आजारावर मात करत अभिनेते विद्याधर जोशी यांचं मालिका विश्वात पुनरागमन



स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेत लवकरच ज्येष्ठ अभिनेते विद्याधर उर्फ बाप्पा जोशी यांचं आगमन होणार आहे. उमाच्या भावाची, म्हणजेच बाळामामाची भूमिका ते साकारणार आहेत. बाळामामा एक आयुर्वेदिक औषधांचे जाणकार आहेत, जे मंजिरीवर उपचार करण्यासाठी पंढरपूरात आले आहेत. वृत्तीने स्पष्टवक्ता, परखड आणि लाघवी असलेला बाळामामा प्रेक्षकांच्या मनात घर करेल, यात शंका नाही.

विद्याधर जोशींचं दोन वर्षांनंतर पुनरागमन

जीवघेण्या आजारावर मात करून दोन वर्षांच्या ब्रेकनंतर विद्याधर जोशी पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात परतले आहेत. अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे बाप्पा जोशी या नव्या भूमिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

पुनरागमनाचा आनंद व्यक्त करताना बाप्पा सांगतात

“दोन वर्षांनंतर पुन्हा आवडीचं काम करताना अतिशय आनंद होत आहे. माझ्या सहकलाकारांकडून खूप आधार मिळाला आणि स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांनीही प्रचंड मानसिक आधार दिला. आता प्रकृती उत्तम असून प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. बाळामामा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

येड लागलं प्रेमाचं ही मालिका रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रसारित होते. प्रेक्षकांनी बाळामामाच्या या नव्या भूमिकेला प्रेम आणि पाठिंबा द्यावा, असे आवाहनही जोशी यांनी केले आहे.

Leave a comment