WIFF 2025 चा भव्य प्रारंभ आणि सिनेप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती

२ ऑक्टोबरला सुरू झालेल्या वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल (WIFF) ने सुरुवातीलाच प्रेक्षकांची मने जिंकली. २ ते ६ ऑक्टोबरदरम्यान पार पडणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये शॉर्ट फिल्म स्क्रिनिंग, मास्टरक्लासेस आणि पॅनेल डिस्कशन्सचे आयोजन करण्यात आले असून चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ, दिग्दर्शक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कबीर खुराना क्युरेटेड शॉर्ट फिल्म विभागात नवोदितांना संधी

फेस्टिव्हलचा एक खास आकर्षण ठरला तो स्वतंत्र दिग्दर्शक कबीर खुराना यांचा शॉर्ट फिल्म विभाग. त्यांनी नवोदितांना मार्गदर्शन करत “WIFF हे स्वतंत्र फिल्ममेकरसाठी प्रेरणादायी आणि सशक्त व्यासपीठ आहे” असं मत व्यक्त केलं.

राजेश मापुस्करांचा मास्टरक्लास ठरला संस्मरणीय

दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी ‘व्हेंटिलेटर’ लिहिण्यामागची गोष्ट उलगडताना सांगितलं, “हा चित्रपट लिहायला मला ४८ वर्ष लागली. जॉइंट फॅमिलीतील अनुभव, भावनिक संघर्ष आणि कुटुंबातील संवाद यातून ही कथा जन्माला आली.” त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांची मने जिंकली.

सुचित्रा कृष्णमूर्तींची निर्भीड मते आणि दिग्गजांची चर्चा

अभिनेत्री आणि साहित्यिक सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी “नेपोटिझमवरील चर्चा हास्यास्पद असून ती आज लोभी संस्कृती बनली आहे” असं ठाम मत मांडलं. दरम्यान, दिग्दर्शक हंसल मेहता, तुषार हीरानंदानी, रोहन सिप्पी आणि विशाल फुरिया यांच्या चर्चेत ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बदल आणि स्वतंत्र चित्रपटांच्या संधींबद्दल सखोल चर्चा झाली.

‘श्यामची आई’च्या स्क्रिनिंगने फेस्टिव्हलचा पहिला दिवस उजळला

राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुजय डहाके यांच्या ‘श्यामची आई’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगने फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवसाला खास स्वर दिला. या सर्व कार्यक्रमांमुळे वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल सिनेप्रेमींसाठी ज्ञान, प्रेरणा आणि आनंदाचं केंद्र बनला आहे.

Leave a comment