
गुढीपाडव्याच्या उत्सवी वातावरणात संगीताची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. भक्तिगीतांच्या सुमधुर सादरीकरणाने आणि भावस्पर्शी गायनशैलीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात ज्येष्ठ गायक, गानसम्राट गोमंतक विभूषण पुरस्काराने सन्मानित अजित कडकडे यांची विशेष ‘अजित कडकडे संगीत रजनी’ बुधवार, १८ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे आयोजित करण्यात आली आहे.
भक्तिगीत, नाट्यसंगीत आणि भावगीतांचा सुरेल संगम

दर्शन क्रिएशन्स आणि शु-हर्ष इंटरप्राइझेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात भक्तिगीत, नाट्यसंगीत आणि भावगीतांचा सुंदर संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. मराठी संगीत परंपरेतील अनेक गाजलेल्या रचनांचा आस्वाद या विशेष संगीत रजनीमध्ये रसिकांना मिळणार आहे.
लोकप्रिय आणि कालातीत गीतांची मैफल

या संगीत रजनीमध्ये प्रख्यात गायक अजित कडकडे आपल्या अनेक लोकप्रिय आणि कालातीत रचना सादर करणार आहेत. “निघालो घेऊन दत्ताची पालखी”, “अवघे गर्जे पंढरपूर”, “अबीर गुलाल उधळीत रंग”, “कांटा रुते कुणाला”, “नाही पुण्याची मोजणी”, “स्वामी कृपा कधि करणार”, “सजल नयन नित धार” आणि “कैवल्याचा चांदण्याला” अशा अवीट गोडीच्या गीतांचा आस्वाद रसिकांना प्रत्यक्ष घेता येणार आहे.
रसिकांच्या आग्रहाखातर विशेष आयोजन
अजित कडकडे यांच्या चाहत्यांकडून त्यांच्या विशेष संगीत रजनीचे आयोजन व्हावे, अशी मागणी वारंवार होत होती. हीच भावना लक्षात घेऊन दर्शन क्रिएशन्स आणि शु-हर्ष इंटरप्राइझेस यांनी पुढाकार घेत कडकडे यांना या कार्यक्रमासाठी विनंती केली असता त्यांनी रसिकांसाठी आनंदाने होकार दिला, अशी माहिती आयोजक समीर बापर्डेकर यांनी दिली.
अनघा मोडक करणार निरूपण
या कार्यक्रमाच्या निरूपणाची धुरा सुप्रसिद्ध निरूपणकार अनघा मोडक सांभाळणार आहेत. अभ्यासपूर्ण मांडणी, ओघवती आणि प्रभावी वाणी तसेच विषयाचे सखोल आकलन ही त्यांची खास वैशिष्ट्ये मानली जातात. संगीत, साहित्य आणि सांस्कृतिक परंपरांचा उत्तम अभ्यास असल्यामुळे त्या प्रत्येक कार्यक्रमाला वेगळी उंची देतात. रसिकांशी सहज संवाद साधत कार्यक्रमातील प्रत्येक सादरीकरणाचा आशय सुंदरपणे उलगडून सांगण्याची त्यांची शैली अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे त्यांच्या निरूपणामुळे हा संपूर्ण कार्यक्रम अधिक समृद्ध, रंजक आणि संस्मरणीय ठरणार आहे.
रसिकांसाठी अनोखी संधी
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे बुधवार, १८ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता होणाऱ्या या बहुप्रतीक्षित संगीत रजनीमध्ये अजित कडकडे यांच्या सुमधुर रचना प्रत्यक्ष ऐकण्याची अनोखी संधी रसिकांना मिळणार आहे. या अलौकिक दर्जाच्या संगीत सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६९९७७३८०
