स ला ते स ला ना ते’मध्ये उपेंद्र लिमये झळकणार

“स ला ते स ला ना ते’मध्ये उपेंद्र लिमयेनी साकारली हसनभाईची भूमिका

जोगवा, ॲनिमल अशा अनेक चित्रपटांतून दमदार अभिनय केलेले उपेंद्र लिमये आता ‘स ला ते स ला ना ते’ या अनोख्या नावाच्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. उपेंद्र लिमये यांनी नेहमीच भूमिकांमधील वैविध्य जपत उत्तम अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. या चित्रपटात ते हसनभाईची भूमिका साकारणार असून, त्यांची भूमिका कशी असेल याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

चित्रपटाची निर्मिती आणि तांत्रिक बाजू

स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत ‘स ला ते स ला ना ते’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केलं आहे. या चित्रपटासाठी श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लिहिली असून, संवाद लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केलं आहे. विनायक जाधव यांनी छायांकन, सचिन नाटेकर यांनी संकलन, एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन, तर रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. दिग्दर्शक संतोष कोल्हे यांची सामाजिक विषयांवर मनोरंजक शैलीत भाष्य करण्याची खासियत या चित्रपटातही अनुभवायला मिळेल.

चित्रपटाची कथा आणि उपेंद्र लिमयेची भूमिका

‘स ला ते स ला ना ते’ हा चित्रपट एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टर आणि पर्यावरणप्रेमी तरुणी यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. त्यांच्या उमलणाऱ्या नात्यात अनेक व्यक्तिरेखा येतात, ज्यामुळे कथा रंगतदार बनते. उपेंद्र लिमये यांची हसनभाई ही व्यक्तिरेखा खाणमालकाची असून, या भूमिकेत ते एका वेगळ्या रंगात दिसणार आहेत.

महोत्सवांतील यश आणि प्रेक्षकांसमोर सादरीकरण

‘स ला ते स ला ना ते’ हा चित्रपट विविध महोत्सवांमध्ये दाखवला गेला असून, तिथे त्याला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता हा चित्रपट ७ फेब्रुवरी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तेव्हा पाहायला विसरू नका, हा सामाजिक भाष्य करणारा मनोरंजक चित्रपट!

Leave a comment