
झी मराठी वाहिनीवर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’२०२३ चा महाअंतिम सोहळा शनिवार २५ नोव्हेंबरला पार पडला. यावेळी मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा हृषीकेश ढवळीकर, जयेश खरे, छोटा पॅकेट मोठा धमाका देवांश भाटे, गीत बागडे आणि कोपरगावची गौरी अलका पगारे हे लिटील चॅम्प्स टॉप ६ मध्ये होते. या अटीतटीच्या स्पर्धेत कोपरगावच्या ‘गौरी अलका पगारेने’ विजेती होण्याचा मान पटकावला.
यावेळी पारितोषिक म्हणून गौरीला १,५०,००० चा धनादेश आणि चांदीची वीणा देण्यात आली. तर उपविजेत्या ठरलेल्या श्रावणी वागळे आणि जयेश खरेला प्रत्येकी १,००,००० चा धनादेश देण्यात आला.

महाअंतिम सोहळ्यात पोहोचलेल्या साऱ्याच स्पर्धकांनी यावेळी एकाहून एक सरस गाणी सादर केली. मात्र, या सगळ्यात वरचढ ठरली ती गौरी अलका पगारे, प्रथम उपविजेता ठरली मुंबईची श्रावणी वागळे व द्वितीय उपविजेते पद जयेश खरेला मिळाले. मृण्मयी देशपांडे हिच्या सूत्रसंचालनाने ह्या पर्वाला अजूनच बहार आली, आणि हा महाअंतिम सोहळा देखील अगदी दिमाखात पार पडला. एकूण काय तर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्सच’ हे पर्व स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय होतं.
