Home

  • महाराष्ट्राचा महानायक परत येतोय; अशोक सराफ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक

    हिंदी-मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. अशोक मामांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलंय. मध्यंतरी काही दिवस ते छोट्या पडद्यापासून दूर होते. पण आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला ते सज्ज आहेत. “येतोय ‘महाराष्ट्राचा महानायक’ लवकरच”, असं म्हणत ‘कलर्स मराठी’ने मालिकेची पहिली झलक आऊट केली होती. त्यामुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झालं होतं. आता मालिकेचा पहिला प्रोमो आऊट करत प्रेक्षकांना एक खास सरप्राईज देण्यात आलं आहे. ‘कलर्स मराठी’च्या ‘अशोक मा.मा.’ या मालिकेच्या माध्यमातून  अशोक मामा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत.

    टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला महाराष्ट्राचा महानायक परत येतोय. नुकताच ‘अशोक मा.मा.’ या मालिकेचा उत्कंठा वाढवणारा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमो पाहताक्षणी काहीतर गूढ, थरारक असल्याचं जाणवतंय. प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेणारे, अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे अशोक मामा दिसत आहेत. तसेच ‘शिस्त म्हणजे शिस्त’ हा त्यांच्या आयुष्याचा फंडा असल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट होत आहे. पण त्यांच्या मिश्कील अंदाजाने सर्वांच्या चेहऱ्यावर ते हसू आणणार आहेत. प्रोमोतील शेवटच्या फ्रेममध्ये दारावर लावलेल्या नेम प्लेटमध्ये ‘अशोक मा.मा.’ असं दिसत आहे. एकंदरीतच अशोक मामा आणि मालिकेतील त्यांच्या पात्राचं नाव सारखंच आहे.

    ‘अशोक मा.मा.’ या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मालिकेत नक्की काय पाहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांची उत्कंठा आता वाढली आहे. तसेच अशोक मामांसह आणखी कोणते कलाकार मालिकेत झळकणार? मालिका कधीपासून सुरू होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.

    ‘अशोक मा.मा.’ मालिकेबद्दल बोलताना अशोक मामा म्हणाले,”मालिका खूपच मनोरंजक आहे. चिन्मय मांडलेकरने या मालिकेची कथा खूप चांगल्या पद्धतीने लिहिली आहे. ‘टन टना टन’ या मालिकेनंतर अनेक वर्षांनी पुन्हा ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या माध्यमातून मी टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय. शूटिंग करताना खूप मजा येतेय. प्रेक्षकांनाही ही मालिका नक्कीच आवडेल”.

  • नाम फाउंडेशन संस्थेचा ९ वा वर्धापन दिन संपन्न


    चळवळीला जर सत्त्वगुणांची जोड मिळाली, तर तिचे रूप पालटते. सध्याच्या काळात चळवळ उभी करणे तितके कठीण नाही. त्यासाठी अनुयायी मिळतात,पण ती चळवळ कार्यान्वित झाल्यावर सर्व सूत्रे  योग्य व्यक्तीच्या हातात असणे महत्त्वाचे असते. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एक एक पाऊल पुढे टाकत सुरु केलेल्या ‘नाम’ फाउंडेशन संस्थेने आपल्या अनेक विधायक कामातून यशस्वी ९ वर्ष पूर्ण केली. १० व्या वर्षात पदार्पण करीत असताना या सर्व कामांचा आढावा घेत संस्थेचा १० वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. या वर्धापन दिनाला महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वर्धापन दिनाची सुरुवात डॉ. गणेश चंदनशिवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या ‘गण’ आणि ‘गोंधळा’ ने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले त्यानंतर उदय सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नाम संस्थेचे विश्वस्त आणि सीएसआर (CSR) च्या माध्यमातून मदत करणाऱ्या प्रतिनिधींचा यावेळी कृतज्ञता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर पाटील आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती.

    सिर्फ ‘नाम’ ही काफी हे असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी ‘नाम’ फाउंडेशन संस्थेच्या कार्याचे कौतुक यावेळी केले. नेतृत्व सक्षम असेल तर समाजाच्या माध्यमातून परिवर्तन घडवता येते, हे ‘ नाम’ ने दाखवून दिल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. आपल्या ग्लॅमरचा योग्य तो उपयोग करून जनतेमध्ये विश्वास निर्माण करत लोकचळवळ उभारण्याचं काम नाना आणि मकरंद या दोन अवलियानी केलं. या चळवळीने आज वेगवेगळ्या रूपाच्या कामाने समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. दुःख आत्मसात करून जगण्याची प्रेरणा निर्माण करण्याचं काम आणि आत्मविश्वास ‘नाम’ ने आपल्या कामातून निर्माण केला आहे. विधायक कामाचा वसा अव्याहत सुरु राहावा यासाठी शासन म्हणून कायम कटिबद्ध राहत सर्वोतपरी मदत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी दिली.

