मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर होणारे ‘विश्व मराठी संमेलन’ म्हणजे मराठी भाषेचा गौरव – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

विश्व मराठी संमेलन २०२५’ चे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद

पुणे, २९ जानेवारी २०२५: फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘विश्व मराठी संमेलन २०२५’ बाबत सविस्तर माहिती दिली.

“मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर होणारे पहिलेच विश्व मराठी संमेलन म्हणजे मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने गौरव,” असे सांगत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली.

३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पुण्यात रंगणार मराठी संस्कृतीचा सोहळा

हे भव्य संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे संपन्न होणार आहे ‘अभिजात मराठी’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या संमेलनात मराठी भाषा, साहित्य, कला, संस्कृती आणि परंपरांचा जागर केला जाणार आहे.

यावेळी संमेलनाची सुरुवात बालगंधर्व रंगमंदिरापासून भव्य शोभायात्रेने होईल. उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते, तर उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडेल.

विशेष सन्मान आणि पुरस्कार वितरण

या संमेलनात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना विशेष सन्मान प्रदान केला जाणार आहे.

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना “साहित्य भूषण पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे रितेश देशमुख यांना “कलारत्न पुरस्कार” देऊन विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.

याशिवाय, साहित्य, कला, क्रीडा, खाद्यसंस्कृती आणि संस्कृती क्षेत्रातील अनेक मान्यवरांना गौरवण्यात येईल.

१७ देशांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय मराठी संस्कृतीचा संगम

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढे सांगितले की,

“या संमेलनात १७ देशांतील मराठी भाषिक प्रतिनिधी आणि बृहन महाराष्ट्र मंडळे यांचे सुमारे २०० हून अधिक मराठी प्रेमी सहभागी होतील. मराठीचा जागतिक स्तरावर प्रचार व प्रसार होण्यासाठी ही मोठी संधी असेल.”

मराठी भाषेच्या जपणुकीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम

“जुनी पुस्तके द्या आणि नवीन पुस्तके घेऊन जा” हा आगळा-वेगळा उपक्रम आयोजित केला जाणार आहे.

कवी संमेलन, मराठमोळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थी कार्यशाळा आयोजित केल्या जातील. विद्यार्थ्यांसाठी मराठीतून वाणिज्य, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शिक्षणाचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल. मराठी युवकांनी नोकरीऐवजी उद्योग व व्यवसायाकडे वळावे यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र ठेवले जाणार आहे.

महिला कायदा, स्त्री साहित्य आणि न्याय यावर विशेष परिसंवाद

या संमेलनात डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहेत.

“महिला कायदा आणि न्याय”

“मराठी भाषा आणि स्त्री साहित्य”

प्रमुख उपस्थित मान्यवर

यावेळी मराठी भाषा विभागाचे संचालक शशिकांत देवरे, विश्व मराठी संमेलनाच्या समन्वय समितीचे सदस्य डॉ. दीपक मराठे, प्राध्यापक चारुदत्त निमकर, पुणे शहर सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, शिवसेना संपर्कप्रमुख (लातूर जिल्हा) रंजना कुलकर्णी, पुणे शहर प्रमुख सुरेखा कदम-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषेचा जागर घडवणाऱ्या या अभिजात सोहळ्याचा साक्षीदार व्हा!

‘विश्व मराठी संमेलन २०२५’ हे केवळ साहित्यिक आणि सांस्कृतिक महोत्सव नसून मराठी भाषेच्या जागतिक अस्मितेचा सोहळा आहे.

मराठीप्रेमींनी या संमेलनात अवश्य सहभागी व्हावे आणि आपल्या अभिजात भाषेचा गौरव साजरा करावा!

The ‘jagtik Marathi sahitya sammelan’ to be held after Marathi language gets elite status is the glory of Marathi language – Deputy Speaker Dr. Neelam Gorhe

Leave a comment