बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाची फिक्की फ्रेम्सच्या रौप्य महोत्सवी वर्षासाठी ब्रँड ॲम्बेसीडर म्हणून निवड

फिक्की फ्रेम्स, भारतातील अग्रगण्य जागतिक मीडिया आणि मनोरंजन परिषदेचे यंदा २५ वे वर्ष साजरे होत आहे. यानिमित्ताने आयुष्मान खुराना यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

थीम: RISE – पुनःनिर्मिती, शाश्वतता आणि उत्कृष्टतेची नवीन व्याख्या

थीम फिक्की फ्रेम्सच्या बदलत्या प्रभावावर भर देते, ज्यामधून कथा सांगणं, सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणं आणि भारताच्या मीडिया व मनोरंजन क्षेत्राचा विकास घडवण्यावर भर देण्यात आला आहे. आयुष्मानची भूमिका या क्षेत्रातील उद्योग नेते आणि सर्जनशील प्रतिभांना एकत्र आणण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

जागतिक सहकार्याचे व्यासपीठ

मुंबईत दरवर्षी आयोजित होणाऱ्या फिक्की फ्रेम्समध्ये जागतिक प्रभावी व्यक्तिमत्त्वं, सर्जनशील व्यावसायिक आणि धोरणकर्ते एकत्र येतात. या कार्यक्रमात कीनोट अॅड्रेस, बी२बी मीटिंग्स, मास्टरक्लासेस, धोरण राउंडटेबल्स, बेस्ट अॅनिमेटेड फ्रेम्स (BAF) पुरस्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो.

फिक्की फ्रेम्सचा वैभवशाली इतिहास

यापूर्वी या परिषदेने ह्यू जॅकमन, जेम्स मर्डोक, गॅरी नॅल यांसारख्या जागतिक दिग्गजांना आमंत्रित केलं आहे, तसेच बॉलिवूडच्या शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, आणि अमिताभ बच्चन यांसारख्या स्टार्सचा सहभागही झाला आहे. यश चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या परिषदेने भारतीय मनोरंजन क्षेत्राच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावली आहे.

आयुष्मान खुरानाचे मत

आपल्या निवडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना आयुष्मान म्हणाले,
“फिक्की फ्रेम्सच्या रौप्य महोत्सवी वर्षात पहिला ब्रँड अॅम्बेसेडर होण्याचा सन्मान माझ्या वाट्याला आला आहे, हे खूप मोठं भाग्य आहे. चंदीगडहून मुंबईत फक्त स्वप्नं उराशी बाळगून आलेल्या माझ्या प्रवासात, कामाने लोकांना प्रभावित करणं आणि भारताच्या समृद्ध पॉप कल्चरचा भाग बनणं खूप खास आहे. या नव्या भूमिकेत मी नाविन्य, परिवर्तन आणि उत्कृष्टता यासाठी फिक्कीसोबत काम करण्यास उत्सुक आहे.”

नेतृत्व आणि फोकस क्षेत्रं

सध्या केविन वाझ (सीईओ, वायकॉम १८) यांच्या नेतृत्वाखाली फिक्की फ्रेम्स कार्यरत आहे, तर संध्या देवनाथन (व्हीपी, मेटा इंडिया) आणि अर्जुन नोहवार (जीएम, वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी) हे सह-अध्यक्ष आहेत. यंदाच्या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी वास्तव, डिजिटल कंटेंट क्रिएशन, आणि मेटाव्हर्स यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला जाणार आहे.

एक ऐतिहासिक कार्यक्रम

२५ वे फिक्की फ्रेम्स हे स्टार पॉवर, औद्योगिक नाविन्य आणि जागतिक महत्त्वाचा संगम ठरणार आहे. आयुष्मान खुराना या ऐतिहासिक प्रसंगी नेतृत्व करत असून, भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राची नवीन शक्यता ओळखण्यासाठी हा कार्यक्रम मार्गदर्शक ठरेल.

Leave a comment