    महाराष्ट्र राज्यात ‘नाम’ संस्थने जलसंधारणाच्या क्षेत्रात खूप उत्तम काम केलं आहे. त्यांचं हे काम आता राष्ट्रीय पातळीपर्यंत  पोहचणे आवश्यक आहे. नानांनी दिल्लीला येणं गरजेचं असून  सर्व ते सहकार्य करण्याची  तयारी  केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर.पाटील यांनी दाखवत नानांच्या कामाचं कौतुक केलं.  यावेळी २५ लाखाचा निधी त्यांनी ‘नाम’ संस्थेला दिला.

    याप्रसंगी बोलताना उदय सामंत म्हणले की, सामाजिक काम करणारे कलाकार म्हणून मला नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मंत्रिमंडळातील सर्व खाती चालवून विकास करण्याचं प्रामाणिक कामं करणारी ‘नाम फाउंडेशन’ संस्था आम्हा प्रत्येकासाठी आदर्श आहे. ‘नाम’ फाउंडेशन संस्थेच्या वर्धापनदिनाला उपस्थित राहिल्याने माझ्या सामाजिक आणि राजकीय कार्याला नवी ऊर्जा मिळू शकते; या विश्वासाने मी आज इकडे उपस्थित असल्याचे प्रतिपादन उदय सामंत यांनी केले. मार्केटिंग न करता विधायक काम करता येते हे ‘नाम’ फाउंडेशन संस्थेने दाखवून दिले आहे. माझ्या राजकीय वाटचालीत ही गोष्ट शिकण्यासारखी असल्याचे मला वाटते. व्हिजिलन्स म्हणून नाना ज्याप्रकारे काम करतात ते खरचं कौतुकास्पद आहे. मी नामाचा सदस्य आहे हे तुम्ही समजून घ्यावं. ९ व्या वर्धापनदिनाप्रमाणे नामाचा ९० वा वर्धापनदिन ही साजरा व्हावा अशा शुभेच्छा उदय सामंत यांनी यावेळी दिल्या.

    आम्ही हा जो वसा घेतला आहे त्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी असल्याचे अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितले. हे न संपणार कार्य असून सगळ्यांना बरॊबर घेऊन हा वसा सुरु ठेवण्याची जबादारी नव्या पिढीच्या नेतृत्वाने सक्षमपणे सांभाळावी. यासाठी आमचे आशीर्वाद कायम सोबत असतील असा विश्वास ही नानांनी यावेळी नामला सहकार्य करणाऱ्या सगळ्या मंडळींना दिला.

    सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे।परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे।।

    नाम संस्थेविषयी
    गेल्या ९ वर्षात ‘नाम’ ही संस्था १,००,८०,००० इतक्या कुटुंबांची काळजीवाहू संस्था बनली आहे आणि हासमाजसेवेचा वसा असाच अविरत ठेवणार आहे. यात आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांचाशैक्षणिक खर्च ‘नाम फाउंडेशन’ आजही अखंडितपणे करत आहे. शिवाय घरचा कर्ता पुरुष गेल्याने जी आर्थिक कुचुंबणाहोत आहे ती काही अंशी कमी होण्यासाठी कुटुंबातील एकल महिलांना पूर्वी रु. १५,००० इतके आर्थिक सहाय्य केले जायचे. परंतु या रकमेत वाढ करून रु. २५,००० करण्यात आली आहे. त्यामुळे या कुटुंबांना आधार मिळत आहे अशा कुटुंबातील मुलेशिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांना सुसज्ज असे वसतिगृह बांधून शिक्षणाचीहोणारी फरफट थांबवली आहे. शिवाय गावांगावांतील बचत गटातील महिलांना डाळ मिल,पिठाची गिरणी, शिलाई मशीन अशा सुविधा पुरवून त्यांची आर्थिक बाजू स्थिर होण्यासाठीसंस्था गेली ९  वर्ष कार्य करीत आहे. १० व्या वर्षात पदार्पण करीत असताना आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदतकरण्यापासून सुरुवात झालेली ही चळवळ जलसंधारण, महिला सक्षमीकरण, शैक्षणिक उपक्रम,आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा अशा विविध उपक्रमांद्वारे राज्यातील प्रत्येककुटुंबांपर्यंत पोहोचत आहे. समाजकार्याचा हा वसा संस्थेच्या माध्यमातून देशातीलजम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, लेह लडाख, राजस्थान, छत्तीसगड,झारखंड इत्यादी विविध राज्यातील संकटांनी प्रभावित झालेल्या कुटुंबांपर्यंतआधाराचा हात बनवून पोचली आहे. भविष्यातही ‘नाम फाउंडेशन’ ही संस्था अखंडपणे उभी राहील यात शंका नाही

  • मनोरंजनाची चवदार ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात

    झणझणीत, तिखट, कुरकुरीत, आंबट-गोड पदार्थ म्हटलं की, पाणीपुरीच आपल्या नजरेसमोर येते. पाणीपुरी म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं आणि मनालाही ते खाण्याचा मोह होतो. नात्यांच्या अशाच वेगवेगळ्या चवींची चटकदार पाणीपुरी लवकरच चित्रपटगृहात आपल्याला चाखायला मिळणार आहे. एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत. 

