स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत दिसणार सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता विक्की कौशल

‘छावा’ सिनेमाच्या निमित्ताने विक्की कौशल यांनी घरोघरी मातीच्या चुलीच्या सेटवर लावली खास हजेरी

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२५: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ सध्या श्री आणि सौ स्पर्धेच्या रंगतदार टप्प्यावर आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असतानाच, आता मालिकेत एक विशेष पाहुणा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो पाहुणा म्हणजेच बॉलीवुड सुपरस्टार विक्की कौशल!

विक्की कौशल सध्या त्यांच्या बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘छावा’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. याच निमित्ताने त्यांनी ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या सेटवर विशेष हजेरी लावली आणि सेटवरील कलाकार व संपूर्ण टीमसोबत काही अविस्मरणीय क्षण घालवले.

विक्की कौशलने दिला जानकी-ऋषिकेशला स्पर्धा जिंकण्याचा मंत्र

मालिकेत सध्या जानकी आणि ऋषिकेश श्री आणि सौ स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठी संपूर्ण जिद्दीने प्रयत्न करत आहेत. या कठीण स्पर्धेत त्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी विक्की कौशलने खास टिप्स दिल्या.

“खेळ असो वा लढाई… हिंमत कधी हरायची नाही! जर जिंकायचं असेल, तर गनिमी काव्यानेही जिंकता येतं. लढाई ही आपल्या माणसांच्या भरोशावर लढायची असते, आणि नवरा-बायकोपेक्षा उत्तम टीम दुसरी कोणतीच नसते. म्हणूनच, आत्मविश्वास ठेवा आणि जिद्दीने लढा!”

या सल्ल्यानंतर विक्कीने जानकी आणि ऋषिकेशला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि प्रेक्षकांना ‘छावा’ सिनेमा नक्की पाहण्याचं आमंत्रणही दिलं.

रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांच्यासाठी खास क्षण

जानकी आणि ऋषिकेशची भूमिका साकारणाऱ्या रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांनी विक्की कौशलसोबतच्या या दिवसाचे खास आठवणी शेअर केल्या.

“सुरुवातीला विक्की सरांसोबत काम करताना दडपण वाटत होतं, पण त्यांनी येताक्षणीच आमचं ते दडपण दूर केलं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून खूप काही शिकायला मिळालं. विशेष म्हणजे त्यांचं मराठी भाषेवरचं प्रेम आम्हाला खूप भावलं. त्यांनी शूटिंग सुरू होण्याआधी संपूर्ण टीमशी संवाद साधला आणि मालिकांचं शूटिंग कसं होतं याची माहिती घेतली. हे आमच्यासाठी एक न विसरणारा क्षण होता!”

हा खास भाग पाहण्यासाठी सज्ज व्हा!

विक्की कौशलसोबतचा हा खास भाग आणि त्यांचे सल्ले पाहण्यासाठी प्रेक्षकांना ७.३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वर ‘घरोघरी मातीच्या चुली’ नक्की पाहावा लागेल.

तसेच, विक्की कौशलच्या ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाची प्रतीक्षा संपली आहे. १४ फेब्रुवारीपासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

तेव्हा मालिकेतील हा खास भाग आणि ‘छावा’ सिनेमा, दोन्ही चुकवू नका!

Leave a comment