुपयांना खरेदी करताना सर्वांचा अपेक्षाभंग केला. गुजरातने दुहेरी विशेषज्ञ विजय सुंदरला ११.५लाखात खरेदी करताना आपल्या संघाच्या ताकदीत भर घातली.
डॉ विकास महामुनी यांच्या मालकीच्या यश मुंबई ईगल्स या संघाने रोमानियाच्या अनुभवी जॅकलिन क्रिस्टीनला खरेदी करताना सर्वोत्तम खेळाडू निवडणार असल्याचे दाखवून दिले. त्यांनी रोमनियाची अनुभवी जॅकलिन क्रिस्टीन तसेच जीवन नेद्दूचेझियन यांना खरेदी करताना दुहेरीतील विजेतेपदासाठी आपला दावा सादर केला. करण सिंग च्या खरेदीसाठी सर्वच संघामध्ये चुरस रंगली होती. परंतु आपल्या संघात त्याला समाविष्ट करण्यासाठी त्यांना खूपच प्रयत्न करावे लागले.

राहुल तोडी यांच्या मालकीच्या श्राची दिल्ली आरएआरएच टायगर्स संघाला लिएंडर पेसचा पाठिंबा आहे. अन्य संघाकडूनही चुरस मिळत असतानाही दिल्ली संघाने टेनिसपटू रोहन बोपण्णाची खरेदी करून बाजी मारली. २०२४ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत दुहेरीचे सुवर्णपदक मिळवणाऱ्या रोहन बोपण्णाला संघात समाविष्ट करून दिल्ली संघाने निर्णायक कामगिरी बजावली.
बेलारूसची ईरिना शायमानोविचला मिळवण्यासाठी दिल्ली संघाला प्रचंड प्रयत्न करावे लागले. ईरिनासाठी चाललेला प्रदीर्घ लिलाव जिंकताना दिल्ली संघाने विजेतेपदाच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखले. त्याच प्रमाणे ट्यूनेशियाचा २७ वर्षीय अझीझ दौव्हगाज याची झटपट खरेदी केली.

लीगचे सह संस्थापक कुणाल ठाकूर यांनी यशस्वी लिलावाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, प्रचंड प्रतिसादाबद्दल मी सर्व संघ मालकांचे आणि त्यांच्या एबेसिडर व मेंटोर या सर्वांचे आभार मानतो. पेस, भूपती आणि सानिया यांना एका व्यासपिठावर येऊन भारतातील टेनिसच्या विकासासाठी लीगला पाठिंबा देऊन सर्वांना आनंद झाला आहे

लीगच्या आणखी एक सह संस्थापक मृणाल जैन म्हणाले की, चुरशीच्या लिलावामुळे स्पर्धेचा दर्जाही सिद्ध झाला असून लिलावासाठी सर्व संघांनी आपापले नियोजन उत्तमरित्या यशस्वी केले. लिएंडर पेस, महेश भूपती व सानिया मिर्झा यांनी स्वतः लिलावाला हजार राहून लीगच्या झगमगीत यशाची ग्वाही दिली आहे.
टेनिस प्रीमियर लीग स्पर्धा ३ ते ८ डिसेंबर २०२४ दरम्यान मुंबई येथील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या टेनिस संकुलात पार पडणार आहे.

