
जगभरात सगळीकडे महिला दिन साजरा होत असतानाच कलर्स मराठीवरील मालिकांमधील कलाकारांनीही मोठ्या जल्लोषात महिला दिन साजरा केला. कलर्स मराठीतर्फे आजोजित करण्यात आलेल्या ‘महिलांची भव्य बाईक रॅली’ला अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. यावेळी महिला दिनानिमित्त आयोजिलेल्या या खास बाईक रॅलीमध्ये ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतील रत्नमाला (निवेदिता सराफ), कावेरी (तन्वी मुंडले), ‘काव्यांजली’मधील मीनाक्षी ( पूजा पवार), काव्या (कश्मिरा कुलकर्णी) सहभागी झाल्या होत्या. याशिवाय या रॅलीतील खास आकर्षण होते ती, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘इंद्रायणी’ मालिकेतील ‘इंदू’ म्हणजेच सांची भोईर. पारंपरिक पोशाखात सहभागी झालेल्या महिला रायडर्सना यावेळी त्यांनी प्रोत्साहन दिले. तसेच या रॅलीमधील महिला रायडर्सना ‘बेस्ट ग्रुप’, ‘बेस्ट ड्रेस’, ‘बेस्ट बाईक सजावट’, ‘बेस्ट संदेश’ असे विशेष पुरस्कारही या कलाकारांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याव्यतिरिक्त ‘महिला उद्योजिका अचिव्हर्स २०२४ अवॉर्ड’चे वितरणही यावेळी करण्यात आले.
महिलांचे कार्य, कर्तृत्व, व्यवस्थापन, कलागुण हे प्रभावशाली असतात. म्हणूनच त्यांचे हे अनन्यसाधारण महत्व पटवून देण्यासाठी खास महिला दिन साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रात महिला आपली कामगिरी दाखवत असतानाच रुपेरी पडद्यावरही महिलांचे कर्तृत्व अधोरेखित केले जाते. कलर्स मराठीवरीलही अशाच महिलांना सन्मान या शोच्या माध्यमातून करण्यात आला.

