
-
गोड बातमीची घाई असलेल्यांसाठी, एक नवा, धमाल चित्रपट “एक दोन तीन चार

आजच्या काळातील आजच्या जोडप्यांची कथा आणि व्यथा असलेला “एक दोन तीन चार” या चित्रपटाचा अफलातून असा ट्रेलर आता रिलीझ झालाय.
ट्रेलरच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की पुढे काय घडेल हा एक सस्पेन्सच आहे. चित्रपटातील जोडपं, समीर आणि सायलीच्या लव्ह स्टोरीच्या आनंदी आयुष्याचं रूपांतर रोलरकोस्टर राईड प्रमाणे कोणकोणत्या वळणावर जातं याची हिंट हा ट्रेलर पाहिल्यावर आपल्याला येते.
सिनेमाच्या ट्रेलर मध्ये आपण पाहू शकतो कि अगदी वयाच्या २३ व्या वर्षी सम्या आणि सायली या जोडप्याच लग्न झालंय, पण त्यानंतर लगेचच गोड बातमी सुद्धा येते. आणि ह्या गोड बातमीव्दारे जो एक मोठ्ठा बॉम्ब फुटलाय त्याने त्यांची जी तारांबळ उडते याची एक धमाल गोष्ट यात पहायला मिळते.
ट्रेलर बघताना आधी वाटतं की ह्यांना एक नाही दोन नाही तर चक्क ४ मुलं होणारं आहेत. पण ट्रेलरच्या शेवटी वैदेहीने सहा बाळांची बातमी देऊन गुगली टाकली आहे. आता यांना चार का सहा याचं उत्तर चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
‘मुरांबा‘ सारख्या बहुचर्चित आणि नावाजलेल्या चित्रपटानंतर तरूण दिग्दर्शक वरूण नार्वेकर याचा पुढील चित्रपट कधी येणार याची अनेक दिवस प्रेक्षक आणि मिडीयासुद्धा वाट पहात होते. आणि आता “एक दोन तीन चार” या चित्रपटाच्या घोषणेने ही उत्सुकता अधिक वाढली आहे.
वैदेही परशुरामी आणि निपूण धर्माधिकारी अभिनित ही नवी गोड जोडी या अनपेक्षित सरप्राईझला कसे सामोरे जाणार हे बघणं प्रेक्षकांसाठी गमतीदार ठरणार आहे.
“एक दोन तीन चार” हा चित्रपट जितका यंग जनरेशन साठी आकर्षक आहे तितकाच तो सर्व कुटुंबासाठी सुद्दा एक मेजवानी ठरणार आहे. कारण प्रत्येक जोडप्याबरोबर सर्व कुटुंबच या प्रवासात सहभागी होत असतं. आणि याच कुटुंबाचा भाग म्हणून या दोघांबरोबर मराठीतील दमदार कलाकार जसं मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर इ. कलाकार या कथेतील कुटुंबाचा प्रमुख भाग असणार आहेत.
मुख्य म्हणजे सोशल मीडियाचे आजचे भारताचे नावाजलेले स्टार्स करण सोनावणे आणि यशराज मुखाटे या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहेत. करण पहिल्यांदाच मराठी चित्रपटात एका मुख्य भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. तर यशराज मुखाटे एक म्युझिक डिरेक्टर म्हणून “एक दोन तीन चार” या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण करतो आहे. त्यामुळे हा चित्रपट टोटल एन्टरटेनर असणार आहे ह्यात काही शंका नाही.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित तसेच रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले निर्मित बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांच्या साहाय्याने “एक दोन तीन चार” हा चित्रपट १९ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. -
मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्सची घोषणा

ख्यातनाम नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्यनिर्माता, चित्रपटनिर्माता अशा बहुविध भूमिकेतून रसिकांना अखंड रिझवणारे ज्येष्ठ लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचं मनोरंजन सृष्टीतील योगदान अमूल्य आहे. कै.मधुसूदन कालेलकर यांच्यानंतर त्यांचे पुत्र सिद्धहस्त लेखक अनिल कालेलकर यांनी वडिलांचा कलेचा वारसा पुढे चालवला. हाच वारसा समर्थपणे पुढे नेण्यासाठी मधुसूदन कालेलकर यांची पुढची पिढी आता सज्ज झाली आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या नातीने गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ या निर्मिती संस्थेची घोषणा एका शानदार सोहळ्यात केली आहे. या प्रॉडक्शन्स हाऊसतर्फे आगामी काळात अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांच्या भेटीला येणार आहेत. गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश अजय चौधरी हे दांपत्य ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ या प्रॉडक्शन्स हाऊसची धुरा सांभाळणार आहेत.
हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेता राजीव खंडेलवाल याच्या हस्ते या लोगोचे अनावरण करण्यात आले. या लोगो अनावरण सोहळ्याला शिवसेना नेते मा.आदित्यजी ठाकरे यांची विशेष उपस्थिती लाभली. मधुसूदन कालेलकर यांचे पुत्र आणि ज्येष्ठ लेखक अनिल कालेलकर यांनी याप्रसंगी हृद्य आठवणींना उजाळा दिला. गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश अजय चौधरी यांची सहनिर्मिती असलेल्या आगामी ‘घरत गणपती’ चित्रपटाची टीम दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, निकिता दत्ता, भूषण प्रधान, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, परी तेलंग, रुपेश बने, राजसी भावे या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. तसेच मनोरंजन व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गौरी कालेलकर-चौधरी यांचा पुढाकार याप्रसंगी बोलताना ‘मधुसूदन कालेलकर यांसारख्या महान व्यक्तिमत्वाचा वारसा पुढे घेऊन जाणे, हे नक्कीच कौतुकास्पद असल्याचे सांगत राजीव खंडेलवाल यांनी ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ ला मनापासून शुभेच्छा दिल्या.
‘प्रत्येक जण स्वतःचा मार्ग निवडत असतात. काहीजण आपल्याला मिळालेला वारसा अभिमानाने आणि आनंदाने पुढे नेतात आज या निमित्ताने गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश अजय चौधरी यांनी कलेचा वारसा पुढे नेण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. माझ्या मनापासून शुभेच्छा असल्याचे शिवसेना नेते मा.आदित्यजी ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ तर्फे आगामी काळात चित्रपटांची निर्मिती, वेबसिरीज तसेच व्यावसायिक नाटकांची निर्मिती, गीत संगीताचे मनोरंजक कार्यक्रम केले जाणार असून या सगळ्यांची सविस्तर घोषणा लवकरच केली जाणार आहे. कै.मधुसूदन कालेलकर यांनी आपल्या कर्तृत्वातून स्वतःची वेगळी नाममुद्रा उमटवली आहे. त्यांच्या कलाकृतींनी कित्येक पिढ्यांच्या रसिकांचे भावविश्व व्यापून टाकले. त्यामुळे त्यांचा हा वारसा सक्षमपणे पुढे नेण्याची खूप मोठी जबाबदारी आमच्यावर असल्याचे गौरी कालेलकर-चौधरी यांनी सांगितले. ही जबाबदारी सक्षमपणे पेलत प्रेक्षकांना उत्तम ते देण्याचा मानस असल्याचे गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश अजय चौधरी यांनी याप्रसंगी सांगितले.
