अभिनेते रमेश देव मार्ग नामकरण सोहळा दिमाखात संपन्न

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशा चतुरस्र भूमिकांमध्ये तब्बल सहा दशके योगदान देणारे ज्येष्ठ अभिनेते कै. रमेश देव यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त, अंधेरी पश्चिम, वर्सोवा येथील एका रस्त्याचे ‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’ असे नामकरण करण्यात आले.

‘मराठी चित्रपट कट्टा’ चे लोकार्पण

मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा गौरव करण्यासाठी निर्मिलेल्या ‘मराठी चित्रपट कट्टा’ चे लोकार्पण आणि रस्त्याचे नामकरण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अमित साटम यांच्या संकल्पनेतून हे नामकरण करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आनंद देणारा दिवस – सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले, “मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते रमेश देव यांचा मोठा ठसा आहे. त्यांच्या नावाने मार्ग होणे, हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी गौरवाचा क्षण आहे. ‘मराठी चित्रपट कट्टा’च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले, याचा आम्हाला अभिमान आहे.”

अभिनेते अजिंक्य देव यांचे मनोगत

अभिनेते अजिंक्य देव म्हणाले, “आज संपूर्ण देव कुटुंबियांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. बाबांच्या प्रेमापोटी येथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. बाबांच्या नावाचा मार्ग झाला, याचा अतिशय आनंद आहे.”

ते पुढे म्हणाले, “या उपक्रमासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, भाजप नेते विनोद तावडे, आमदार अमित साटम आणि नगरसेवक रोहन राठोड यांनी पुढाकार घेतला, यासाठी मी त्यांचे आभार मानतो. हे बाबांचेच आशीर्वाद आहेत.”

सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती

या नामकरण सोहळ्यासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ गायिका वैशाली सामंत, दिव्या खोसला कुमार, कांचन घाणेकर तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

रमेश देव यांच्या योगदानाचा सन्मान करणारा हा विशेष सोहळा मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद ठरला.

Leave a comment