दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षक होणार मालामाल.. येतोय “ये रे ये रे पैसा ३

चित्रपट १ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

मॅड कॉमेडी असलेल्या ये रे ये रे पैसा चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. त्यानंतर “ये रे ये रे पैसा २”  या नावानं आलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेललाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं.  आता दिग्दर्शक संजय जाधव “ये रे ये रे पैसा ३” प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. येत्या दिवाळीमध्ये १ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले आहे. 

अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अॅरो पिक्चर्स  या निर्मिती संस्थांचे सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, कुमार मंगत पाठक, ओमप्रकाश भट्ट, नासिर शरीफ  यांनी “ये रे ये रे पैसा ३”  या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर निनाद नंदकुमार बत्तीन सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा व  दिग्दर्शन संजय जाधव यांचे आहे. चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांचीच आहे, तर संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे.

कोणते कलाकार दिसणार?

चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

पैसा मिळवण्यासाठीची धडपड आणि त्यातून होणारे गोंधळ या पूर्वीच्या दोन्ही चित्रपटात पाहायला मिळाले होते. या दोन्ही चित्रपटांचा प्रेक्षकांची तुफान प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता “ये रे ये रे पैसा ३” मध्ये आणखी काय वेगळी कथा दाखवली जाणार याची उत्सुकता आहे. उत्तम अभिनेते या चित्रपटात असल्यानं हा चित्रपट प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार यात काहीच शंका नाही.

Leave a comment