
प्राईम व्हिडिओने ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ही फिल्म स्वप्नं, धैर्य आणि संघर्षाची प्रेरणादायी झलक घेऊन आली असून, एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मित आहे. दिग्दर्शक दानिश रेंजू यांनी या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन केले असून निर्मिती शफत काझी आणि दानिश रेंजू यांनी केली आहे.
राज बेगम यांच्या जीवनावर आधारित कथा
‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’ ही कहाणी काश्मीरच्या पहिल्या महिला पार्श्वगायिका, पद्मश्री पुरस्कार विजेत्या राज बेगम यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या संघर्षमय संगीतप्रवासाला वाहिलेली ही एक आदरांजली आहे. या चित्रपटाच्या लेखनात निरंजन अयंगार आणि सुनयना कचरू यांनीही योगदान दिले आहे. चित्रपटाची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंट, अॅपल ट्री पिक्चर्स आणि रेंजू फिल्म्स यांनी संयुक्तपणे केली आहे.
कलाकारांचा प्रभावी अभिनय
या चित्रपटात सबा आझाद, सोनी रझदान, झैन खान दुर्रानी, शीबा चड्ढा, तारुक रैना, शिशिर शर्मा आणि लिलेट दुबे यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. सबा आझाद तरुण नूर बेगमची भूमिका साकारत असून सोनी रझदान वृद्ध नूर बेगमच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभय सोपोरी यांच्या संगीतात आणि मस्रत उन्न निसा यांच्या गायकीत या चित्रपटाला एक वेगळीच उंची लाभली आहे.
धैर्य आणि स्वातंत्र्याची प्रेरणादायी कहाणी
ट्रेलरमध्ये नूर बेगमच्या संघर्षमय प्रवासाची झलक दाखवली असून सामाजिक बंधनांना तोडून स्वतःच्या स्वप्नांसाठी लढणाऱ्या प्रतिभावान गायिकेची ही कथा आहे. चित्रपटातून काश्मीरच्या समृद्ध संगीत परंपरेचं भावस्पर्शी दर्शन घडतं. सबा आझाद म्हणते, “राज बेगम यांच्यासारख्या दिग्गज गायिकेची भूमिका करणं ही वेगळीच अनुभूती आहे. ही कथा महिलांच्या धैर्याची आणि स्वातंत्र्याची आहे.”
सोनी रझदानही म्हणाल्या, “ही कथा मी स्क्रिप्ट वाचताच मनाला भिडली. ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’ काश्मीरच्या संगीत परंपरेला आदरांजली आहे आणि राज बेगम यांच्या असामान्य जीवनाची खरी ओळख प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते.”
प्रीमियरची तारीख
‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’ २९ ऑगस्ट २०२५ रोजी भारतासह जगभरातील २०० हून अधिक देशांमध्ये प्राईम व्हिडिओवर एक्सक्लुझिव्ह प्रीमियर होणार आहे.
