
‘सन मराठी’ वाहिनीवर संत सखूबाई यांच्या जीवनावर आधारित ‘सखा माझा पांडुरंग’ ही नवी मालिका येत्या १० मार्चपासून सोमवार ते रविवार सायंकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या मालिकेची पत्रकार परिषद कराडमधील संत सखूबाई मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडली.
प्रसिद्ध कलाकार आणि निर्मात्यांची विशेष उपस्थिती

या परिषदेत ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत नरोत्तम ही भूमिका साकारणारे अभिनेते सुनील तावडे, सखू ही भूमिका साकारणारी बालकलाकार स्वराली खोमणे, पांडू ही भूमिका साकारणारा बालकलाकार रेवांत काकडे, मालिकेचे प्रोड्युसर संगीत कुलकर्णी व रुची कुलकर्णी, लेखक प्रसाद ठोसर आणि ‘सन मराठी’ वाहिनीची टीम उपस्थित होती.
संत सखूबाई मंदिरात कलाकारांनी घेतली दर्शन आणि आरती
संपूर्ण महाराष्ट्रात महिला संत सखूबाईंचं एकमेव मंदिर हे कराड येथे आहे. या मंदिरात पोहोचताच कलाकारांनी संत सखूबाईंच्या मंदिराबद्दल माहिती जाणून घेतली आणि कलाकारांच्या हस्ते विठ्ठल-रुख्मिणीची आरती पार पडली.
प्रथमच पत्रकारांसाठी मालिकेचा विशेष भाग प्रदर्शित
या पत्रकार परिषदेत खास पत्रकार मंडळींसाठी ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला.
कराड नगरपरिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप
या निमित्ताने कराडच्या नगरपरिषदेच्या शाळेत ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेच्या टीमने विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करून सामाजिक उपक्रम राबवला.
मालिकेचे प्रोड्युसर संगीत कुलकर्णी सांगतात, “मालिका करताना अनेक कथानक डोळ्यासमोर असतात, पण आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे. कुठूनही विठ्ठलाचं नामस्मरण केलं की, विठुराया आपल्या मदतीला धावून येतोच. आजपर्यंत आपण कधी महिला संत सखूबाई यांच्याबद्दल फारसं ऐकलं नव्हतं. आताच्या पिढीला संतांबद्दल माहिती मिळावी हाच आमचा उद्देश आहे. ही मालिका फक्त वारकरी संप्रदाय नाही तर प्रत्येक प्रेक्षकाला आवडेल, ही खात्री आहे.”
नरोत्तम ही भूमिका साकारणारे अभिनेते सुनील तावडे सांगतात, “सर्वप्रथम ‘सन मराठी’ वाहिनी, मालिकेचे प्रोड्युसर संगीत कुलकर्णी, लेखक प्रसाद ठोसर यांचे मी मनापासून आभार मानतो. संत सखूबाई यांच्याबद्दल मला फारशी माहिती नव्हती, पण या मालिकेच्या माध्यमातून त्यांच्या महतीची जाणीव झाली. मालिकेचा पहिला भाग पाहताना मला स्वतःच्या भूमिकेचा खूप राग आला. पण नकारात्मक भूमिका साकारताना जर प्रेक्षकांना त्या पात्राचा राग आला, तर कलाकाराची मेहनत फळास लागते.”
🎬 ‘सखा माझा पांडुरंग’ ही ऐतिहासिक आणि आध्यात्मिक मालिका १० मार्चपासून सोमवार ते रविवार सायंकाळी ७.३० वाजता ‘सन मराठी’ वर प्रसारित होणार आहे. 📺✨