    प्रत्येक नात्याची स्वतःची एक गोष्ट असते.. कधी खूप आनंद, प्रेम, विश्वास देणारी तर कधी सोबत दुःख घेऊन येणारी..अशाच लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट घेऊन ‘पाणीपुरी’ हा चित्रपट आपलं मनोरंजन करणार आहे. मकरंद देशपांडे, सायली संजीव, ऋषिकेश जोशी, विशाखा सुभेदार, भारत गणेशपुरे, प्राजक्ता हनमघर, कैलास वाघमारे, शिवाली परब, प्रतिक्षा जाधव, सचिन बांगर, अनुष्का पिंपुटकर, अभय गिते आदि कलाकार मंडळी आपल्या मनोरंजनातून  ‘पाणीपुरी’ची चव आपल्याला  चाखायला देणार आहेत. 

    चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी  लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.  गीतकार मंदार चोळकर यांच्या  गीतांना  गायक मंदार आपटे, अजित परब  यांचे  स्वर लाभले आहेत. 

  • कलाकारांच्या अदाकारीने बहरणार  ‘फुलवंती’

    मराठी चित्रपट त्याच्या आशयासोबतच त्याच्या उच्चनिर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. अनेक चित्रपटातून आपल्याला त्यांच्या अभिनय सामर्थ्याची चुणूक पहायला मिळतेय. ‘फुलवंती’ या आगामी मराठी चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे.  ‘फुलवंती’ च्या रूपात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा लूक समोर आल्यानंतर या चित्रपटातील इतर कलाकारही समोर आले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्यासोबत प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले यांच्यासह मराठीतले अनेक कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात ११ऑक्टोबरला आपल्यासमोर येणार आहे.

    ‘फुलवंती’ चित्रपटासाठी अनेक कलाकारांचं एकत्र येणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. विनोदी भूमिकांसोबतच धीरगंभीर भूमिकाही ताकदीने साकारत सर्व माध्यमांवर हुकूमत गाजवण्याचं कौशल्य असणारे अभिनेते प्रसाद ओक यात ‘बाखरे सावकार नाईक’ या भूमिकेत  दिसतील. तर छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत विविध पातळीवर गाजलेलं नाव म्हणजे वैभव मांगले यात ‘मार्तंड भैरवाचार्य’ या भूमिकेत रंग भरणार आहेत. आपल्या अनोख्या अभिनयशैलीमुळे प्रसिद्ध असलेले अष्टपैलू अभिनेते ऋषिकेश जोशी ‘पंत चिटणीस’ यांची भूमिका करत आहे.  आपल्या संवेदनशील अभिनयाने आणि दिग्दर्शनाने ठसा उमटवणारी अभिनेत्री स्नेहल तरडे यात ‘लक्ष्मी’ ची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे,  क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, चेतना भट, विजय पटवर्धन, सुखदा खांडकेकर, अदिती द्रविड, निखिल राऊत, दीप्ती लेले, राया अभ्यंकर आदि मराठीतील कलाकारांची फौज ‘फुलवंती’ चित्रपटात दिसणार आहे.

    ‘फुलवंती’.. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात आपल्यासमोर अवतरणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज सादर करत आहेत… ‘फुलवंती’ मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवादलेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. संगीतकार – अविनाश विश्वजीत असून; नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

  • आगळ्या नवरा-नवरीची वेगळी लव्हस्टोरी

    २० डिसेंबरला उडगडणार ‘हे’ गुपित

    शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. आजच्या काळातील ‘हॅशटॅग’ ही संकल्पना आणि लग्न यावर आधारित हा चित्रपट आहे.  या सिनेमाचे दिग्दर्शन, लेखन आनंद दिलीप गोखले यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते शेखर विठ्ठल मते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान एकत्र येत आहेत.

    नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लग्नाच्या वेषात घोड्यावर मुंडावळ्या बांधलेला नवरदेव दिसत आहे तर त्याच्यामागे ऑफिसच्या पेहरावात बसलेली नवरी दिसत आहे. त्यामुळे नक्की हा काय प्रकार आहे, असा प्रश्न पोस्टर पाहून प्रथमदर्शनी डोक्यात येतोय.

    यात लग्नकार्यातील धमाल तर आहेच. याशिवाय आजच्या काळातील लग्न, पिढीचे विचारही दिसणार आहेत तसेच दोघांच्या प्रवासाची पार्श्वभूमीही वेगळी असल्याने चित्रपटाची कथा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल, असे म्हणायला हरकत नाही.

