दि एआय धर्मा स्टोरी’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

वडिल – मुलीचे भावनिक नाते आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा ‘दि एआय धर्मा स्टोरी’ येत्या २५ ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे. ट्रेलरमधील प्रत्येक क्षण या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा आहे.

पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित या चित्रपटात पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, दीप्ती लेले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बियु प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत.

मुलीच्या जीवासाठी एआयच्या जंजाळात माणूसपण हरवून हतबल झालेल्या बापाची थरारक गोष्ट !!

ट्रेलरमध्ये एआयच्या साहाय्याने फेक व्हिडीओ बनवल्याबद्दल अरविंद धर्माधिकारीच्या मुलीला कोणीतरी किडनॅप केल्याचे दिसत असून त्यांच्याकडे धमकावून पैशांची मागणी केली जात आहे. यामागे नेमके काय कारण आहे? यात धर्मा कसा अडकतोय?त्याच्या मुलीची सुटका होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मिळणार आहेत. दरम्यान, पुष्कर जोग याने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहेत. त्याच्या प्रत्येक चित्रपटांमध्ये अतिशय अनोख्या पद्धतीने नातेसंबंध हाताळले जातात. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो.  यावेळी नात्याला तंत्रज्ञानाची जोड लाभली असल्याने या चित्रपटातही काहीतरी हटके असणार हे नक्की!

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतो, ‘’ हल्ली सर्वत्र एआयचे तंत्रज्ञान फोफावतेय. ते जितके फायदेशीर आहे, तितकेच त्याचे तोटेही आहेत. याच
जाळ्यात अडकलेल्या वडिलांची ही कहाणी आहे. प्रत्येक वळणावर यातील सस्पेन्स वाढणार आहे. मराठी चित्रपटाला  थोडा हॅालिवूड टच देण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. यात अनेक हॅालिवूड ॲक्शन सिक्वेन्स पाहायला मिळतील. मला खात्री आहे, माझा हा प्रयत्नही प्रेक्षक नक्कीच स्वीकारतील.’’

Leave a comment