मराठी-हिंदी चित्रपट लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचा जन्म २२ मार्च १९२४ वेंगुर्ल्यात झाला. २०२३-२०२४ हे कै.मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आपल्या कारकिर्दीत ११० हिंदी व मराठी चित्रपटांचे लेखन मधुसूदन कालेलकरांनी केले. ७० पेक्षा जास्त चित्रपट गीते लिहिली. ३० पेक्षा जास्त नाटके लिहिली. पाच नाटकांची निर्मिती केली. अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या ‘मधुसूदन कालेलकर’ यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या चौफेर कर्तृत्वाने कलेच्या क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केली. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांची पुढची पिढी सज्ज झाली आहे, ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
-
मल्टीस्टारर “ये रे ये रे पैसा ३” चित्रपटाचं चित्रीकरण मुंबई येथे सुरू

बहुचर्चित “ये रे ये रे पैसा ३” या मल्टिस्टारर चित्रपटात आता अभिनेत्री वनिता खरात, नागेश भोसले, जयवंत वाडकर यांची भर पडली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त आमदार योगेश टिळेकर, निर्माते/दिग्दर्शक अभिजीत पानसे, मनसे नेते संदीप देशपांडे, नानूभाई जयसिंघानी यांच्या हस्ते संपन्न होऊन चित्रपटाच्या चित्रीकरणला मुंबई येथे सुरुवात झाली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रद्य मंडळी उपस्थित होती. पुरेपूर मनोरंजन करणारं कथानक, दिग्गज कलाकार असलेला हा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून देणार आहे.
अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अॅरो या निर्मिती संस्थांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, निर्मिती संस्थांचे सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ हे या चित्रपटचे निर्माते आहेत. तर निनाद नंदकुमार बत्तीन हे सहनिर्माते आहेत . चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे, तर संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे. चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटातुन भेटीस येणार आहे.
ये रे ये रे पैसा आणि ये रे ये रे पैसा २ या चित्रपटांनी यापूर्वी बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं होतं. पैसा मिळवण्यासाठीची धडपड आणि त्यातून होणारे गोंधळ या कथासूत्रावर हे चित्रपट बेतलेले होते. आता आधीच्या दोन चित्रपटांतलं कथानक आणि त्या धमाल व्यक्तिरेखा आता तिसऱ्या भागात काय धमाल करणार याची उत्सुकता चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच निर्माण झाली आहे. नुकतेच सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजातील एक गाणेही रेकॉर्ड करण्यात आले होते. संजय जाधव यांचं दिग्दर्शन, अरविंद जगताप यांचे खुसखुशीत संवाद, दिग्गज अभिनेत्यांचा अभिनय आणि मनोरंजक कथानकाची पर्वणी या चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
-
हिमाचल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ‘द रॅबिट हाऊस’ ठरला उत्कृष्ठ चित्रपट

गीताई प्रोडक्शन्सची पहिलीच निर्मिती असलेल्या वैभव कुलकर्णी लिखित, दिग्दर्शित हिंदी चित्रपट ‘द रॅबिट हाऊस’ ला आधीच हिमाचल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून सन्मान मिळाला होता. शेवटच्या दिवशी पुरस्कार जाहीर झाले तेव्हा ‘द रॅबिट हाऊस’ ला उत्कृष्ठ चित्रपट पुरस्कार मिळाला, अभिनेत्री करिश्मा हिला उत्कृष्ठ अभिनेत्री पुरस्कार मिळाला, तर अभिनेते गगन प्रदीप यांना उत्कृष्ठ सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला.
हे पुरस्कार हिमाचल प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव ओंकार शर्मा, बॉलिवूड कलाकार संजय मिश्रा, अखिलेंद्र मिश्रा, सत्यपाल शर्मा, सपना संद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्कार दिग्दर्शक वैभव कुलकर्णी, निर्माते कृष्णा पांढरे, सुनीता पांढरे, कलाकार करिश्मा, पूर्वा, गगन प्रदीप, मोतीराम कटवाल यांनी स्वीकारले. यावेळी बॉलिवूड कलाकार पिहू संद, संजय जैस, तेलगू अभिनेता आणि दिग्दर्शक आदित्य ओम आदी मान्यवर उपस्थित होते, तर टीम ‘द रॅबिट हाऊस’ कडून सुनीता सिंग, प्रीती शर्मा, बिकीभाई ठाकूर, निमी ठाकूर, मोहित ठाकूर, मोतीराम कटवाल, देहरुराम कटवाल, हिना कटवाल, आशिष पावगी हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना अखिलेंद्र मिश्रा म्हणाले, ‘द रॅबिट हाऊस सारखा सिनेमा, सध्या ज्या पठडीतले सिनेमे येत आहेत त्यांना छेद देतो. याला खरा सिनेमा म्हणतात. ज्याच्यामध्ये साहित्यिक मूल्ये आहेत आणि तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.’ तेलगू अभिनेते आणि दिग्दर्शक आदित्य ओम म्हणाले, ‘हा सिनेमा म्हणजे मास्टर पीस आहे. मला हा तेलगूमध्ये करायची इच्छा आहे.’
