
मराठी संगीत विश्वात एक आगळावेगळा प्रयोग म्हणून साईरत्न एंटरटेन्मेंटच्या ‘एक चांदण्याची रात’ या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. प्रेमकवी अपूर्व राजपूत यांच्या कवितेतून साकारलेलं हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील अनोळखी माणसांमध्येही नजरेतून उमटणाऱ्या भावना, निःशब्द प्रेम, आणि मनाला भिडणारा सुरेल अनुभव हे गाणं देत आहे.
कलाकार, संकल्पना आणि निर्मिती टीम

या गाण्यात विशाल राऊत, विपुल धवन, दीपिका, वैष्णवी सांगळे, गायत्री नेरपगारे, शिवा मिरजकर, संकेत पगारे, विनायक पाटील, सौरभ अहिर आणि अंजली सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गाण्याचे निर्माते सुरेश गाडेकर आणि संदेश गाडेकर, दिग्दर्शक मनीष महाजन, संगीतकार प्रज्वल यादव, आणि गायक जयदीप वैद्य व शीतल गद्रे यांनी या गाण्यात योगदान दिलं आहे.
प्रेमकवी अपूर्व राजपूत यांची अनोखी कवितेची शैली

“प्रेमातल्या विविध भावना वेगळ्या शब्दांत मांडायला मला आवडतं.” असं सांगत कवी आणि गीतकार अपूर्व राजपूत या गाण्याच्या जन्माविषयी सांगतात. “मी ग्रामीण भागातील असल्यामुळे गाण्याचा बाजही तसाच ठेवला आहे. चंद्राच्या सौंदर्यावरून आणि प्रिय व्यक्तीच्या सावळ्या रुपावरून काही सुंदर प्रतिकं मांडली आहेत— ‘चंद्र पांढरा पांढरा त्याला नाही तुझी सर, तुझा चेहरा सावळा त्यात तिळाची गं भर’ हे त्यातलंच एक उदाहरण!”
राजपूत यांच्या ‘अक्षर तुझे आहे’ या कवितांच्या कार्यक्रमामध्ये ही कविता सादर केली जात असे. सारंग पंपटवार यांनी या कवितेला चाल दिली होती, आणि ती प्रेक्षकांच्या मनाला भिडली. निर्माते सुरेश गाडेकर यांना कविता ऐकून ती गाणं म्हणून सादर करण्याची कल्पना सुचली आणि मग सुरू झाला हा सुंदर प्रवास.
नाशिकच्या जंगलात चांदण्यांच्या साक्षीने शूटिंग

या गाण्याच्या चित्रीकरणाविषयी निर्माते सुरेश गाडेकर सांगतात – “ही कविता ऐकताच ती मनाला भावली. त्यामुळे आम्ही रात्रीच्या वेळी नाशिकच्या जंगलात याचं शूटिंग केलं. एकाच रात्री हे संपूर्ण गाणं शूट करण्यात आलं आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीमुळे ते अत्यंत सुंदर साकारलं गेलं.”
संगीत, कथा आणि निसर्गरम्य लोकेशन्सची जुगलबंदी
‘एक चांदण्याची रात’ हे केवळ गाणं नाही, तर प्रेमाच्या विविध छटांचा अनुभव देणारं एक काव्यमय संकलन आहे. यामध्ये मधुर संगीत, सुंदर कथानक आणि रम्य लोकेशन्स यांचं मनोहर मिश्रण आहे.
मराठी संगीतविश्वातील हा अनोखा प्रयोग चुकवू नका!
या गाण्याला सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. तुम्हीही ही अनोखी काव्यात्मक संगीतमय सफर अनुभवण्यासाठी ‘एक चांदण्याची रात’ नक्की बघा आणि प्रेमाच्या दुनियेत हरवून जा!
