
‘सन मराठी’च्या कार्यक्रमाने १०० भाग पूर्ण केले, महिलांचा मिळाला जबरदस्त प्रतिसाद!
‘सन मराठी’वरील ‘सोहळा सख्यांचा’ या कार्यक्रमाने यशस्वीपणे १०० भाग पूर्ण केले असून, संपूर्ण महाराष्ट्रभर महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता आशिष पवार करत असून, कार्यक्रमाच्या अनोख्या संकल्पनेमुळे प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळतो आहे.
महिलांना विरंगुळा देणारा कार्यक्रम
रोजच्या धावपळीच्या जीवनात महिलांना आनंदाचे काही क्षण मिळावेत, त्यांना त्यांच्या आयुष्यातील आठवणी शेअर करता याव्यात, यासाठी ‘सन मराठी’ने ‘सोहळा सख्यांचा’ हा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाद्वारे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, त्यांच्या मनातील दुःख जाणून घेणे आणि माहेरच्या आठवणींना उजाळा देणे या गोष्टी मनोरंजक खेळांच्या माध्यमातून साध्य होत आहेत.
१०० भागांचा प्रवास – आशिष पवारचा भावनिक अनुभव
‘सोहळा सख्यांचा’ चे यशस्वी १०० भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सूत्रसंचालक आशिष पवार यांनी आपल्या प्रवासातील आठवणी शेअर केल्या.
“‘सोहळा सख्यांचा’ हा माझ्यासाठी एक वेगळा प्रवास आहे, कारण मी पहिल्यांदाच सूत्रसंचालन करत आहे. पहिल्या भागाच्या शूटिंगवेळी प्रचंड दडपण होतं, पण आता १०० भाग पूर्ण झाले आणि आनंद वाटतो की, आजपर्यंत २००० पेक्षा जास्त महिलांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचं कारण मी आहे. ‘सन मराठी’ने माझ्यावर विश्वास दाखवला आणि ही संधी दिली, त्यासाठी मी कायम ऋणी राहीन. या कार्यक्रमाचे निर्माते आणि दिग्दर्शक विनय नलावडे यांचा मला खूप पाठिंबा मिळतो आहे.”
“मी अभिनेता म्हणून बऱ्याचदा गंभीर भूमिका साकारल्या आहेत, पण प्रेक्षकांनी मला विनोदी भूमिकांसाठी जास्त पसंती दिली. मात्र, या कार्यक्रमाने मला महिलांचे केवळ मनोरंजन करण्याची संधी नाही दिली, तर त्यांच्या मनातील भावनाही समजून घेता आल्या. लोकांना रडवणं सोपं आहे, पण हसवणं खूप कठीण असतं, आणि ‘सोहळा सख्यांचा’ मध्ये हसवता-हसवता मी बऱ्याचदा स्वतः रडलो आहे.”
आईच्या शब्दांचा परिणाम आणि महिलांच्या कौतुकाने मिळणारी ऊर्जा
आशिष पवार पुढे म्हणाले,
“माझ्या स्वभावातील विनोदी बाजू माझ्या आईकडून आली आहे. ती हा कार्यक्रम पाहते आणि नेहमी माझं कौतुक करताना मला एक सल्ला देते – ‘महिलांना हसव, पण त्यांना रडवू नको.’ कार्यक्रमादरम्यान महिलांच्या गंमतीशीर आणि भावनिक गोष्टी ऐकताना अंगावर काटा येतो. कार्यक्रमानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून समाधान मिळतं.”
“या कार्यक्रमाचे शूटिंग तब्बल ३-४ तास चालते, पण तरीही महिला कंटाळत नाहीत. उलट घरी जाताना त्या स्वतःहून सांगतात – ‘आज आम्ही आमच्यासाठी जगलो, आणि तुमच्यामध्ये आम्हाला भाऊ दिसला.’ हे ऐकल्यावर पुढील भाग शूट करण्याची ऊर्जा मिळते.”
‘सोहळा सख्यांचा’ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा!
आशिष पवार यांनी शेवटी प्रेक्षकांना एक खास संदेश दिला –
“‘सोहळा सख्यांचा’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचावा, हे माझं स्वप्न आहे. त्यामुळे सर्व महिलांनी सोम-रवि संध्याकाळी ६:३० वाजता हा कार्यक्रम पाहावा आणि त्याचा आनंद घ्यावा!”
तेव्हा विसरू नका! बघत राहा ‘सोहळा सख्यांचा’ सोम-रवि संध्या ६:३० वाजता, फक्त ‘सन मराठी’वर!