हा महोत्सव हिमाचल प्रदेशची सांस्कृतिक राजधानी मंडी अर्थात छोटी काशी येथील संस्कृती सदनच्या भव्य दालनात पार पडला. महोत्सवाच्या सांगता समारंभात, परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यात ‘द रॅबिट हाऊस’ च्या नावाने एक देवदार वृक्ष लावण्यात आला, जो पुढची अनेक वर्षे चित्रपटाची आठवण करुन देत राहिल. महोत्सवाची सुरुवात विलोभनीय मंडवी लोकनृत्य करुन स्त्रियांच्या समूहाने केली, तर सांगता समारंभात उत्तरेकडील लोकनृत्यांनी बहार आणला.

-
“‘महाराजला मिळत असलेल्या जगभरातील प्रेम आणि कौतुकाने भारावून गेलो आहे!’: जयदीप अहलावत

जयदीप अहलावत, नेटफ्लिक्स आणि YRF एंटरटेनमेंटच्या पहिल्या चित्रपट ‘महाराज’ मधील आपल्या शानदार अभिनयासाठी मिळणाऱ्या प्रशंसेचा आनंद घेत आहेत. हा चित्रपट आता एक जागतिक हिट झाला आहे! ‘द रेल्वे मेन’ च्या जागतिक यशानंतर, YRF आणि नेटफ्लिक्स यांनी पुन्हा एकदा ‘महाराज’ सह एक मोठा हिट मिळवला आहे, जो 22 देशांमधील जागतिक गैर-इंग्रजी शीर्ष दहा यादीमध्ये समाविष्ट झाला आहे.
चित्रपटात जुनैद खान आपल्या पदार्पण भूमिकेत जयदीप अहलावत यांच्या सोबत मुख्य भूमिकेत आहे. 21 जूनला रिलीज झालेल्या या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात 5.3 मिलियन व्यूज मिळवले आहेत.
जयदीप या यशाने आनंदित आहेत. तो म्हणतो, “मी ‘महाराज’ ला जगभरातून मिळत असलेल्या प्रेम आणि प्रशंसेने भारावून गेलो आहे. 22 देशांमध्ये ट्रेंड होणे आणि एवढे प्रेम मिळणे अत्यंत समाधानकारक आहे. याचे श्रेय संपूर्ण टीमला जाते ज्यांनी हे शक्य केले.”
ते पुढे म्हणतो, “या भूमिकेसाठी स्वतःला शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या बदलण्याचा प्रवास आव्हानात्मक होता, परंतु प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेमुळे हे सार्थक झाले आहे. मी सर्व प्रेक्षकांचे त्यांच्या समर्थन आणि प्रोत्साहनासाठी मनापासून आभारी आहे.”
जयदीप पुढे म्हणतो, “हे त्यांच्या प्रेमामुळेच आहे की माझी प्रेरणा वाढते आणि माझ्या कलेच्या सीमांना ओलांडण्याचे धाडस मिळते. या ओळखीने मी खरोखरच सन्मानित आणि नम्र झालो आहे.”
