स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रंगणार श्री आणि सौ स्पर्धा

जानकी-ऋषिकेश, ऐश्वर्या-सारंग, आणि अवंतिका-सौमित्र होणार सहभागी

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना रंगतदार श्री आणि सौ स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मुळशी परिसरातील उद्योजकांसह जानकी-ऋषिकेश, ऐश्वर्या-सारंग, आणि अवंतिका-सौमित्र या तीन प्रमुख जोड्या या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत २५ लाख रुपयांचं बक्षीस विजेत्या जोडीला जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे प्रेक्षक आणि गावकऱ्यांचेही लक्ष वेधले आहे.

स्पर्धेतील पहिली फेरी – पाककला कौशल्याची कसोटी

श्री आणि सौ स्पर्धेत स्पर्धकांना वेगवेगळे टास्क पार पाडावे लागणार आहेत. पहिली फेरी पाककला स्पर्धा असेल, जिथे स्पर्धकांचे स्वयंपाक कौशल्य आजमावले जाईल. जानकीची पाककलेतली सफाई सर्वश्रुत आहे, मात्र ऐश्वर्याने ही फेरी जिंकण्यासाठी एक खास डाव आखला आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांमध्ये आहे.

शूटिंगसाठी घेतले अथक परिश्रम

या स्पर्धेचे शूटिंग करताना कलाकार आणि संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. उन्हाच्या कडाक्यात पदार्थ बनवण्यासोबत संवाद पाठ करणे ही कलाकारांसाठी मोठी कसरत ठरली. मालिकेचे दिग्दर्शक राहुल लिंगायत यांनी हा सीन अचूक साकारण्यासाठी प्रत्येकाला मार्गदर्शन केलं. कलाकारांनी देखील आपली भूमिका परिपूर्ण करण्यासाठी प्रचंड तयारी केली.

श्री आणि सौ स्पर्धेतील चुरस अनुभवायला विसरू नका

या रोमांचक स्पर्धेतील प्रत्येक फेरीत काय काय रंगणार आणि शेवटी कोण जिंकणार हे जाणून घ्यायचं असेल तर पाहा ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही लोकप्रिय मालिका दररोज सायंकाळी ७:३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a comment