    चित्रपटाबाबत दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “आयुष्याच्या वाटेवर लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. आत्ताची पिढी लग्न हा विषय आणि नातेसंबंधांवर काय भाष्य करते, यावर आधारित असणारा हा चित्रपट सर्वांनाच आपलासा वाटेल, असा आहे.  त्यामुळे या चित्रपटातील वेगळेपणा बघण्यासाठी प्रेक्षकांना २० डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.”

  • बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिव्हल’मध्ये प्रीमियर झालेला ‘घात’ हा चित्रपट 27 सप्टेंबर प्रदर्शित होणार

    मुंबई, सप्टेंबर 2024: अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्याचा वर्ल्ड प्रीमियर दिमाखात पार पडला तो, छत्रपाल निनावे यांचा ‘घात’ हा मराठी सिनेमा आता महाराष्ट्रातल्या थिएटरमध्ये प्रदर्शित होतो आहे. माओवादी बंडखोरांनी घेरलेल्या जंगलात हा सिनेमा आकाराला येतो. माओवादी बंडखोर, सामान्य नागरिक, पोलिस यांच्यातील तणावपूर्ण आणि रहस्यपूर्ण पार्श्वभूमीवर सिनेमा रंगत जातो.

    शिलादित्य बोरा यांची ”प्लॅटून वन’, मनीष मुंद्रा यांची ‘दृश्यम फिल्म्स’ आणि मिलापसिंह जडेजा, संयुक्ता गुप्ता आणि कुणाल कुमार यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘घात’ सिनेमाची स्टारकास्टही अगदी तगडी आहे. यातील कलाकार हे फक्त स्टार नसून खरेखुरे अभिनेते आहेत. मराठीतील अत्यंत संवेदनशील अभिनेता जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची अडारकर, धनंजय मांडवकर आणि जनार्दन कदम यांनी सिनेमात काम केलेलं आहे. या सिनेमाची सिनेमेटोग्राफी केली आहे, उदित खुराणा यांनी. नेटफ्लिक्सवरची ‘द हंट फॉर वीरप्पन’ ही डॉक्युमेंट्री तसेच आणि हुमा कुरेशी स्टारर ‘बयान’ असे तगडे प्रोजेक्ट नुकतेच पूर्ण केलेल्या खुराणांची सिनेमेटोग्राफी हेही ‘घात’चं आणखी एक वेगळेपण आहे.

    भारतातील रिलीजबद्दल लेखक-दिग्दर्शक छत्रपाल निनावे विशेष उत्सुक आहे. “घात हा एक खोल आशय असलेला सिनेमा आहे. विश्वास आणि कुणीतरी दगा दिल्यावर होणारा विश्वासघात दोन्हीचं चित्रण करणारा ‘घात’महाराष्ट्रातील अशा दुर्गम भागात घडतो जिथे कायद्याचं राज्य तर आहे पण अंमल नाही. जिथे प्रत्येक पावलावर काहीतरी भयप्रद काहीतरी धोकादायक दडलेलं असू शकतं, तशी भीती असते. तरीही तिथे जीवनाचा एक प्रवाह चाललेला आहे. तिथल्या आयुष्यातली नैतिक-अनैतिकता निराळी आहे. त्यांच्या दुविधा निराळ्या आहेत, त्यातून आकार घेणारं जगणं निराळं आहे. त्यामुळेच अनेक भावभावनांचं मिश्रण असलेली ही कथा भारतीय प्रेक्षकांसमोर आणताना मी विशेष उत्सुक आहे. या सिनेमाद्वारे एका निराळ्या वास्तवाचा अनुभव घेण्यासाठी मी प्रेक्षकांना आमंत्रित करतो आहे. घात-जिथे विश्वास दुर्मीळ आहे आणि तिथल्या जीवाची किंमत पावलापावलावर मोजावी लागते. 
    ‘घात’या 124-मिनिटांच्या क्राईम थ्रिलरची निवड भारतातील फिल्म बाजार येथील वर्क-इन-प्रोग्रेस लॅबसाठी करण्यात आली होती. जिथे सिनेमाने लॅब अवॉर्ड मिळवलं. तर बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमधील GWFF बेस्ट फर्स्ट फीचर अवॉर्डसाठीही नामांकन मिळाले होते. या चित्रपटाचा भारतातील प्रीमियर Jio MAMI 2023 आणि त्यानंतर केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFK) झाला.

    चित्रपटाचे निर्माते शिलादित्य बोरा म्हणतात, “घात हा एक अनवट हिरा आहे. एक निर्माता म्हणून, मी नेहमीच वेगळ्या सिनेमांकडे आकर्षित होतो. खरोखरच आपल्या मातीतल्या गोष्टी जगापुढे आणणारा ‘घात’ हा असाच एक सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे, तो थिएटरमध्ये पाहण्याचा अनुभव वास्तवाइतकाच खास असेल असा मला विश्वास आहे असं बोरा म्हणतात. ९० व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत एंट्री असलेला ‘न्यूटन’, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-विजेता ‘पिकासो’, मराठी जापनीज रॉमकॉम ‘तो, ती आणि फुजी’आणि हुमा कुरेशीचा आगामी ‘बयान’आदी प्रोजेक्टसाठी शिलादित्य बोरा यांनी निर्माता म्हणून भूमिका बजावलेली आहे. 