‘महाराज’ नेटफ्लिक्सवर विशेषतः स्ट्रीमिंग होत आहे!” -
धर्मवीर – २” चित्रपटाचा पहिला दमदार टीजर सोशल मीडियावर लॉन्च

क्रांती दिनाच्या औचित्याने प्रदर्शित होत असलेल्या “धर्मवीर -२” या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. स्वर्गीय आनंद दिघे साहेब दिसत असलेल्या या टीजरने ‘ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की’ या दमदार संवादामुळे लक्ष वेधून घेतले आहे. “धर्मवीर – २” हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
“धर्मवीर – २” या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेराम न म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे. काही दिवसांपूर्वीच “धर्मवीर – २” चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले होते . “धर्मवीर – २” च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता “धर्मवीर – २” मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असून याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे.
टीजरमध्ये एक मुस्लिम महिला राखी बांधायला दिघे साहेबांकडे येते. साहेब तिला बुरखा काढायला सांगतात. तिने चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं साहेबांना कळतं आणि साहेब संतापतात. राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन साहेब निघतात… त्याचवेळी खास शैलीत साहेब म्हणतात, ‘ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की!’ अंगावर काटा आणणाऱ्या या टीजरमधून साहेबांच्या हिंदुत्त्वाची एक झलक पाहायला मिळते. त्यामुळे आता चित्रपटाविषयी तीव्र उत्सुकता निर्माण होत आहे. मात्र त्यासाठी आपल्याला ९ ऑगस्टची वाट पहावी लागणार आहे.
*Teaser Link*
https://youtu.be/e8Zu2oO2uFs?si=XaaIk1kVfSVBrh5r
Thanks & Regards
Darshan S.Musale
(Media Planet) -
‘वैजूचं लग्न रणविजयशी झालंय खरं, पण कहाणीत येणारेय नवा ट्विस्ट!

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेत ऋतुजा बागवे (वैजू) आणि अंकित गुप्ता (रणविजय) मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये घडणाऱ्या या कथानकात वैजूचा संघर्ष आणि तिच्या प्रवासाची कहाणी बघायला मिळते, जी शेतात राबते, कष्ट उपसते आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच आहे. वैजू कुटुंबाभिमुख, मेहनती आणि दूरदर्शी आहे आणि आपले जीवनमान उंचावणे व गावाच्या सुधारणेसाठी काम करणे, हेच तिचे ध्येय आहे.
अलीकडेच, निर्मात्यांनी या मालिकेकरता एक स्वारस्यपूर्ण प्रोमो तयार केला, ज्यात वैजूच्या भावनिक प्रवासाचे आणि प्रेमभंगाचे चित्रण करण्यात आले आहे. ज्या रणविजयवर तिचे प्रेम आहे, त्याच्याशी लग्न होऊनही ओढवलेल्या अनपेक्षित परिस्थितीमुळे वैजूला त्याच्यापासून दूर राहावे लागते. प्रोमोत तिच्या हातावर कोरलेले रणविजयचे नावदेखील दिसते, परंतु, खरोखरच तो वैजूच्या नशिबात असेल का? पुढे काय घडेल, हे पाहणे रंजक आहे!
स्टार प्लस शो ‘माटी से बंधी डोर’मधील ऋतुजा बागवे ऊर्फ वैजूने सांगितले की, प्रोमोमध्ये वैजूच्या भावनिक गोंधळाचे चित्रण करण्यात आले आहे, जिने रणविजयशी लग्न केले असले तरी, उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तिला घर सोडावे लागते. वैजूकरता हा टप्पा कठीण होता, कारण तिने तिची तिची आई गमावली आहे, तिची बहीण कोमात आहे व ती परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. रणविजयच्या हृदयात ती आपल्याविषयी प्रेम कसे निर्माण करेल, हे बघण्यासारखे आहे. जया आणि रणविजय यांनी शेअर केलेल्या समीकरणाचे वास्तव तिच्यासमोर आल्याने वैजूने रणविजयवरील तिच्या प्रेमाचे बलिदान दिले होते, परंतु घटनांनी अनपेक्षित वळण घेतल्याने, वैजूने रणविजयशी लग्न केले. वैजू आणि रणविजय यांच्या आयुष्यात घडणाऱ्या नाट्याचे साक्षीदार होणे रंजक असेल, कारण दोघांचे लग्न हे गुपित आहे आणि जे कुणालाही ते ठाऊक नाही.”
