‘सन मराठी’कडून महिला पोलिसांच्या कार्याला सलाम

प्रजासत्ताक दिनानिमित्त महिला पोलिसांमध्ये रंगला ‘सोहळा सख्यांचा’ कार्यक्रम

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘सन मराठी’ वाहिनीकडून महिला पोलिसांना त्यांच्या निस्वार्थ सेवेबद्दल अनोखी मानवंदना देण्यात आली. देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही क्षण निवांतपणे जगता यावेत, या उद्देशाने ‘सोहळा सख्यांचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात महिला पोलिसांना साडी आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, या महिलांना स्वतःला छोट्या पडद्यावर पाहण्याचा आनंद मिळाला. २५ आणि २६ जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे विशेष भाग प्रसारित होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, महिला पोलिसांनी त्यांच्या कर्तव्य काळातील अनुभव आणि मजेदार किस्से शेअर केले.

PSI प्रज्ञा देशमाने यांचे विचार:

“देशाच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावताना स्वतःसाठी वेळ मिळवणे अवघड असते. वर्दी परिधान केल्याचा अभिमान हा पैशात मोजता न येणारा आहे. सण-उत्सव म्हटलं की आमच्यासमोर बंदोबस्ताची जबाबदारी असते. मात्र, ‘सोहळा सख्यांचा’ या कार्यक्रमामुळे आम्हाला आमच्या कलागुणांना वाव मिळाला. आज मी माझ्या सहकाऱ्यांच्या वेगवेगळ्या कला पाहिल्या, ज्याची मला यापूर्वी कल्पना नव्हती. हा एक दिवस आमच्यासाठी खऱ्या अर्थाने निखळ आनंदाचा ठरला. ‘सन मराठी’चे यासाठी मनापासून आभार.”

सूत्रसंचालक आशिष पवार यांचे विचार:

“प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस महिलांसोबत हा कार्यक्रम घेण्याची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद आहे. या महिलांना त्यांच्या दैनंदिन धकाधकीतून काही क्षण स्वतःसाठी जगता आले, हे पाहून समाधान वाटले. कार्यक्रमादरम्यान, महिलांनी व्यक्त केलेले विचार ऐकून मला जाणवले की कितीही संकटं असली तरी मानसिक स्थिरता राखत कर्तव्य निभावणे हे किती महत्त्वाचे आहे. त्यांच्या सोबत संवाद साधून आणि त्यांचे मनोरंजन करून मला खूप ऊर्जा मिळाली.”

‘सोहळा सख्यांचा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठीही एक प्रेरणादायी अनुभव ठरणार असून, महिला पोलिसांच्या कार्याला सन्मान देणारा हा अनोखा उपक्रम आहे.

Leave a comment