१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाचा शुभारंभ

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. दीपप्रज्वलन आणि नटराज चरणी श्रीफळ वाहून या भव्य महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे, अभिनेते मोहन आगाशे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, तसेच कार्यकारिणी व नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते.

यावेळी नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे आणि शशी प्रभू यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. “मराठीसह विविध भाषिक नाटकांच्या दिग्दर्शकांचा या महोत्सवात सहभाग असणे, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे,” असे मत प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी व्यक्त केले.

भाषिक नाट्य महोत्सवाच्या संकल्पनेचं विशेष महत्त्व

या प्रसंगी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी नाट्यरसिकांसमोर आपली भावना व्यक्त केली. “मराठी नाटकाशी असलेलं माझं नातं नेहमीच जिव्हाळ्याचं राहिलं आहे. इतर क्षेत्रांमध्ये काम करताना मराठी नाट्यपरंपरेला मिळणारा मान आणि सन्मान पाहून मला नेहमी अभिमान वाटतो. रंगभूमीशी जोडलेलं नातं मी कायम जपणार,” असे त्या म्हणाल्या.

ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी आपल्या भाषणात मराठी व्यासपीठाबाहेर इतर भाषांमध्येही नाट्यसंस्कृती विकसित होण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, “अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या प्रयत्नांमुळे भाषिक नाट्य महोत्सवाची ही सुरुवात विशेष महत्त्वाची आहे. जग झपाट्याने बदलत असताना, मराठी रंगभूमीनेही नव्या विचारसरणीचा स्वीकार करावा. विविध भाषांतील नाट्यप्रयोगांमुळे एक वेगळा दृष्टिकोन तयार होईल, आणि यामुळे नव्या नाट्यसंस्कृतीचा विकास साधता येईल,” असे ते म्हणाले.

भारतीय भाषांमध्ये रंगणारा भव्य नाट्य महोत्सव

कार्यक्रमाच्या शेवटी नाट्य परिषदेचे सहकार्यवाह दिलीप कोरके यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि रसिकांचे आभार मानले. या महोत्सवाची सुरुवात ‘अक्षरिक (बंगला)’ अनीक थिएटर, कोलकता या नाटकाने झाली.

२० फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ दरम्यान यशवंत नाट्य मंदिर, जयश्री आणि जयंत साळगांवकर प्रायोगिक रंगमंच, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे हा विशेष नाट्य महोत्सव रंगणार आहे. यामध्ये बंगाली, तामिळ, इंग्रजी आणि मराठी अशा विविध भाषांतील नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

भारतीय रंगभूमीच्या विस्तारासाठी नवा उपक्रम

मराठी रंगभूमी विविध भाषांतील नाटकांसोबत संवाद साधत नव्या प्रेक्षकवर्गाला जोडण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. “संघटनेत विविध विचारधारांची माणसं एकत्र आल्यावरच बदल घडतात, आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या या प्रयत्नांमुळे हा बदल स्पष्टपणे दिसू लागला आहे,” असे वामन केंद्रे यांनी म्हटले.

मराठीसह विविध भाषांतील रंगभूमीला समृद्ध करणाऱ्या या ऐतिहासिक नाट्यमहोत्सवाला भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Leave a comment