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या मालिकेत वैजूच्या भावनिक उलथापालथीचे चित्रण करण्यात आले आहे, जी तिच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सर्वतोपरी संघर्ष करतेय. रणविजयशी भेट झाल्यानंतर तिच्या आयुष्यात घडणारे बदलही या मालिकेतून बघता येतील.या मालिकेत नातेसंबंधातील गुंतागुंत आणि संस्कृतीतील विशिष्ट बारकावे यांचेही चित्रण केले जाणार आहे. उद्भवलेल्या अनपेक्षित परिस्थितीत होणारे वैजू आणि रणविजय यांचे लग्नही प्रेक्षकांना पाहता येईल. तिचे जीवनमान उंचावत आणि गावात सुधारणा घडवून आणण्याची तिची महत्त्वाकांक्षा कायम ठेवत ज्या लग्नात प्रेमाचा लवलेश नाही, त्या विवाहाच्या नात्यात वैजूला प्रेम कसे प्राप्त होते, हे पाहणे रंजक ठरेल.
‘माटी से बंधी डोर’ ही मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सोमवार ते रविवार संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होते. -
डंका… हरीनामाचा’ चित्रपटाचा ट्रेलर हरिनामाच्या गजरात प्रदर्शित

पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आजवर अनेक चित्रपटांतून विठू माऊलीचे दर्शन तसेच माऊलींप्रती असलेल्या श्रध्देचं यथार्थ दर्शन करण्यात आलं आहे. ‘डंका…हरिनामाचा’ चित्रपटाच्या निमित्ताने विठ्ठल भेटीचा ध्यास व आस याची अनुभूती घेता येणार आहे. या चित्रपटातून भक्तांच त्यांच विठ्ठलाप्रती असलेलं भावनिक नातं अधोरेखित करण्यात आलं आहे. रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका… हरीनामाचा’ हा मराठी चित्रपट १९ जुलैला चित्रपटगृहात दाखल होतोय. रविंद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे.
या चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच नुकताच करण्यात आला . चित्रपटाचा विषय हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी त्यांच्या विठ्ठलाप्रती असलेल्य भक्तीशी निगडीत आहे, त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना निश्चितच आवडेल’, असा विश्वास निर्माते रविंद्र फड व दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी व्यक्त केला.एका चांगल्या चित्रपटाचा भाग होता आल्याचा आनंद कलाकारांनी व्यक्त केला.
हरिपूर या छोट्याशा खेड्यातील विठ्ठलाची मूर्ती चोरीला गेल्यांनतर गावाचे वैभव हरवते. हे वैभव परत मिळवण्यासाठी चोरीला गेलेली मूर्ती शोधण्याची मोहीम काही गावकरी घेतात. ही मूर्ती नेमकी कोणाकडे असते? गावकरी ही मूर्ती मिळवण्यात यशस्वी होणार का? याची धमाल मनोरंजक कथा दाखवतानाच विठ्ठलाच्या भक्तीचा साक्षात्कार होऊन गावकरी विठूरायाशी कसे एकरूप होतात हे ‘डंका… हरीनामाचा’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.कथेला साजेशी गाणी चित्रपटात आहेत.
सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव अशी कलाकारांची मांदियाळी ‘डंका… हरीनामाचा’ चित्रपटात आहे.
सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील रिफ्रेशिंग झालंय. हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे. निर्माता रविंद्र फड हे स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठूरायाला भक्तीभावाने समर्पित केला आहे.
