
‘सन मराठी’वर सुरू होणारी नवी मालिका ‘जुळली गाठ गं’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १३ जानेवारीपासून दररोज रात्री ८:३० वाजता प्रसारित होणारी ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेतील सावीने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी लिहिलेलं एक भावनिक पत्र खूप गाजत असून, यामुळे अनेक अभिनेत्री भावूक झाल्या आहेत. सावीने या पत्राद्वारे नवऱ्याकडून तिला काय अपेक्षा आहेत, हे व्यक्त केलं आहे. या पत्राने सिनेसृष्टीतील काही अभिनेत्रींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
प्रार्थना बेहरेची हृदयस्पर्शी आठवण

अभिनेत्री प्रार्थना बेहरे म्हणाली, “सावीचं पत्र वाचून मला माझ्या आयुष्यातील एक प्रसंग आठवला. लग्नाआधी मी काकाकडे राहत होते. एकदा शूटिंगसाठी लंडनला गेले असताना काकांचं निधन झालं. त्या वेळी मी परत येऊ शकले नाही, पण माझ्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळींनी मला खूप आधार दिला. माझ्या नवऱ्याने लंडनला येऊन मला धीर दिला आणि माझ्या गैरहजेरीत घरची काळजी घेतली. अशा नवऱ्याचा आदर आणि सन्मान प्रत्येक महिलेला मिळायला हवा.”
योगिता चव्हाणच्या भावना..
अभिनेत्री योगिता चव्हाण म्हणाली, “सावीच्या पत्राने मला माझ्या वैवाहिक नात्याची आठवण करून दिली. माझा नवरा सौरभ आणि मी दोघे मिळून घरातली कामं करतो. एकदा माझे बाबा आले असताना त्यांनी सौरभला काम करताना पाहिलं आणि मला विचारलं, हे सौरभ का करत आहे? त्यावर सौरभने त्यांना समजावलं, की प्रत्येक नात्यात समानता असायला हवी. त्या क्षणी मला खूप आनंद झाला. सावी म्हणते तसं नवऱ्याला देवाचं स्थान मिळतं, तसंच बायकोलाही देवीचा मान मिळायला हवा.”
‘जुळली गाठ गं’ ही मालिका सावीच्या दृष्टिकोनातून लग्नानंतरच्या नात्यांमधील अपेक्षा आणि समजुतदारपणाचं प्रतिबिंब दाखवते. या मालिकेच्या माध्यमातून नात्यांमधील आदर आणि समानतेचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘जुळली गाठ गं’ पहायला विसरू नका, १३ जानेवारीपासून, दररोज रात्री ८:३० वाजता, फक्त ‘सन मराठी’वर.
मनोरंजन विषयक बातम्यांसाठी पाहत रहा Batamiwala.com
