
लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये DDLJ चा पहिला भारतीय पुतळा
यश राज फिल्म्सच्या कालातीत ब्लॉकबस्टर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ) ला ३० वर्षे पूर्ण होत असताना, शाहरुख खान आणि काजोल यांनी लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये राज–सिमरनच्या प्रतिष्ठित पोजमधील कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. लीसेस्टर स्क्वेअरमध्ये कोणत्याही भारतीय चित्रपटाचा हा पहिलाच पुतळा असून तो भारतीय सिनेमासाठी एक ऐतिहासिक सन्मान मानला जात आहे.
जगभरातील दक्षिण आशियाई प्रेक्षकांना दिलेली आदरांजली
राज–सिमरनची ही कांस्य प्रतिमा DDLJ च्या सांस्कृतिक वारशाला उजाळा देणारी आहे. तीन दशकांपासून जगभरातील दक्षिण आशियाई समुदायासाठी या चित्रपटाने निर्माण केलेल्या भावनिक नात्याचा गौरव करण्यासाठी हा सन्मान देण्यात आला. ‘सीन्स इन द स्क्वेअर’ या जागतिक दर्जाच्या ट्रेलमध्ये या पुतळ्याचा समावेश झाला असून याच्या अनावरणाला शाहरुख–काजोल सोबत YRF चे सीईओ अक्षय विधानी आणि हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्सच्या सीईओ रोज मॉर्गन उपस्थित होते.

शाहरुख खानची भावुक प्रतिक्रिया
अनावरणावेळी बोलताना शाहरुख खान म्हणाले की DDLJ हा सच्च्या मनाने बनवलेला चित्रपट असल्यामुळेच ३० वर्षांनंतरही तो लोकांच्या मनात तितकाच ताजा आहे. त्यांनी यूकेमधील प्रेक्षक आणि हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्सचे आभार मानले आणि हा क्षण “कधीच विसरणार नाही” असे नमूद केले. तसेच आदित्य चोप्रा आणि संपूर्ण यश राज टीमसोबत हा आनंद शेअर करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
काजोलची आठवणींनी भरलेली प्रतिक्रिया
काजोल म्हणाली की ३० वर्षांनंतरही डीडीएलजे ला मिळणारे प्रेम अविश्वसनीय आहे. लंडनमध्ये पुतळा उलगडण्याचा क्षण तिला पुन्हा १९९५ च्या प्रवासात घेऊन गेल्यासारखा वाटला. लीसेस्टर स्क्वेअरचे DDLJ शी असलेले ऐतिहासिक नाते पाहता हा सन्मान अधिकच खास ठरल्याचे तिने सांगितले.
डीडीएलजे आणि लीसेस्टर स्क्वेअरचे जुनं नातं
लीसेस्टर स्क्वेअरमध्ये चित्रपटातील एक संस्मरणीय दृश्य शूट झाले होते—राज आणि सिमरन पहिल्यांदा एकमेकांच्या मार्गावरून जातात पण लक्षातही येत नाही. त्या दृश्यातील व्ह्यू आणि ओडियन थिएटर्स स्पष्ट दिसतात आणि आज त्या ठिकाणीच चित्रपटाचा पुतळा उभा राहणे हे चाहत्यांसाठी भावनिक क्षण ठरले.
३० वर्षांचा जागतिक सांस्कृतिक वारसा
१९९५ मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर DDLJ जागतिक phenomenon बनला. दक्षिण आशियाई समुदायासाठी तो सांस्कृतिक ओळखीचा आधार ठरला आणि भारतात आजही सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट म्हणून त्याचा विक्रम कायम आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीसुद्धा भारत भेटीदरम्यान DDLJ चा उल्लेख केला होता. यावर्षी ‘कम फॉल इन लव – द DDLJ म्यूजिकल’ ने मँचेस्टरमध्ये यशस्वी रंगभूमी प्रयोग सादर केला.
आयकॉनिक पात्रांच्या शेजारी DDLJ
हा पुतळा आता ‘सीन्स इन द स्क्वेअर’ ट्रेलचा अधिकृत भाग झाला आहे. येथे आधीच हैरी पॉटर, मैरी पॉपिन्स, पैडिंगटन, सिंगिंग इन द रेन, बैटमॅन आणि वंडर वुमन यांसारख्या जागतिक सिनेमातील आयकॉनिक पात्रांचे पुतळे आहेत. त्या यादीत राज–सिमरनची भर पडणे हे भारतीय सिनेमासाठी अभिमानाचे पाऊल आहे.
YRF चे सीईओ अक्षय विधानी यांची प्रतिक्रिया
अक्षय विधानी म्हणाले की YRF पाच दशकांहून अधिक काळ भारतीय कथा जगभर पोहचवत आहे आणि DDLJ ला यूकेमध्ये असा मान मिळणे हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. लीसेस्टर स्क्वेअरवरील हा सन्मान डीडीएलजे चा जागतिक सांस्कृतिक ठसा अधोरेखित करतो आणि स्टुडिओला पुढे आणखी मोठी स्वप्नं पाहण्याची प्रेरणा देतो.
