
मराठी चित्रपटसृष्टीत आशयसंपन्न उत्तमोत्तम चित्रपटांची परंपरा असली तरी, धडाकेबाज ॲक्शनपट तुलनेने कमीच बनतात. मात्र, ‘गौरीशंकर’ हा चित्रपट ही उणीव भरून काढणार आहे. नुकताच या चित्रपटाचा तुफान ॲक्शन आणि जबरदस्त संवादांनी भरलेला टीझर लाँच करण्यात आला आहे. चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
विशाल संपत निर्मित ‘गौरीशंकर’ – दमदार कथा आणि ऍक्शनचा मेळ!
मुव्हीरूट प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘गौरीशंकर’ या चित्रपटाची निर्मिती विशाल प्रदीप संपत यांनी केली आहे, तर ऑरेंज प्रॉडक्शन्स हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाच्या संकल्पना आणि दिग्दर्शनाची जबाबदारी हरेकृष्ण गौडा यांनी पार पाडली आहे.
चित्रपटात हरेकृष्ण गौडा, कविता वसानी, दक्षिणा राठोड, राहुल जगताप, सुशील भोसले आणि संकेत कोळंबकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ॲक्शन आणि भावनांचा सुरेख मेळ साधणाऱ्या या चित्रपटाला प्रशांत आणि निशांत यांचे संगीत, रोशन खडगी यांचे छायांकन, आणि संकेत कोळंबकर यांचे दमदार गीतलेखन लाभले आहे. अॅक्शन दिग्दर्शन राशिद मेहता यांचे असून, चित्रपटातील प्रत्येक ऍक्शन सिक्वेन्स थरारक आणि रोमांचकारी असणार आहे.
‘गौरीशंकर’ ची कथा – एक रांगडा नायक आणि त्याचा संघर्ष!

“प्रेमात हरला नाही, प्रतिशोधाने थांबला नाही – तोच आहे ‘गौरीशंकर'” ही चित्रपटाची टॅगलाईनच त्याच्या ॲक्शनपॅक्ड प्रवासाची झलक देते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये एका रांगड्या तरुणाची धडाकेबाज हाणामारी, त्याचे प्रखर डायलॉग्स, आणि त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची झलक पाहायला मिळते. “टेन्शन लेने का नाही, देने का!” असा दमदार संवाद ऐकताच प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढते!
मात्र, हा तरुण असा का आहे? त्याच्या संघर्षामागे कोणते कारण आहे? त्याच्या आयुष्यात प्रेम आणि प्रतिशोधाची भूमिका काय? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहावी लागेल.
२८ फेब्रुवारीला ‘गौरीशंकर’ घेऊन येतोय मराठीतील सर्वात मोठा ॲक्शनपट!
मराठीत ॲक्शनपटांची उणीव भरून काढणारा आणि नव्या पिढीच्या प्रेक्षकांसाठी धडाकेबाज मनोरंजनाची हमी देणारा ‘गौरीशंकर’ २८ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांत धडकणार आहे!
तुम्ही ॲक्शन, थरार, आणि दमदार संवादांनी भरलेला मराठी चित्रपट पाहण्यास उत्सुक असाल, तर हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे.
तेव्हा लक्षात ठेवा – ‘गौरीशंकर’ येतोय २८ फेब्रुवारीला!
