
‘सन मराठी’ वाहिनीवरील नवी मालिका ‘जुळली गाठ गं’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. लग्न झाल्यानंतर महिलांना योग्य मान मिळावा आणि त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावं हेच या मालिकेतून दाखवलं जात आहे. मालिकेत धैर्य आणि सावी यांचे वाद सुरु असून धैर्य आणि त्याच्या आईने सावीच्या आजोबांची शाळा विकत घेण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. मात्र, सावी आपल्या निर्णयावर ठाम आहे.
सिंगल मदरची जबाबदारी निभावताना सुरेखा कुडची यांचा अनुभव
मालिकेचं शूटिंग कोल्हापुरात सुरू असल्याने कलाकारांना आपल्या कुटुंबापासून दूर राहावं लागत आहे. मालिकेत ‘दामिनी मुजुमदार’ ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची या खऱ्या आयुष्यात सिंगल मदर म्हणून आपल्या मुलीचा सांभाळ करतात.
अभिनेत्री सुरेखा कुडची यांचे अनुभव
“मालिकेतही मी सिंगल मदर आहे आणि खऱ्या आयुष्यातही… त्यामुळे ही भूमिका मला प्रचंड भावते. माझी मुलगी सध्या दहावीला आहे, पण कामामुळे कधीच तिला पुरेसा वेळ देता येत नाही. ती अवघी साडेतीन वर्षांची असताना माझ्या नवऱ्याचं निधन झालं. तेव्हापासून मी तिचा सांभाळ एकटीनेच केला आहे. माझ्या आई-बाबांनी मला पाठिंबा दिला नसता, तर इथवर येणं शक्य नव्हतं. माझ्या मुलीच्या बालपणातही मला तिच्याबरोबर जास्त राहता आलं नाही. तिने टेलिव्हिजनवर मला पाहूनच मोठं होणं शिकून घेतलं.”
“मी घरी नसताना माझ्या आई-बाबांनी तिच्यावर चांगले संस्कार केले. ती माझ्यासाठी फक्त मुलगी नाही, तर माझं संपूर्ण जग आहे. कामामुळे महिन्यातील २५ दिवस तरी मी बाहेर असते, त्यामुळे जेव्हा मी तिला भेटते, तेव्हा तिला बिलगून राहते, तिचे सगळे लाड पुरवते. बऱ्याच महिला सिंगल मदर म्हणून आपल्या मुलांचं संगोपन करत असतात आणि हा काळ खूप जबाबदारीचा असतो. अशावेळी आपल्या कुटुंबाचा, नातेवाईकांचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं असतं. मी या बाबतीत स्वतःला खूप नशीबवान समजते.”
‘जुळली गाठ गं’ मालिकेतील भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर…
“‘जुळली गाठ गं’ या मालिकेत मी दामिनी मुजुमदार ही खलनायिकेची भूमिका साकारते. पण जशी आईला आपलं मूल प्रिय असतं, तशीच दामिनीला धैर्य प्रिय आहे. त्याच्याकडे मुजुमदारांचं साम्राज्य असावं, यासाठी ती प्रयत्न करत आहे. या मालिकेचा विषय खूप छान आहे. प्रेक्षकांनी मालिकेला पसंती दर्शवली, म्हणून आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळते. म्हणूनच सर्व प्रेक्षकांनी सोम. ते रवि. रात्री ८.३० वाजता ‘जुळली गाठ गं’ जरूर पाहा.”