    ‘घात’या 124-मिनिटांच्या क्राईम थ्रिलरची निवड भारतातील फिल्म बाजार येथील वर्क-इन-प्रोग्रेस लॅबसाठी करण्यात आली होती. जिथे सिनेमाने लॅब अवॉर्ड मिळवलं. तर बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमधील GWFF बेस्ट फर्स्ट फीचर अवॉर्डसाठीही नामांकन मिळाले होते. या चित्रपटाचा भारतातील प्रीमियर Jio MAMI 2023 आणि त्यानंतर केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFK) झाला.

    चित्रपटाचे निर्माते शिलादित्य बोरा म्हणतात, “घात हा एक अनवट हिरा आहे. एक निर्माता म्हणून, मी नेहमीच वेगळ्या सिनेमांकडे आकर्षित होतो. खरोखरच आपल्या मातीतल्या गोष्टी जगापुढे आणणारा ‘घात’ हा असाच एक सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे, तो थिएटरमध्ये पाहण्याचा अनुभव वास्तवाइतकाच खास असेल असा मला विश्वास आहे असं बोरा म्हणतात. ९० व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत एंट्री असलेला ‘न्यूटन’, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-विजेता ‘पिकासो’, मराठी जापनीज रॉमकॉम ‘तो, ती आणि फुजी’आणि हुमा कुरेशीचा आगामी ‘बयान’आदी प्रोजेक्टसाठी शिलादित्य बोरा यांनी निर्माता म्हणून भूमिका बजावलेली आहे. 

    स्वप्न ऑस्करचं
    ‘घात’ सिनेमाच्या टीमने थेट ऑस्करचं स्वप्न पाहिलं आहे. आणि भारतातून ऑस्करला जाणाऱ्या अधिकृत सिनेएंट्रीसाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. २७ सप्टेंबर २०२४ ला सिनेमा संपू्र्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. त्यानंतरच्या आठवड्यात भारतातील महानगरे आणि प्रमुख शहरांत तसेच नॉर्थ अमेरिकेतील थिएटरमध्ये सिनेमा प्रदर्शित होईल. ‘घात’शी जोडली गेलेली नावं अत्यंत प्रतिष्ठित आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माता आणि सिनेमॅटोग्राफर, हे प्रतिष्ठित बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे माजी विद्यार्थी आहेत.

    दिग्दर्शक म्हणतात,
    कधीतरी जीवघेणा तर कधीतरी जीव वाचवणाऱ्या विश्वासाच्या नाजुक नात्यावर घात या सिनेमाची कथा आधारित आहे. घात या शब्दाचे मराठीत दोन अर्थ आहेत. एक म्हणजे विश्वासघात आणि दुसरा म्हणजे हल्ला. नातेसंबंधातील विश्वासघातातून मानवी मनावर होणाऱ्या एकप्रकारच्या हल्ल्याचा, दगाफटक्याचा हा प्रवास आहे, ही नात्यांची गुंतागुंत आहे. महाराष्ट्रातल्या दुर्गम आणि अनवट पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा असं आयुष्य दाखवतो जिथे चांगल्या वाईटातली सीमारेषा धूसर आहे. पिढ्यानपिढ्या, या प्रदेशातील स्थानिकांनी त्यांची जमीन, पाणी आणि जंगल याचं प्राणपणाने रक्षण केलंय. 

    ‘घात’मध्ये तीन मध्यवर्ती पात्रं आहेत. एक रहस्यमय भटक्या, एक धूर्त विश्वासघातकी आणि एक भ्रमित कायदेपंडित. यातील प्रत्येकाच्या साथीला स्थानिकांचं प्रतिनिधित्तव करणारा एक साथीदार आहे. मुक्ती शोधणारा एक माहितगार, भूतकाळ नसलेला माणूस आणि जगात आपली जागा शोधणारी एक तरुण आदिवासी मुलगी. या साऱ्यांचं आयुष्य एकमेकांत अनपेक्षित पद्धतीने गुंफलं गेलं आहे. नियमच नसलेली या जगात एकमेकांवर विश्वास बसणं आणि तो उडणं हे फार सहज होतं. या जगात भीती हाच विश्वास आहे.

