अभिनेत्रींच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी

सन मराठी’ वरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. या वाहिनीच्या कथांमधून स्त्री सक्षम, खंबीर आणि आत्मनिर्भर असावी हा महत्त्वाचा संदेश दिला जातो. कोणतीही स्त्री असो – सामान्य महिला किंवा अभिनेत्री – संघर्ष हा तिच्या प्रवासाचा अविभाज्य भाग असतो. महिला दिनाच्या निमित्ताने, ‘सन मराठी’वरील अभिनेत्रींनी त्यांचं आयुष्य बदलणारा संघर्षमय क्षण उलगडला.

“मुलांसाठी खंबीर राहिले” – मुग्धा शहा

“‘नवी जन्मेन मी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मुग्धा शहा सांगतात,
“माझ्या मुलांमुळे माझं आयुष्य बदललं असं म्हणायला हरकत नाही. लग्नानंतर माझ्या नवऱ्याचा पगार अवघा ६५० रुपये होता. पुढे मुलांचं पालनपोषण करणे कठीण झाले. त्यामुळे मी १०० रुपयांचा पार्लरचा कोर्स केला, त्यानंतर पार्लरमध्ये काम केलं. त्याचबरोबर छोटी-मोठी कामं करत अखेर सिनेसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली.”

“मी जे हलाखीचे दिवस काढले, तसे मुलांनी जगू नयेत, हा निश्चय करून मी खंबीर उभी राहिले. आजही ते दिवस आठवले की अंगावर काटा येतो. स्त्रियांना मी एवढंच सांगेन – स्वतःसाठी जगायला विसरू नका!”

“एकटीच्या बळावर आयुष्य उभं केलं” – विद्या सावळे

“‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेतील ‘मम्मी’ ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री विद्या सावळे सांगतात,
“२००६ साली मी माझ्या नवऱ्यापासून विभक्त झाले आणि दोन मुलींचं संगोपन एकटीनं करण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात माझ्या आई-बाबांनी मला मोठी साथ दिली. २०१६ मध्ये माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि मालिकांमधून मला महत्त्वपूर्ण भूमिका मिळू लागल्या.”

“प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं, त्यामुळे माझं अस्तित्व घडू शकलं.* महिलांना मी एवढंच सांगेन – संघर्षाला घाबरू नका, खंबीरपणे समोर जा, यश नक्की मिळेल!”*

“नवऱ्याच्या निधनानंतरही खंबीर उभी राहिले” – सुरेखा कुडची

“‘जुळली गाठ गं’ या मालिकेत ‘दामिनी’ ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची सांगतात,
“१९९६ मध्ये मी कलाक्षेत्रात पाऊल ठेवलं. ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांच्यामुळे माझ्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं. मुख्य अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हाचा आनंद अविस्मरणीय होता. मात्र, त्यानंतर माझ्या आयुष्यात एक दुःखद घटना घडली – माझी मुलगी अवघी ३ वर्षांची असताना, नवऱ्याचं निधन झालं.”

“सासरची परिस्थिती बेताची होती, पण मी कधीही डगमगले नाही. आजही मी माझ्या ताकदीवर उभी आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. स्त्रियांना मी सांगू इच्छिते – संकटांपुढे हार मानू नका, आयुष्याशी दोन हात करा!”

संघर्षातून यशाच्या प्रवासाला गती देणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सलाम!

‘सन मराठी’च्या या अभिनेत्रींनी ज्या कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं, ते समस्त स्त्रीवर्गासाठी प्रेरणादायी आहे. महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवावा, कोणत्याही संकटात हार मानू नये, आणि नेहमी स्वतःच्या अस्तित्वाचा सन्मान करावा! 💪✨

Leave a comment