
झी स्टुडिओज आणि आटपाट निर्मित ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक अजरामर इतिहास रचला. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सशक्त दिग्दर्शनाखाली साकारलेली ही हृदयस्पर्शी प्रेमकथा केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. आता हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असून, २१ मार्चपासून ‘सैराट’ पुन्हा चित्रपटगृहांत प्रदर्शित होतो आहे.
१०० कोटींच्या पलीकडे गेलेली ऐतिहासिक कामगिरी
मराठी सिनेमाच्या इतिहासात १०० कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा ‘सैराट’ पहिला चित्रपट ठरला होता. त्याच्या यशामागे आर्ची आणि परश्या या गोंडस प्रेमकथेचा भावनिक ठाव, रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचा नैसर्गिक अभिनय आणि अजय-अतुल यांचं श्रवणीय संगीत हे सर्व घटक होते. आजही या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत आणि झी म्युझिकवर मोठ्या प्रमाणावर ऐकली जात आहेत.
नागराज मंजुळे यांचं मनोगत – “हा आनंद शब्दांत मावत नाही”
चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनाविषयी बोलताना दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, “सैराट करताना आम्ही फक्त प्रामाणिकपणे एक गोष्ट मांडली होती. याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, ही आमच्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे. आज पुन्हा एकदा हा अनुभव मिळतोय, यासाठी मी झी स्टुडिओजचे आभार मानतो.”
रिंकू राजगुरू – “सैराट माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग”
आर्चीच्या भूमिकेत झळकलेली रिंकू राजगुरू म्हणते, “या भूमिकेने मला ओळख दिलीच, पण प्रेक्षकांच्या हृदयात एक खास जागा दिली. सैराट पुन्हा प्रदर्शित होतोय याचा मला खूप अभिमान आहे.”
आकाश ठोसर – “परश्याच्या भूमिकेने आयुष्य बदललं”
परश्याची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आकाश ठोसर यासाठी ‘सैराट’ हा केवळ पहिला नव्हे तर आयुष्याला दिशा देणारा चित्रपट ठरला. “हा चित्रपट पुन्हा पाहता येणं म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा देणं आहे,” असं तो म्हणतो.
अजय-अतुल – “सैराटचं संगीत आजही काळावर अधिराज्य गाजवतं”
चित्रपटातील प्रत्येक गाणं आजही लोकांच्या मनात ताजं आहे. संगीतकार अजय-अतुल सांगतात, “कथानकामुळेच संगीतात ती ऊर्जा निर्माण झाली. पुन्हा एकदा तीच ऊर्जा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, याची आम्हाला खात्री आहे.”
झी स्टुडिओज – दर्जेदार कलाकृतींचं व्यासपीठ
झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवेलकर म्हणतात, “सैराट हा केवळ चित्रपट नाही तर एक भावनात्मक अनुभव आहे. आजही तो प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. त्याच्या पुनर्प्रदर्शनाला देखील तितकाच प्रतिसाद मिळेल, याची आम्हाला खात्री आहे.”
सैराट – पुन्हा एकदा तोच जिव्हाळा, तोच प्रेमभाव, तीच जादू
‘सैराट’च्या पुनर्प्रदर्शनामुळे जुन्या आठवणींना नवी झळाळी मिळणार आहे. आर्ची-परश्याची प्रेमकहाणी पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहताना प्रेक्षक भावूक होतील, हे नक्की. २१ मार्चपासून सैराट पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज आहे – एकदा पाहिलं असेल, तरी पुन्हा पाहावंसं वाटेल असं सच्चं प्रेमकथानक.
