प्रेमाची जादुई सफर घडवणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…

या व्हॅलेंटाईनला होणार लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचा अनोखा संगम!

व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा उत्सव! आणि या खास दिवशी चित्रपटप्रेमींना एक अनोखी भेट मिळाली आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित झाली असून, एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने प्रेक्षकांसाठी हा खास रोमँटिक सरप्राईज दिला आहे.

प्रेम आणि नियतीचा खेळ – एका जादुई प्रवासाची सुरुवात

लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात असं म्हटलं जातं, पण जेव्हा प्रेम आणि नशीब नियतीच्या इशाऱ्यावर चालतं, तेव्हा काय घडू शकतं? हीच भन्नाट संकल्पना घेऊन ‘प्रेमाची गोष्ट २’ येत आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत झळकणार असून, त्याच्या जोडीला ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रिधिमाच्या भूमिकेबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

दिग्दर्शक सतीश राजवाडे – प्रेमकथांचा मास्टरस्ट्रोक

‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘ती सध्या काय करते’, ‘ऑटोग्राफ’ यांसारख्या सुपरहिट प्रेमकथा देणारे सतीश राजवाडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाविषयी ते सांगतात –

“प्रेमकथा या नेहमीच लोकांच्या मनात खोलवर घर करून जातात. ‘प्रेमाची गोष्ट २’ ही माझी सातवी प्रेमकथा असून, ही एक अत्याधुनिक प्रेमकहाणी आहे. या वेळी तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रेमाचा एक नवीन प्रवास उलगडणार आहे. व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी ही खास भेट देताना आनंद होत आहे. ललित, ऋचा आणि रिधिमाच्या केमिस्ट्रीमुळे हा चित्रपट अजूनच खास होईल.”

या चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया चित्रपटाविषयी सांगतात –

“आम्ही नेहमीच वेगळ्या संकल्पनांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करण्यावर भर दिला आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ ही अशाच एका नवीन प्रेमकथेची जादू घेऊन आली आहे. यामध्ये प्रेमाचा रंग आणखी गडद करणारा एक नवीन दृष्टीकोन आहे – तो म्हणजे प्रेम आणि व्हीएफएक्सचा संगम. ही प्रेमकथा प्रेक्षकांना नव्या युगातील प्रेमाचा अनुभव देईल.”

प्रेक्षकांची वाढती उत्सुकता – प्रेम आणि नियतीचा जादुई प्रवास

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे सहनिर्माते अमित भानुशाली असून, चित्रपट जून २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ललित प्रभाकरच्या प्रेमकहाणीची ही नवी झलक प्रेक्षकांसाठी एक खास अनुभव ठरणार आहे.

चित्रपटाच्या पहिल्या लूकनंतर, आता प्रेक्षक या जादुई प्रेमकथेची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेम आणि नशीबाच्या खेळात कोण जिंकणार? याचा थरार जून महिन्यात मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळेल!

Leave a comment