‘डंका… हरीनामाचा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद श्रेयस जाधव, अंशुमन जोशी, संकेत हेंगा यांचे आहेत. छायांकन प्रदीप खानविलकर तर संकलन आशिष म्हात्रे यांचे आहे. कलादिग्दर्शन संदीप इनामके यांचे आहे. वेशभूषा सानिया देशमुख तर साहस दृश्ये परमजीत सिंह ढिल्लोन यांची आहेत. संगीताची जबाबदारी अभिनय जगताप यांनी सांभाळली आहे.कार्यकारी निर्माते ऋषिकेश आव्हाड आहेत. अमोल कागणे फिल्म्स, फिल्मास्त्र स्टुडिओजच्या वतीने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओज, अमेय खोपकर, अमोल कागणे, प्रणीत वायकर यांनी सांभाळली आहे. -
सागरिका म्युझिकची यशस्वी २५ वर्ष पूर्ण

संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला २५वा वर्षपूर्ती सोहळा आजवर विविधांगी संगीताची मेजवानी देत रसिक श्रोत्यांचे कान तृप्त करणारे ‘सागरिका म्युझिक’ हे नाव संगीतप्रेमींसाठी नवं नाही. कॅसेट-सीडीच्या काळापासून संगीतप्रेमींसमोर सुरेल संगीताचा अद्वितीय नजराणा सादर करण्याचे व्रत जोपासणाऱ्या सागरिका म्युझिकने आजच्या सिंगल्सच्या काळातही रसिकांच्या मनावर गारूड करणारी गाणी सादर केली आहेत.
संगीत क्षेत्रात यशस्वी २५ वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने सागरिका म्युझिक च्या वतीने एका भव्य समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांनी त्यास आवर्जून हजेरी लावली. आणि सागरिका बाम आणि सागरिका म्युझिकच्या २५ व्या वर्षपूर्तीबद्दल अभिनंदन केले तसेच पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नानाछंद’ द्वारे सादर करणार नाना पाटेकरांमधील गीतकार संगीत क्षेत्रात २५ वर्षे पूर्ण केल्याचं औचित्य साधत ‘नानाछंद’ या अल्बमचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले यावेळी बोलताना हा अतिशय खास अल्बम रिलीज करताना आम्हाला अतिशय आनंद होत असल्याची भावना सागरिकाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. ‘नानाछंद’ या अल्बममधील गाणी नाना पाटेकर यांनी लिहिली असून, संगीतकार नीलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केली आहेत. वैशाली सामंत, राहुल देशपांडे आणि स्वप्नील बांदोडकर या तीन सर्वोत्कृष्ट गायकांच्या आवाजात ही गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. या अल्बमची मांडणी-निर्मिती विक्रम बाम यांनी केली आहे. वरद कठापूरकर, सचिन भांगरे, विनायक नेटके आणि इतर प्रतिभावान संगीतकारांनी वादन केलं आहे. अवधूत वाडकर, तुषार पंडित आणि अजिंक्य धापरे रेकॉर्डिंग आणि मिक्स इंजिनिअर आहेत.
‘खरंतर अमराठी असूनही मला मराठी लोकांनी, इथल्या संस्कृतीने मला स्विकारलं. अतिशय मेहनतीने आज ‘सागरिका म्युझिक’ दिमाखात उभी आहे त्याला इथली आत्मियता कारणीभूत आहे. आजवर खूप मोठं पाठबळ मला संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांनी दिलं ते यापुढेही तसेच राहील यात मला अजिबात शंका नाही, असं मनोगत सागरिका बाम यांनी व्यक्त केलं.
