बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच, ७ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडणारा “स्थळ”

टीझर आणि गाण्याला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर बहुचर्चित “स्थळ” या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईतील लॉ कॉलेज येथे प्रदर्शित करण्यात आला. या विशेष सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर, तसेच चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लॉ कॉलेजमधील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील मुलीच्या लग्नाच्या प्रक्रियेसोबत येणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक संदर्भांवर भाष्य करणारी ही कथा प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरेल. विशेषतः अॅरेंज्ड मॅरेज या संकल्पनेभोवती फिरणारी ही कथा विदर्भातील ग्रामीण जीवन, त्यातील तरुणींची स्वप्ने, स्त्री सशक्तीकरण आणि प्रथा-परंपरांचे दर्शन घडवते.

गाण्यांपासून ट्रेलरपर्यंत उत्सुकता शिगेला

यापूर्वी प्रदर्शित झालेल्या “पाहुणे येत आहेत पोरी…” या गाण्याने आणि टीझरने प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले होते. आता चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाल्याने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. अनेक महोत्सवांमध्ये प्रशंसा मिळवलेल्या आणि पुरस्कारप्राप्त ठरलेल्या या चित्रपटाची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहत आहेत.

प्रभावी निर्मिती आणि दमदार कलाकार

सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे, तर जयंत दिगंबर सोमलकर, शेफाली भूषण, करण ग्रोवर आणि रिगा मल्होत्रा यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन जयंत दिगंबर सोमलकर यांनी केले आहे.

या चित्रपटात नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग धवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमाले, गौरी बदकी आणि मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा समावेश आहे.

महिला दिनानिमित्त विशेष प्रदर्शन

ग्रामीण भागातील एका तरुणीच्या लग्नाच्या प्रवासाची ही रंजक कथा महिला दिनाच्या औचित्याने, ७ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Leave a comment