    छत्रपाल निनावे
    छत्रपाल निनावे एक भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत. २०२२ मध्ये, छत्रपाल हे बर्लिनेल टॅलेंटचा भाग होते. घात हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. पण या पहिल्या फीचर फिल्मने २०२० मध्ये NFDC फिल्म बाजार येथे WIP लॅब अवॉर्ड जिंकला तर बर्लिनले पॅनोरमा २०२३ मध्येही सिनेमाची निवड झाली होती. शिवाय GWFF फर्स्ट फीचर फिल्म अवॉर्डसाठी नामांकनही मिळाले होते. छत्रपाल यांनी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून 15 वा Giuseppe Becce पुरस्कार पटकावला,  सिनेक्लब वेरोना आणि FEDIC मासिकाने बर्लिनले २०२३ मध्ये त्याचे आयोजन केले होते. Jio MAMI Mumbai FF, IFFK आणि AEIFF मध्ये देखील ‘घात’ची निवड झाली होती. याबरोबरच छत्रपाल यांनी ‘अ चेक ऑफ डेथ’ (2007) ही मध्य भारतातील शेतकरी आत्महत्या प्रकरणावर आधारित एक शॉर्टफिल्मही केली आहे. ‘फिल्माका इंडिया’ स्पर्धेत या फिल्मला पुरस्कार मिळाला आहे.

    प्लॅटून वन आणि शिलादित्य बोरा बद्दल
    मुंबईत मुख्यालय असलेले, ‘प्लॅटून वन’ हे शिलादित्य बोरा यांनी स्थापन केलेला एक बुटीक फिल्म स्टुडिओ आहे. PVR सिनेमा समूहाची मर्यादित प्रदर्शन करणारी शाखा म्हणजेच PVR डायरेक्टर्स रेअर या आघाडीच्या इंडी रिलीज बॅनरमागे बोरा यांची मेहनत आणि बुद्धी आहे. या बॅनरने आजवर ८५ हून अधिक चित्रपट यशस्वीरित्या प्रदर्शित केलेले आहेत. बोरा हे प्रतिष्ठित ‘बर्लिनेल टॅलेंट्स २०१५’ चे माजी विद्यार्थीसुद्धा आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांनी चित्रपट आणि निर्मितीच्या सर्व अंगांशी संबंधित कामगिरी केली आहे. दिग्दर्शन, निर्मिती, विपणन, वितरणापासून ते एखाद्या प्रकल्पाची सुरुवात करेपर्यंत अनेक भूमिका बोरा यांनी पार पाडल्या आहेत. ‘कोर्ट’, ‘मसान’, ‘न्यूटन’, ‘एसआयआर’ यांसारख्या ऑफबीट सिनेमांसोबतच बोरा गेल्या दशकातील सर्वोत्तम भारतीय स्वतंत्र सिनेमांशी निगडीत आहेत. ‘प्लॅटून वन’चा आगामी चित्रपट, हुमा कुरेशी अभिनीत ‘बयान’ हा सिनेमा एलए रेसिडेन्सी ऑफ ग्लोबल मीडिया मेकर्स – फिल्म इंडिपेंडंट येथे तयार झालाय. याच सिनेमाने ‘ह्युबर्ट बाल्स’ फंडाचं विजेतेपदही पटकावलं आहे. नुकतंच सिनेमाचं मुख्य छायाचित्रण पूर्ण झालं आहे. ‘प्लॅटून वन’ उत्तर अमेरिकन बाजारपेठेतही आपला विस्तार करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच ओकलँड कॅलिफोर्निया येथे ‘प्लॅटून वन इंक’ने आपली धमाकेदार एंट्री केलेली आहे.

  • पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या चित्रीकरणाचा शुभारंभ

    काही दिवसांपूर्वी अंकुश चौधरी दिग्दर्शित  ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली होती. सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील कुरळे ब्रदर्सने अवघ्या महाराष्ट्राला आपलेसे केले. आता पुन्हा एकदा हे कुरळे ब्रदर्स धमाका करायला येणार असून नुकताच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला आहे.

    सर्वात मोठी स्टार कास्ट

    या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे यांच्यासह कोण झळकणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. हे सरप्राईजही आता समोर आले असून यात सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू आणि संकेत पाठकही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील ही तगडी स्टारकास्ट पाहाता हा सिनेमा पुन्हा एकदा बॅाक्स ॲाफिस गाजवणार, हे नक्की ! संजय जाधव या चित्रपटाचे छायाचित्रण करणार आहेत.

    अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाचे सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर निर्माते असून निनाद नंदकुमार बत्तीन, वर्डविझर्ड एंटरटेंनमेट सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने एव्हीके पिक्चर्स आणि उदाहरणार्थने वर्डविझर्डसोबत हातमिळवणी केली असून हे आणखी दोन चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

    चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणतो, ” आज बाप्पाच्या आशीर्वाद घेऊन आम्ही फ्लोअरवर उतरत आहोत. यात अमेय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते, ओंकार माने यांची साथ लाभल्याने हा चित्रपट सर्वोत्कृष्ट बनेल, याची खात्री आहे. चित्रपटातील कलाकार तर कमाल आहेतच. यात काही नवीन कलाकार या कुरळे ब्रदर्सच्या कुटुंबात सहभागी झाल्याने ही धमाल आता आणखी वाढणार आहे. आता नवीन जोमाने लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ.’’

