
सध्या मराठी मालिका विश्वात “लक्ष्मी निवास” ची जबरदस्त चर्चा आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. या कुटुंबातली शेंडेफळ म्हणजेच जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने तिच्या या प्रवासाविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
“माझी कास्टिंग सर्वात शेवटी झालं!”
दिव्या पुगावकर सांगते, “लक्ष्मी निवास मालिकेसाठी माझी कास्टिंग शेवटी झालं होतं. माझ्या कास्टिंगचा एक गमतीशीर किस्सा आहे. मला ऑडिशनला बोलावण्यात आलं, मी ऑडिशन दिलं आणि नंतर कॉल आला की ९९% तुमचं सिलेक्शन होणार आहे. पण अद्याप काहीही फिक्स झालं नव्हतं. दुसऱ्याच दिवशी “लक्ष्मी निवास” चा पहिला टीझर प्रदर्शित झाला, ज्यामध्ये कुटुंबाचा एक फोटो दाखवला गेला होता. त्यात अक्षया देवधर स्पष्ट दिसत होती आणि जान्हवीच्या जागी एक मुलगी दिसली. तेव्हा वाटलं की काही गोष्टी जुळल्या नसतील म्हणून आपलं कास्टिंग झालं नाही. तरीही, टीझर पाहून खूप आनंद झाला कारण तो खूप सुंदर दिसत होता.
“थोड्या वेळाने निर्माता सुनील भोसले यांचा कॉल आला. मी आधीच त्यांचं अभिनंदन केलं, कारण मला वाटलं की माझं कास्टिंग झालं नाही. पण त्यांनी सांगितलं की ‘तूच जान्हवी आहेस! आम्ही प्रोमो शूटसाठी तात्पुरती एक मुलगी घेतली होती.’ आणि अशा प्रकारे माझी ‘लक्ष्मी निवास’ मध्ये एंट्री झाली!”
हर्षदा ताईसोबत स्क्रीन शेअर करण्याचा आनंद!

दिव्या पुढे सांगते, “मी हर्षदा ताईला आधीपासून ओळखते आणि तिच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा होती, जी आता पूर्ण झाली आहे. लहानपणापासून मी तिला स्क्रीनवर पाहत आले आहे आणि आता तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणं, हे स्वप्न साकार झाल्यासारखं वाटतंय. आता माझ्या दोन फॅमिली आहेत – एक खरी कुटुंब आणि दुसरी ‘लक्ष्मी निवास’ ची रील कुटुंब!”
जान्हवीच्या भूमिकेसाठी खूप मुली ऑडिशन देऊन गेल्या!
“माझं शूटिंगचा पहिला दिवस अजूनही आठवतो. मी टीममध्ये सर्वात शेवटी आले आणि त्यादिवशी मी सर्वात आधी अक्षया देवधर म्हणजेच ‘भावना’ ला भेटले, कारण आम्ही दोघी व्हॅनिटी शेअर करत होतो. तिनं मला पाहताच म्हणाली, ‘अच्छा, फायनली जान्हवी तू करतेयस का? आता शूटिंग सुरू होईल!’ कारण खूप दिवसांपासून जान्हवीच्या कास्टिंगसाठी बरीच मुली ऑडिशन देऊन गेल्या होत्या, पण योग्य चेहरा मिळत नव्हता. अखेर, मला पाहून संपूर्ण टीम खूश झाली की ‘आता कुटुंब पूर्ण झालं!’
जान्हवीचा लुक आणि तिचं खास ब्रेसलेट!
“माझ्या लुकसाठी खूप मेहनत घेतली गेली. आमच्या कॉस्ट्युम डिझायनरने खास फ्लोर-लेंथ कॉटन ड्रेस तयार केले, जे जान्हवीच्या साधेपणाला उठाव देतात. तिचे पफ स्लीव्ह्स आणि खास ब्रेसलेट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल! मुलींना असे ड्रेसेस आवडतातच, आणि जान्हवीसाठी हे लुक्स घालायला मिळणं माझ्यासाठी आनंददायक आहे.”
जान्हवीच्या व्यक्तिरेखेतील खास पैलू जाणून घ्या!
जान्हवीच्या व्यक्तिरेखेत अजून किती बारकावे आहेत, ती तिच्या कुटुंबाशी कशी जुळवून घेते, आणि तिच्या प्रवासात पुढे काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी “लक्ष्मी निवास” दररोज रात्री ८ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर पाहायला विसरू नका!
