अवघी दुमदुमली आळंदी

नभी फडकणारी भगवी पताका, मुखी “पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय” चा जयघोष आणि क्षणाक्षणाला वाढणारा भक्तिरस — अशा मंगलमय वातावरणात आळंदी पुन्हा एकदा संतस्मरणात रंगून गेली. निमित्त होतं ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या आगामी मराठी चित्रपटातील कलाकारांच्या आळंदी भेटीचं.

संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या साकार मूर्तीसारख्या प्रत्यक्ष कलाकारांनी जणू संत स्वरूपच धारण केल्याप्रमाणे दर्शन दिलं आणि उपस्थित भाविकांच्या मनात एक वेगळीच अनुभूती जागी झाली. “रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव” असं म्हणावं, असा तो क्षण होता.

संत मुक्ताई — अपूर्णत्वातून पूर्णत्वाकडे नेणारं जीवन

संत मुक्ताई हे मराठी संत परंपरेतील एक तेजस्वी आणि समृद्ध नाव. असामान्य बुद्धिमत्ता, आत्मिक प्रगल्भता आणि भक्तीयोगामध्ये मिळवलेलं उच्च स्थान यामुळे मुक्ताईचं जीवन हे स्त्री संत परंपरेतील एक प्रेरणास्रोत ठरतं. आपल्या भावंडांची धाकटी बहिण असूनही, मुक्ताईने वयाच्या सातव्या वर्षीच आईपण स्वीकारून ज्ञान, विरक्ती आणि करुणेचं मूर्तिमंत उदाहरण निर्माण केलं.

संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि मुक्ताई — या चारही भावंडांनी भक्ती, ज्ञान आणि मोक्ष यांचे आदर्श घालून दिले. मुक्ताईचा संयम, स्पष्टवक्तेपणा आणि प्रेमळ मार्गदर्शन हे आजही संतवाङ्मयात अमूल्य ठेवा मानले जाते.

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ — एक भव्य चित्रपट

या दैदीप्यमान संतचरित्रावर आधारित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. दिग्पाल लांजेकर लिखित व दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रेश्मा कुंदन थडानी यांनी केली असून प्रस्तुतकर्ता ए.ए. फिल्म्स ही प्रतिष्ठित वितरण संस्था आहे.

सशक्त कलाकारांचा समावेश

या चित्रपटात तेजस बर्वे संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर नेहा नाईक संत मुक्ताई साकारत आहे. अक्षय केळकर संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत आणि सूरज पारसनीस संत सोपानदेव साकारत आहेत. याशिवाय समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत शवेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे यांच्यासारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात विविध भूमिकांत झळकणार आहेत.

तांत्रिक बाजूंची समृद्ध मांडणी

संगीत दिग्दर्शन अवधूत गांधी आणि देवदत्त बाजी यांचं आहे. छायांकन संदीप शिंदे, संकलन सागर शिंदे आणि विनय शिंदे, तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज यांचं आहे. प्रथमेश अवसरे यांचं ड्रोन आणि स्थिरछायाचित्रण, रंगभूषा अतुल मस्के, वेशभूषा सौरभ कांबळे, नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर, ध्वनीआरेखन निखिल लांजेकर, पार्श्वसंगीत शंतनू पांडे, साहसदृश्ये बब्बू खन्ना यांनी सांभाळली आहेत.

सहनिर्माते — सनी बक्षी
कार्यकारी निर्मात्या — केतकी गद्रे अभ्यंकर

आळंदीच्या पवित्र वातावरणात अनुभवलेली ही क्षणिक अनुभूती, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या आगमनाची एक भावस्पर्शी नांदी ठरली. १८ एप्रिलपासून प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून संतांच्या चरित्ररूपी तेजाचे दर्शन घेता येणार आहे.

Leave a comment