स्त्रीशक्तीचा जागर: आई तुळजाभवानीचा अद्वितीय दृष्टिकोन येणार समोर!

मुंबई, ५ फेब्रुवारी २०२५ – कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत बाल गणेशाच्या लीला आणि देवी भवानीचा दृष्टिकोन अधिक विस्ताराने उलगडला जाणार आहे. मालिकेच्या पुढील भागांमध्ये स्त्रीशक्ती आणि तिच्या स्थानाविषयी देवी भवानीने व्यक्त केलेले विचार अधिक ठळकपणे समोर येणार आहेत.

बालगणेश आपल्या गावी परत जाण्याचा विचार करतो, मात्र भवानीशंकर यांना देवी सांगण्याचा प्रयत्न करते की गणेश एकटा जाणार नाही आणि आपल्यातील वादाचा राग त्याच्यावर काढू नये. याचवेळी अशोकसुंदरीच्या मदतीने गणेश एक वाडा बांधण्याची कल्पना मांडतो, परंतु देवी ही कल्पना स्पष्ट शब्दांत नाकारते.

स्त्रीशक्तीवरील महत्त्वाचा संदेश

देवी भवानी पद्महंसा यांना स्त्रीच्या संघर्षाबद्दल सांगताना स्पष्ट करते की,
“स्त्रीला आपले स्थान संघर्षातूनच मिळवावे लागते. कोणालाही ते सहज मिळत नाही, ते तिने स्वतःच निर्माण करायचे असते. स्त्री केवळ आई, पत्नी किंवा मुलगी नसून ती स्वतः एक स्वतंत्र शक्ती आहे. पण जोपर्यंत ती स्वतःचं स्थान ओळखत नाही, तोपर्यंत समाज तिला परावलंबी ठरवतो. कुटुंब ही तिची जबाबदारी असली तरी स्वतःचं अस्तित्व विसरणं हा त्याग नसून एक मोठी चूक आहे. कारण जी स्त्री स्वतःला विसरते, तिचे अस्तित्वही समाज विसरतो.”

देवी पुढे म्हणते,
“स्त्रीला कोणत्याही चौकटीत अडकवायचं नाही, तिने स्वतःचं विश्व निर्माण करायला हवं. स्वतःच्या सन्मानासाठी उभं राहायला हवं. कैलासात माझं घर आहे, पण मी पृथ्वीवर माझ्या स्थानासाठी आले आहे. हा अवतार घेण्यामागे एक कारण आहे.”

या संवादातून आजच्या स्त्रीसाठी एक अतिशय सुंदर संदेश दिला आहे, जो प्रत्येक स्त्रीने आत्मसात करायलाच हवा.

महादेव आणि देवी तुळजाभवानीची अखेर भेट होणार का?

दुसरीकडे, बालगणेश तुळजा आणि महादेव यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. यासाठीच गणेश देवीकडे जाऊन परिसराविषयी विचारतो, आणि देवी भवानी तुळजाभवानी रूपात त्याला परिसर दाखवायला निघते.

याचवेळी अशोकसुंदरी महादेवांना एका अंधाऱ्या गुहेतील कुंडाबद्दल सांगते आणि त्यांना मूळ रूपात येण्यास राजी करते. देवी परिसर दाखवत असताना तिला एक अनोळखी गुहा दिसते आणि ती आश्चर्यचकित होते.

गणेश आपल्या वाक्चातुर्याचा उपयोग करून आई तुळजाला त्या गुहेत एकटी पाठवतो. दुसरीकडे, महादेव त्या गुहेपाशी आल्यावर गणेशाला कैलासावर न परतण्याचे कारण विचारतो. गणेश गुहा पाहण्याचा आग्रह धरतो, त्यामुळे आता गणेश आपल्या या युक्तीमध्ये यशस्वी होईल का? महादेव आणि आई तुळजाभवानी अखेर एकमेकांना भेटतील का? हे बघणे रंजक ठरेल.

आई तुळजाभवानी’ मालिकेतील पुढील भाग अजून अधिक रोमांचक!

या पुढील भागांतून स्त्रीशक्ती, नवा संघर्ष आणि देवी भवानीच्या अद्वितीय दृष्टिकोनाची अधिक प्रचीती येणार आहे.

तेव्हा नक्की पाहा ‘आई तुळजाभवानी’ दररोज रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर!

Leave a comment