
सुमनचे डावपेच, मनोजच्या आयुष्यात आणणार वादळ?
मुंबई, ७ फेब्रुवारी २०२५ : कलर्स मराठीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेत वल्लरीच्या आयुष्यातील संकटं काही केल्या संपत नाहीत. तिच्या संसारात नव्या अडचणी निर्माण होत असतानाच, पिंगा गर्ल्स तिच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या आहेत.
सुमनने आता मनोजला आपलंस करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी ती अनेक कटकारस्थानं रचत आहे, मात्र मनोजचं वल्लरीवर जीवापाड प्रेम आहे. दुसरीकडे, मनोजची आई त्याला सतत सुमनसाठी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र मनोज आपल्या निर्णयावर ठाम आहे.
या संघर्षात इंदू सुमनचं मन बदलण्यात यशस्वी होते, आणि मनोजसमोर त्याच्या आईचं सत्य उघड होतं. त्यामुळे तो आईला वल्लरीची माफी मागायला लावतो. त्यानंतर मनोज आणि सुमन मुंबईत पिंगा गर्ल्सच्या घरी पोहोचतात, आणि त्यांना एकत्र पाहून सर्वजणी आश्चर्यचकित होतात.
पिंगा गर्ल्स करणार सुमनच्या डावांचा पर्दाफाश?

सुमनची उपस्थिती सर्वांना खटकत असते, त्यातच तिच्या वागणुकीतून तिचे डावपेच स्पष्ट दिसायला लागतात. मनोजचा उष्टा चहा पिणे, वल्लरीच्या हातावर गरम वरण सांडवणे, हे सर्व बघून पिंगा गर्ल्स संतापतात. त्यांना कळून चुकतं की सुमन वल्लरीच्या संसारात मिठाचा खडा टाकत आहे. प्रत्येक क्षणी सुमन मनोज आणि वल्लरीच्या मध्ये यायचा प्रयत्न करत आहे.
आता पिंगा गर्ल्स सुमनला चांगलाच धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत. त्या नक्की काय करणार? सुमनच्या या डावाला तोड कशी देणार? हे पाहणे खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे.
प्रेरणाला संकटातून बाहेर काढण्यासाठी पिंगा गर्ल्सचा नवा प्लॅन!

एका बाजूला पिंगा गर्ल्स वल्लरी आणि मनोजला पुन्हा जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे त्या प्रेरणासाठी देखील कंबर कसून उभ्या आहेत.
प्रेरणाच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आहेत, आणि तिचं मनोबल वाढवण्यासाठी पिंगा गर्ल्स एक पथनाट्य सादर करतात. वल्लरी प्रेरणाच्या आईशी बोलून त्यांच्या चुकीच्या वागण्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते.
सुमनला धडा शिकवण्याची वेळ!
सुमन मुंबईत मनोजसोबत आलेली असताना, पिंगा गर्ल्स तिचा खरा हेतू उघडकीस आणणार का? तिची रवानगी गावाकडे करण्यासाठी काय डाव आखणार?
या सगळ्या धक्कादायक घडामोडी पाहण्यासाठी पाहा ‘पिंगा गं पोरी पिंगा’ दररोज संध्या ७.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर!
