
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या आगामी ‘निशानची’ या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरे पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्याचबरोबर तो गीतकार आणि संगीतकार म्हणूनही पदार्पण करत आहे. झी म्युझिक कंपनीने नुकतंच रिलीज केलेलं ‘पिजन कबूतर’ हे गाणं त्याच्या संगीत कारकिर्दीची धमाकेदार सुरुवात ठरत आहे.
‘पिजन कबूतर’ गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ
या गाण्याचे बोल आणि संगीत ऐश्वर्य ठाकरे यांनी स्वतः लिहून संगीतबद्ध केले आहेत, तर गायक भूपेश सिंग यांनी हे गाणं सादर केलं आहे. खास हिंग्लिश स्टाईलमधील हे गाणं मजेशीर लिरिक्स आणि जोशपूर्ण बीट्समुळे तरुणाईच्या ओठांवर झटपट रुळलं आहे. गाण्याची हुकलाइन – “पिजन कबूतर भइया, उड़न फ्लाई, लुक देखो आसमान इस्काई” – सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चित्रपटातील डबल रोल आणि हटके साउंडट्रॅक
‘निशानची’ मध्ये ऐश्वर्य ठाकरे डबल रोलमध्ये झळकणार असून त्याचा अभिनय प्रेक्षकांसाठी नवा अनुभव ठरणार आहे. त्याच्यासोबत वेदिका पिंटो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मोनिका पनवार, मोहम्मद झीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांच्या भूमिकाही कथेला बळकटी देणार आहेत. या चित्रपटाच्या संगीत अल्बममध्ये तब्बल १५ गाणी असून ‘पिजन कबूतर’ हे एक वेगळं आणि लक्षवेधी गाणं ठरत आहे.
ऐश्वर्य ठाकरेची भावनिक प्रतिक्रिया
या गाण्याविषयी ऐश्वर्य ठाकरे म्हणतो, “मी जेव्हा अभिनयाला सुरुवात केली तेव्हाच ठरवलं होतं की माझ्या पहिल्या चित्रपटात स्वतःचं गाणं आणायचं. एकदा रात्री उशिरा कीबोर्ड आणि गिटारवर प्रयोग करताना गाण्याची कल्पना सुचली. सकाळपर्यंत पूर्ण गाणं तयार झालं. मी अनुराग सरांना पाठवलं आणि त्यांनी पाच हार्ट इमोजीसह उत्तर दिलं – ‘हे माझं आवडतं गाणं आहे. पूर्ण कर आणि पाठव.’”
गायक भूपेश सिंग यांचा अनुभव
भूपेश सिंग यांनी सांगितलं, “हे गाणं गाताना मला खूप आनंद मिळाला. ऐश्वर्यच्या बोलांमध्ये वेगळी मजा आहे आणि संगीतही तितकंच धमाल आहे. या गाण्यामुळे माझ्या आवाजात नवा प्रयोग करता आला. हे गाणं ‘निशानची’च्या कथानकात अगदी फिट बसतं.”
‘निशानची’ – दोन भावांची गुंतागुंतीची कथा
हा चित्रपट दोन भावांवर आधारित आहे, जे एकमेकांपासून खूप भिन्न आहेत आणि त्यांच्या निर्णयांमुळे त्यांच्या आयुष्याची दिशा ठरते. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित ही कथा रॉ, उर्जेने परिपूर्ण आणि देसी फ्लेवरने भरलेली आहे.
प्रदर्शनाची तारीख आणि निर्मिती
अॅमेझॉन MGM स्टुडिओज इंडिया सादर करत असलेला ‘निशानची’ हा चित्रपट जार पिक्चर्स आणि फ्लिप फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झाला आहे. प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी मिळून कथा लिहिली आहे. अॅक्शन, ह्युमर आणि ड्रामाचा मिलाफ असलेला हा फुल मसाला एंटरटेनर चित्रपट येत्या १९ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.
