
‘लाडली बेटीयाँ’ चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक संदेश
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमातून प्रेरणा घेत “लाडली बेटीयाँ” हा हिंदी चॅरिटी चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती इरॉस इंटरनॅशनल मीडिया लिमिटेड, नेदरलँड येथील आरएफआय स्टुडिओ, नेपाळ फिल्म असोसिएशन आणि उत्तराखंड सरकार यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आली असून, हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर फडणवीस यांचा सन्मान
या सामाजिक कार्याच्या गौरवार्थ, सुरिनाम देशात आयोजित समारंभात राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना INSCR 2025 हा आंतरराष्ट्रीय विशेष गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची ही आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.
सुरेश धस आणि नवकिरण संस्थेचे अभिनंदन
या सन्मानानंतर आमदार सुरेश धस यांनी नवकिरण संस्था, बीड जिल्हा पोलिस फाऊंडेशन आणि सुरिनाम प्रशासनाचे अभिनंदन केले. लवकरच आमदार सुरेश धस, नवकिरण संस्था पोलिस फाऊंडेशनचे सदस्य आणि श्री. राकेश गायकवाड यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात एक विशेष कार्यक्रम आयोजित करून या पुरस्काराचे औपचारिक वितरण केले जाणार आहे, अशी माहिती नवकिरण संस्था (फिल्म्स) पोलिस फाऊंडेशनतर्फे देण्यात आली.
