वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा समारोप सोहळा दिमाखात संपन्न !

मास्टरक्लास, सेलिब्रिटी पॅनल, स्क्रिनिंग आणि वर्कशॉप्सची रंगतदार सांगता

वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल (WIFF) च्या पहिल्या आवृत्तीचा दिमाखात समारोप झाला असून, या फेस्टिव्हलने चित्रपटप्रेमी, इंडस्ट्रीतील तज्ज्ञ आणि स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांना एकत्र आणत सिनेप्रेमाचा एक सुंदर उत्सव साजरा केला. फेस्टिव्हलच्या समारोप सोहळ्यात विविध आकर्षक कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.

अॅक्टर्स पॅनल डिस्कशन ठरलं आकर्षणाचा केंद्रबिंदू

फेस्टिव्हलमधील एक प्रमुख आकर्षण ठरलं ते म्हणजे अॅप्लॉज एंटरटेनमेंट द्वारे आयोजित “अॅक्टर्स पॅनल डिस्कशन”. या सत्रात अनेक दिग्गज कलाकार प्रतीक गांधी, प्रिया बापट, अमित सिअल, सुरवीन चावला आणि श्वेता बासू प्रसाद सहभागी झाले होते. त्यांनी अभिनयाच्या प्रवासातील अनुभव आणि उद्योगातील बदलांवर मोकळेपणाने चर्चा केली. प्रतीक गांधी यांनी प्रादेशिक उच्चार असलेल्या कलाकारांना मिळणाऱ्या मर्यादित संधींबद्दल बोलताना म्हटलं, “गुजराती किंवा मराठी उच्चार असलेल्या कलाकारांकडे दुर्लक्ष केलं जातं, पण पंजाबी किंवा बिहारी उच्चार असलेल्यांना अधिक संधी मिळतात.” तर अभिनेते अमित सिअल म्हणाले, “चित्रपट यशस्वी झाला तर श्रेय दिग्दर्शकाचं; आणि नाही झाला, तरी जबाबदारीही त्याचीच असते.” अभिनेत्री प्रिया बापट हिने आपल्या “साबर बोंड” चित्रपटाच्या यशाचा उल्लेख करत अभिमानाने त्या चित्रपटासाठी टाळ्यांचा कडकडाट करण्याची विनंती केली.

मास्टरक्लासेस आणि स्क्रिनिंग्सनी वाढवली फेस्टिव्हलची शान

फेस्टिव्हलदरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रावैल यांच्यासोबत ‘फिल्ममेकिंग अड्डा सेशन’ आयोजित करण्यात आलं, जिथे त्यांनी प्रेक्षकांसोबत आपले अनुभव आणि विचार शेअर केले. तसेच, “P for Paparazzi” या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सत्रात दिग्दर्शिका दिव्या खर्नारे आणि पापाराझी मनोज महरा यांच्याशी झालेल्या खास गप्पांमधून प्रेक्षकांना पापाराझींच्या जीवनातील अनोख्या अनुभवांची ओळख झाली.

पुरस्कार वितरण सोहळ्याने वाढवली समारोपाची शोभा

WIFF च्या समारोप सोहळ्यात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये डॉक्युमेंटरी आणि एक्सपेरिमेंटल फिल्म्स, फिक्शन शॉर्ट फिल्म्स, फिक्शन फीचर फिल्म्स आणि सामाजिक विषयांवरील सर्वोत्तम चित्रपट अशा अनेक श्रेणींमध्ये विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

संस्थापक आणि क्युरेटर्सनी मांडले फेस्टिव्हलविषयी विचार

WIFF च्या सह-संस्थापक दीपा गहलोत म्हणाल्या, “WIFF म्हणजे विविध कथांचा आणि दृष्टिकोनांचा उत्सव होता.” तर सह-संस्थापक विनता नंदा म्हणाल्या, “फेस्टिव्हलला मिळालेला प्रतिसाद आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक होता. प्रेक्षकांनी इंडी सिनेमा मनापासून स्वीकारल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.”

फेस्टिव्हल क्युरेटर श्रीधर रंगायन यांनी सांगितलं, “WIFF चे उद्दिष्ट असे चित्रपट सादर करणे होते जे समाजातील रूढ कल्पनांना आव्हान देतात आणि अर्थपूर्ण संवादांना चालना देतात. विविध चित्रपट आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून आम्ही ते साध्य केल्याचा आम्हाला अभिमान आहे.”

आगामी आवृत्तीची उत्सुकता वाढली

वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलला टुली रिसर्च सेंटरचा पाठिंबा मिळाला असून, या फेस्टिव्हलने मुंबईतील स्वतंत्र सिनेमाला नवं व्यासपीठ दिलं आहे. फेस्टिव्हलच्या यशस्वी समारोपानंतर प्रेक्षक आणि सिनेप्रेमींच्या मनात आता WIFF च्या पुढील आवृत्तीबद्दल उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Leave a comment