
फटाक्यांची रंगीबेरंगी आतिषबाजी, फराळाचा घमघमाट,आकर्षक देखण्या रांगोळ्या, सुंदर तेवत्या पणत्यांची आरास, घरोघरी सुंदर आकाश कंदिल सुरु झाला आहे सण दिवाळीचा. आठवण अशी गोष्ट आहे, जी कधी चेहऱ्यावर हसू आणते तर कधी डोळ्यात आनंदचे पाणी विशेषतः जेव्हा ती आठवण सणासुधीची असते. दिवाळीचा सण म्हटलं की लहानपणीच्या इतक्या आठवणी जाग्या होतात. पहाटे अभ्यंग स्नान, आईनी लावलेल्या उटण्याचा सुगंध, बाबां सोबत फटाके वाजवणे, चविष्ट फराळचा भावंडांबरोबर बसून आस्वाद घेणे. अश्या गोष्टी बहुतेकांच्या आठवणींच्या पेटीत नक्की असतील आणि अश्याच आठवणींनचा पेटारा आज तुमचे झी मराठीचे लाडके कलाकार तुमच्या समोर उघडत आहेत.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ची अक्षरा म्हणजेच शिवानी रंगोळे, ‘माझ्यासाठी दिवाळीची आठवण म्हणजे माझ्या तीन मावश्या आणि आम्ही सर्व भावंडं एकत्र येऊन फराळ बनवायचो ह्या गोष्टी मी फार मिस करते. ह्या वर्षी कामात खूप गुंतलेली आहे पण सुट्टी मिळाली तर मी आणि विराजास पुण्याला जाऊ माझ सासर आणि माहेर दोन्ही पुण्यातच आहे. सर्व कुटुंबासोबत दिवाळी साजरी करू आणि सुट्टी नाही मिळाली तर मुंबईतच मित्र मंडळींना घरी फराळासाठी बोलवींन आणि फराळ करत करत गप्पा गोष्टी करू. मला फक्त दिवाळीची नाही तर भाऊबिजेची पण उत्सुकता असते कारण तो एक दिवस आहे जेव्हा आम्ही सगळे भावंडं जे आता कामानिमित्त वेगवेगळ्या शहरात राहतात ह्या दिवशी आम्ही विडिओ कॉलमध्ये एकत्र येतो आणि एकामेकांच्या आयुष्यामध्ये काय चालले आहे ह्या बद्दल बोलतो. एकूण काय तर मी दिवाळीत परिवार आणि मित्र मंडळी सोबत साजरी करते.

