अनुश्री फिल्म्सच्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे

अनुश्री फिल्म्सच्या नव्या वर्षातील पहिल्याच प्रोजेक्टचा मुहूर्त संपन्न, अभिनेत्री सुरभीसोबत चित्रीकरणाला सुरुवात



आंबट गोड, लक्ष्मी सदैव मंगलम तसेच जय मल्हार मालिकेतील म्हाळसा या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली गुणी अभिनेत्री सुरभी हांडे आता अनुश्री फिल्म्सच्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे.

सुरभीने नुकतेच या नव्या प्रोजेक्टच्या मुहूर्ताचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवरून असे दिसते की, या प्रोजेक्टच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे.

भावभक्ती विठोबा, गजानना, गाव कोकण, लढला मावळा रं, अशी सुंदर गाणी तसेच त्या दोघी, देवी, शालिनीझ होम किचन असे विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणारे शॉर्टफिल्म्स आणि कलाकृती अनुश्री फिल्म्सच्या माध्यमातून प्रदर्शित झाल्या आहेत.

अभिनेत्री सुरभी हांडे आपल्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगते,
“वर्षातील हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे. शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि मी फार उत्सुक आहे अनुश्री फिल्म्सच्या टीमसोबत काम करायला. आमच्या प्रोजेक्टचं चित्रीकरण महाराष्ट्रातील काही दुर्गम भागात होणार आहे, त्यामुळे माझ्यासाठी हे थोडं एडवेंचरस असणार आहे.”

अनुश्री फिल्म्सचे निर्माता मयूर तातुस्कर यांचे मत

निर्माते मयूर तातुस्कर त्यांच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगतात, “आमच्या अनुश्री फिल्म्सच्या नव्या वर्षातील नवीन प्रोजेक्टला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि तीही दिमाखात आणि उत्साहात! आम्ही नेहमीच प्रेक्षकांसाठी हृदयाला भिडणाऱ्या कथा घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. या प्रोजेक्टमध्ये देखील प्रेक्षकांना काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल याची आम्हाला खात्री आहे.”

“यावेळी आम्ही पहिल्यांदाच प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडेसोबत काम करत आहोत, आणि हा अनुभव अतिशय प्रेरणादायी ठरत आहे. सुरभी हांडे या मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री असून, त्यांच्या अभिनयामुळे आणि कामातील उत्साहामुळे आमच्या टीमला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे आम्ही एक सुंदर कलाकृती तयार करू शकू, याची खात्री वाटते. आमच्या अनुश्री फिल्म्सला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”

दिग्दर्शक शुभम घाटगे यांनी उलगडला चित्रीकरणाचा प्रवास

दिग्दर्शक शुभम घाटगे चित्रीकरणाविषयी सांगतो,
“लहानपणी सुरभीच्या भूमिका टीव्हीवर बघितल्या होत्या. आता त्यांच्यासोबत काम करताना खूप भारी वाटतंय! या प्रोजेक्टचं शूटिंग फार दुर्गम ठिकाणी होत असल्यामुळे काही अडथळे आणि आव्हाने नक्कीच असतील. कमी सुविधा, थंडीचा त्रास, धोकादायक जंगल, धरणाचा भाग आणि दुर्गम रस्त्यांवरून प्रवास करणे हे सगळं अॅडव्हेंचरस आहे. पण सुरभी आणि आमच्या टीमचा जबरदस्त रॅपो जुळल्यामुळे सगळं सोप्पं होणार आहे.”

“या सह्याद्रीच्या अनएक्सप्लोर्ड खजिन्यातून नक्कीच काहीतरी अद्भुत हाती लागेल, याची आम्हाला खात्री आहे!”

प्रेक्षकांमध्ये उत्सुकता – नेमका हा प्रोजेक्ट काय आहे?

अभिनेत्री सुरभी हिची प्रमुख भूमिका असलेला हा प्रोजेक्ट नेमका कोणता आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये ताणली गेली आहे. सुरभीच्या चाहत्यांसाठी हा नव्या वर्षाचा पहिला सरप्राईज ठरणार आहे, यात शंका नाही! तेव्हा या नवीन अनुश्री फिल्म्स प्रोजेक्ट बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी अपडेट्ससाठी लक्ष ठेवा!

Leave a comment