  • गुलाबी’ उलगडणार स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग

    नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाची अनोख्या पद्धतीने तारीख जाहीर केली असून व्हॅायलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘गुलाबी’ चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर, स्वप्नील भामरे निर्माते आहेत. ‘गुलाबी’ चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळेल. या चित्रपटाला साई पियुष यांचे संगीत लाभले आहे.

    नुकत्याच प्रदर्शित झालेल्या  व्हिडीओमध्ये श्रुती मराठे, अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी एकमेकींना फोन करून भेटण्याची तारीख ठरवत आहेत. शेवटी भेटण्याची तारीख २२ नोव्हेंबर ठरली असून या तारखेला प्रेक्षकांनाही ‘गुलाबी’ चित्रपटगृहात पाहाता येईल.

    विचार, वागणूक, स्वप्ने आणि नाती असा गुलाबी प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरुन आणि नावावरुन हा सिनेमा तीन मैत्रिणींची कथा सांगणारा दिसत असला तरी पण तिघींची पार्श्वभूमी मात्र वेगळी आहे. त्यामुळे चित्रपटात काहीतरी वेगळी गोष्ट पाहायला मिळणार हे नक्की!

    ‘गुलाबी’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर यांनी सांगितले  की, “आज गणपती बाप्पाच्या प्रसन्न वातावरणात ‘गुलाबी’  चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे. गुलाबी या नावावरून सिनेमा स्त्रीप्रधान असला, तरी त्यात मनोरंजनही तितकेच आढळून येईल. हळूहळू चित्रपटातील अनेक गोष्टी समोर येतील.  ‘गुलाबी’ हा चित्रपट केवळ एक कथा नाही, तर तो विचार, वागणूक, स्वप्न आणि नाती यांचा एक सुंदर गुलाबी प्रवास आहे, जो प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अनुभवांशी जोडलेला आहे. या चित्रपटात आम्ही स्त्रीच्या भावविश्वाची, संघर्षाची आणि  यशाची गाथा मांडली आहे. हा चित्रपट प्रत्येकाला स्वतःची ओळख आणि स्वप्ने पुन्हा नव्याने जगायला प्रेरित करेल. प्रेक्षकांना त्यांच्याशी निगडित असलेल्या भावना या चित्रपटातून नक्कीच अनुभवता येतील.”

  • मराठमोळा बॉडीबिल्डर सुहास खामकरचे हिंदी सिनेमात पदार्पण

    राजवीर” या आगामी हिंदी चित्रपटात उलगडणार एका आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट

    विख्यात बॉडीबिल्डर सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आगामी “राजवीर” या चित्रपटात सुहास प्रमुख भूमिकेत दिसणार असून,हिंदी भाषेत असलेल्या या चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच करण्यात आला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक मिळाला आहे.

    अर्थ स्टुडिओ यांनी सारा मोशन पिक्चर्स आणि रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स,  समृद्धी मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने “राजवीर” चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. साकार प्रकाश राऊत, ध्वनि साकार राऊत, गौरव परदासनी, सूर्यकांत बाजी चित्रपटाचे निर्माते, तर रुचिका तोलानी सूचक सहनिर्मात्या आहेत. साकार राऊत, स्वप्नील देशमुख यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन साकार राऊत, जेकॉब आणि पॉल कुरियन, माज खान यांनी केलं आहे. भूषण वेदपाठक यांनी छायांकन, अभिनंदन गायकवाड, होपून सैकिया यांनी संगीत दिग्दर्शन, साकार राऊत, कश्यप कुलकर्णी यांनी संकलन केलं आहे. चित्रपटात सुहास खामकरसह झाकीर हुसैन, गौरव परदासनी, प्राशी अवस्थी, धीरज सानप यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

    “राजवीर” या चित्रपटात एका आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. अत्यंत तडफदार व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहासनं राजवीर ही भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या टीजरमध्ये मारधार करणारा राजवीर दिसतो. त्यामुळे राजवीर हा चित्रपट भरपूर अॅक्शन सिक्वेन्स असल्याचं दिसून येत आहे. चित्रपटाचा टीजर आणि सुहास खामकरचं तडफदार व्यक्तिमत्त्व, अॅक्शन पाहूनच चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • ‘पुन्हा एकदा चौरंग’ चित्रपटाचा टिझर आणि पोस्टर प्रदर्शित…

    मराठी सिनेसृष्टीला ज्वलंत विषयावर वास्तवदर्शी चित्रपट बनवण्याची फार मोठी परंपरा आहे. आजवर अनेक सिनेमांनी समाजातील दाहक विषय मोठया पडद्यावर मांडत समाजाला आरसा दाखवला आहे. याच वाटेवरील असलेला ‘पुन्हा एकदा चौरंग’ हा आगामी मराठी चित्रपट एका ज्वलंत विषयाला वाचा फोडणार आहे. ‘पुन्हा एकदा चौरंग’ या सिनेमाचा टिझर आणि पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘आता मेणबत्ती नाही, होईल तो चौरंग’ असे म्हणत या चित्रपटाने जणू अन्यायाविरोधात एक लढाच पुकारला आहे.

