रहस्य, एक्शन आणि भावनांचा संगम; ‘आफ्टर ओ.एल.सी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

ट्रेलरमधील थरारक वातावरण
‘आफ्टर ओ.एल.सी’च्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये रहस्याची उर्मी पुन्हा जागवली आहे. पहिल्या फ्रेमपासून दाटलेला तणाव, अनपेक्षित वळणं आणि भूतकाळातील गूढ धागे या सर्वांनी ट्रेलरला विलक्षण गती मिळाली आहे. ट्रेलर पाहताच प्रेक्षकांच्या मनात अनेक अनुत्तरित प्रश्न तयार होतात—मैत्रीचा खरा अर्थ, विश्वासघाताची किंमत आणि दडलेलं गूढ नक्की काय?

कलाकारांचा दमदार अभिनय आणि दिग्दर्शनाची हातोटी
कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके यांच्या प्रभावी अभिनयाने या चित्रपटाचा गूढार्थ भक्कम झाल्याचं ट्रेलरमधून जाणवतं. प्रत्येक सीनमध्ये अभिनय आणि पात्रांच्या मनातील भावनिक संघर्ष दिसून येतो. दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी नक्षलवादी वातावरणात घडणारी कथा मांडताना लोकेशन्सपासून फ्रेमिंगपर्यंत कसोशीने केलेली मेहनत स्पष्टपणे झळकते.

एक्शन पॅक्ड सीन आणि भव्य लोकेशन्स
ट्रेलरमध्ये दिसणारे ॲक्शन सीन, डोंगराळ भागातील धोकादायक लोकेशन्स आणि दमदार बॅकग्राऊंड स्कोअर ‘आफ्टर ओ.एल.सी’ला एक मोठ्या कॅनव्हासवरील चित्रपटाची अनुभूती देतात. नक्षलवादी भागांतील वास्तवता दाखवताना डीओपीने केलेली कामगिरी उल्लेखनीय जाणवते.

संगीताची जादू
चित्रपटातील आणखी एक विशेष घटक म्हणजे संगीत. क्षितिज पटवर्धन आणि मंदार चोळकर यांनी लिहिलेली गाणी प्रेक्षकांना भावतील, तर पार्श्वगायनाची जबाबदारी अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, रोहित राऊत, आनंदी जोशी, आर्या आंबेकर आणि अभय जोधपुरकर यांनी उत्तमरीत्या पार पाडली आहे. ट्रेलरमधील संगीत चित्रपटाच्या मूडला अधिक प्रभावी बनवतं.

मराठी आणि कन्नड सिनेसृष्टीचा सुंदर संगम
‘आफ्टर ओ.एल.सी’ हा केवळ एक ॲक्शन-थ्रिलर नाही, तर दोन सिनेसृष्टींच्या हातमिळवणीचा सुंदर परिणाम आहे. निर्माते दिपक पांडुरंग राणे, विजयकुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत या भव्य प्रकल्पाची निर्मिती केली आहे.

प्रदर्शनाची तारीख
प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा ‘आफ्टर ओ.एल.सी’ येत्या २८ नोव्हेंबरला जगभरात मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Leave a comment