
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत कार्यानुभव विभागामार्फत आयोजित विभागीय मध्यवर्ती विद्यार्थी कलाकृती स्पर्धा व प्रदर्शन पारितोषिक वितरण कार्यक्रम 2024-2025 मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम दिनांक 06 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या वेळेत संपन्न झाला.
सन्माननीय शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ साहेब व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुजाता खरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यानुभव विभागाच्या निदेशक श्रीम. तृप्ती पेडणेकर मॅडम यांनी या स्पर्धेचे नियोजन केले.
मुंबईभरातील 8000 विद्यार्थ्यांचा सहभाग

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 25 वॉर्डमधील 54 स्पर्धा केंद्रांवर ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व भाषिक शाळा, एम.पी.एस., सीबीएसई, आयसीएसई इत्यादी शाळेतील 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
एकूण 8000 विद्यार्थ्यांनी सुंदर आणि आकर्षक कलाकृती सादर केल्या, त्यातील उत्कृष्ट कलाकृतींना बक्षिसे देण्यात आली. तसेच, कार्यानुभव शिक्षकांनी तयार केलेल्या विषयनिहाय उत्तम कलाकृतींना देखील पारितोषिके प्रदान करण्यात आली.
परळ भोईवाडा मनपा शाळा संकुलात भव्य पारितोषिक वितरण सोहळा

स्पर्धेत विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा गुणगौरव सोहळा 06 फेब्रुवारी 2025 रोजी परळ भोईवाडा मनपा शाळा संकुलातील सभागृहात संपन्न झाला. या प्रसंगी सन्माननीय शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुजाता खरे मॅडम, उपशिक्षणाधिकारी श्रीमती ममता राव मॅडम, उपशिक्षणाधिकारी (PPCL) श्री. मुख्तार शहा सर, अधिक्षिका श्रीमती सायली सुर्वे मॅडम, उपशिक्षणाधिकारी श्रीमती सीमा चतुर्वेदी मॅडम आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध टीव्ही मालिका अभिनेत्री पूनम चांदोरकर मॅडम उपस्थित होत्या.
या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
उत्साहात संपन्न झालेला सोहळा

एकंदरीत, मध्यवर्ती विद्यार्थी व शिक्षक कलाकृती स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात आणि आनंदात पार पडला. शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळाला तसेच शिक्षकांच्या कौशल्याचा देखील गौरव करण्यात आला.
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या या उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक व्यक्त केले आणि भविष्यातही अशा उपक्रमांच्या आयोजनाची गरज असल्याचे सांगितले.