    आरोही फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माते राजेंद्रकुमार गुलाबराव मोहिते आहेत. ज्योती राजेंद्रकुमार मोहीते सहनिर्मात्या आहेत. सागर दिनकरराव मोहिते यांनी दिग्दर्शनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. ‘पुन्हा एकदा चौरंग’ हे शीर्षक खऱ्या अर्थाने चित्रपटाचा रंग दाखवणारे आहे. ही लढाई न्याय-अन्यायाची असल्याचे पोस्टर पाहिल्यावर सहजपणे जाणवते. ‘आता मेणबत्ती नाही…’ ही टॅगलाईन थेट ह्रदयाला भिडते. आज आपल्या आजूबाजूला जे घडत आहे ते भयानक आहे. स्त्रिया-तरुणी यांचे जगणे असह्य झाले आहे. दिवसागणिक स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. हे चित्र पाहिल्यावर हाच आपला पुढारलेला, सुधारलेला, महिलांना समान वागणूक देणारा समाज का? असा प्रश्न कोणत्याही सुजाण नागरिकाला पडल्याशिवाय राहणार नाही. कोलकाता, बदलापूर सारख्या ठिकाणी घडलेल्या घटना स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायचे प्रतीक आहेत. अशा असंख्य घटना आहेत ज्या कधी उजेडात आल्याच नाहीत. अशी कितीतरी प्रकरणे आहेत जी सत्ता आणि पैशाच्या बळावर दाबली गेली आहेत. ‘पुन्हा एकदा चौरंग’या चित्रपटाची कथाही अशाच प्रकारची आहे. सुप्रसिद्ध लेखक प्रताप गंगावणे यांनी या सिनेमाचं लेखन केलं असून त्यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे. प्रताप गंगावणे यांनी आजवर बऱ्याच यशस्वी चित्रपटांचे लेखन केले असून ऐतिहासिक चित्रपटांचे लेखन करण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांना विविध मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. प्रदर्शित करण्यात आलेला टिझर खऱ्या अर्थाने ‘पुन्हा एकदा चौरंग’ची झलक दाखवणारा आहे. याबाबत दिग्दर्शक सागर दिनकरराव मोहिते म्हणाले की, ‘पुन्हा एकदा चौरंग’ हा चित्रपट रसिकांना विचार करायला लावणारा आहे. केवळ रसिकांचे मनोरंजन न करता त्याद्वारे एक सशक्त संदेश देण्याचे प्रयत्न करण्यात आला आहे. सशक्त कथानकाला नावाजलेल्या कलाकारांनी उत्तम न्याय देण्याचे काम केले आहे. आवश्यकतेनुसार सुरेल गीत-संगीताची जोडही देण्यात आली आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला ‘पुन्हा एकदा चौरंग’ नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी आशाही मोहिते यांनी व्यक्त केली.

    ‘पुन्हा एकदा चौरंग’मध्ये भूषण प्रधान आणि सौरभ गोखले हे दोन तगडे अभिनेते मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या जोडीला अरुण नलावडे, जयवंत वाडकर, सिद्धी पाटणे, लतिका सावंत, महेश कोकाटे, दिव्येश मेदगे, नितीन कुलकर्णी, वंदना सरदेसाई, डॉ विलास कुलकर्णी, मिलिंद दास्ताने, संतोष पाटील, राजभूषण सहस्त्रबुद्धे, बाळकृष्ण शिंदे, डॉ बाळासाहेब केंडके, पंकज काळे, पुष्पा कदम, प्रसाद दबके, नीरज राठोड, ओमकार बोथटे, प्रथमेश काटकर, अमोल जाधव, सतीश तांदळे, किशन राठोड, विलास कदम यांच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सलोनी सातपुते, श्रद्धा नालिंदे, हर्षदा तोंडीलकर, प्रतीक्षा पगारे या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पाऊल ठेवणार आहेत. छायांकन अनिकेत करंजकर यांनी तर संकलन सुबोध नारकर यांनी केलं आहे. विरेंद्र केंजळे यांनी संगीत दिलं असून, विजय गावंडे यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. सिध्देश्वर नंदागवळे कार्यकारी निर्माता, तर नंदकुमार भगत लाईन प्रोड्यूसर आहेत. ध्वनिरेखन रमेश व्ही. इनामती यांनी केलं असून, केशव ठाकूर कला दिग्दर्शन केलं आहे. नृत्य दिग्दर्शन आहेत रौनक ओसवाल यांनी केलं असून, प्रशांत नाईक या सिनेमाचे फाईट मास्टर आहेत. व्ही.एफ.एक्स मुन्ना निंबाळ यांचे असून वेशभूषा धनश्री साळेकर यांनी केली आहे.