बर्थडे बॉय अंकुश चौधरीकडून चाहत्यांना खास रिटर्न गिफ्ट!

१३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ या सुपरहिट चित्रपटाने प्रेक्षकांना हसवून लोटपोट केले होते. या चित्रपटातील कलाकारांची धमाल आणि ‘जपून जपून जा रे’ या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावले होते. तब्बल दशकभरानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची मागणी सतत होत होती. अखेर वाढदिवसाचे औचित्य साधत अभिनेता अंकुश चौधरीने ‘नो एंट्री पुढे धोका आहे २ – कॉमेडी ऑफ टेरर्स’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केली आहे.

मराठीतही ‘फ्रेंचायझी ट्रेंड’ची लाट

बॉलिवूड, हॉलिवूड आणि टॉलीवूडमध्ये फ्रेंचायझी ट्रेंड जोरात असताना आता मराठीतही हा ट्रेंड वाढू लागला आहे. ‘टाइमपास’, ‘लय भारी’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या चित्रपटांनंतर आता ‘नो एंट्री पुढे धोका आहे २’ हा सुद्धा यशस्वी फ्रेंचायझी बनण्याच्या तयारीत आहे. पहिल्या भागातील विनोद आणि धमाल डबल डोससह मोठ्या पडद्यावर परतणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाची जादू आणि हटके थीम

निखिल सैनी फिल्म्स अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अंकुश चौधरी करणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये स्टायलिश लूकमधील अंकुश चौधरीसोबत दोन मुली दिसत आहेत, ज्या अर्ध्या मानवी रूपात तर अर्ध्या रोबोटच्या रूपात आहेत. त्यामुळे चित्रपटात आधुनिक तंत्रज्ञानाची आणि विज्ञान-फॅन्टसीची झलक पाहायला मिळणार आहे.

कॉमेडी जॉनर असलेल्या या चित्रपटाला नकाश अजीज आणि सरगम जस्सू यांचे संगीत लाभले आहे. अद्याप कलाकारांची घोषणा करण्यात आलेली नसली तरी चित्रपटाच्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

अंकुश चौधरी यांच्या शब्दात

अभिनेता-दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणतात,
‘’आज वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांनी माझ्यावर जो शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, तो खूपच भावनिक आहे. तुमच्या प्रेमाखातरच मी रिटर्न गिफ्ट म्हणून या चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन येतोय. ‘नो एंट्री’च्या पहिल्या भागावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. त्यांच्या प्रेमाचा आदर ठेवत आम्ही दुसऱ्या भागाची घोषणा करत आहोत. हा चित्रपट डबल धमाल घेऊन येणार आहे.’’

चित्रपटाचे निर्माते निखिल सैनी सांगतात...

‘’आज अंकुश चौधरीचा वाढदिवस आहे. या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी याहून चांगला दिवस असूच शकत नाही. आमच्या टीममधील प्रत्येक जण कमालीचा आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा भाग होताना आम्हाला निश्चितच आनंद होत आहे. प्रेक्षकांसह आम्हीसुद्धा या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहोत.’’

मराठी कॉमेडी सिनेमासाठी नवीन पर्व

‘नो एंट्री पुढे धोका आहे २ – कॉमेडी ऑफ टेरर्स’ हा चित्रपट सस्पेन्स, विनोद, तंत्रज्ञान आणि धमाल यांचा अनोखा मिलाफ असणार आहे. आता प्रेक्षकांना या कॉमेडी फ्रेंचायझीच्या दुसऱ्या भागासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजणार हे निश्चित!

Leave a comment