‘मी निसर्गात जास्त रमतो. त्यामुळे त्या सगळ्याशी माझी खूप जवळीक आहे. अनेकदा ते शब्द आपसूक ओठावर येतात. त्या शब्दांना निलेशने अतिशय मेहनतीने सुरांमध्ये गुंफलंय त्यातूनच ही गीत निर्मिती झाली. सागरिका म्युझिक आणि सागरिका बाम यांनी या गीतांना सुंदरतेने एका अल्बमच्या माध्यमातून प्रकाशित केलं आहे. याचा अतिशय आनंद मला आहे. असे भावोद्गगार ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी काढले.
या हृदय समारंभात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर गायक सुदेश भोसले यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आणि सागरिका म्युझिकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या अल्बमच्या निमित्ताने नाना पाटेकरांमध्ये दडलेला संवेदनशील गीतकार जगासमोर येणार आहे. आजवर अभिनेता-दिग्दर्शक आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नानांची सुरेल बाजू संगीत प्रेमींसमोर आणण्याचं काम सागरिकाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. सागरिकाचं हे काम नक्कीच वाखाणण्याजोगं असून, वर्षानुवर्षे स्मरणात राहणारं ठरेल
सागरिका म्युझिक विषयी
१९८४मध्ये जेव्हा सागरिका म्युझिकचा सांगितीक प्रवास सुरू झाला, जेव्हा हिरक दास यांनी भारतातील पहिला कॅसेट आणि सीडी उत्पादनाचा कारखाना सुरू केला. १९९४पर्यंत सागरिका अकोस्ट्रॉनिक्स दिवसाला १.५ लाख सीडी तयार करत होती.
भारतातील विविध भाषांमध्ये संगीत तयार करण्यासाठी समर्पित संगीत लेबल तयार करून तरुण आणि प्रतिभावान गायक-संगीतकारांसाठी हक्काचं व्यासपीठ तयार करणं ही सागरिका म्युझिकच्या प्रवासातील पुढली महत्त्वाची पायरी ठरली. हिरक दास यांच्यानंतर सागरिका दास यांनी सागरिका म्युझिकचा कारभार सांभाळला. मागील २५ वर्षे त्या कंपनीच्या सीईओ आहेत. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत सागरिका यांनी २०पेक्षा अधिक नवीन कलाकारांना संगीत क्षेत्रात लाँच करत त्यांच्या यशस्वी कारकीर्दीस हातभार लावला आहे.
मागील काही वर्षांमध्ये सागरिकाने हिंदी, मराठी, बंगाली आणि इंग्रजीमध्ये ११,००० हून अधिक ट्रॅक्सची निर्मिती आणि विपणन केलं आहे. ३०० हून अधिक संगीत व्हिडिओ आणि डिजिटल कलाकृती, मुलांसाठी १०० अॅनिमेटेड चित्रपट आणि यशस्वी संगीतावर आधारित लाईव्ह टेलिव्हिजन कलाकृती तयार केल्या आहेत.
२०१९ मध्ये विक्रम बाम यांच्या रूपात सागरिकाच्या तिसऱ्या पिढीने या व्यवसायात पाऊल ठेवलं. बोस्टनमधील बर्कली कॉलेज ऑफ म्युझिकमधून पदवीधर झालेल्या विक्रम यांनी भारतीय संगीत उद्योगात निर्माता, संगीतकार आणि गायक-गीतकार अशी ख्याती मिळवली आहे. आई सागरिकासोबत काम करताना विक्रम पुढील २५ वर्षांसाठी या लेबलचं व्हिजन तयार करण्यात मदत करत आहेत.
आजवर सागरिका म्युझिकच्या माध्यमातून उस्ताद रशीद खान, पं. अजय चक्रवर्ती, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. शिवकुमार शर्मा, पं. जसराज, सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, अजय-अतुल, शंकर महादेवन, श्रेया घोषाल, महालक्ष्मी अय्यर, विजयप्रकाश, सचिन पिळगावकर, आदर्श शिंदे, अनुप जलोटा, शान, कुमार सानू, बिक्रम घोष अशा बऱ्याच दिग्गजांनी आपली कला संगीत प्रेमींपर्यंत पोहोचवली आहे.

