
प्रत्येक सणाला खास स्वरूप देणाऱ्या मालिकांमध्ये यंदाची होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. विशेष म्हणजे, या सणाच्या पार्श्वभूमीवर मालिकांमध्ये रंगतदार वळणंही पाहायला मिळत आहेत. ‘सन मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिकांमध्ये रंगांचा जल्लोष आणि कथानकातील ट्विस्ट्स प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
मालिकांमध्ये रंगांची धमाल आणि कथानकातील ट्विस्ट
‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेत सत्या-मंजूच्या साखरपुड्यानंतर होळी पेटवताना अचानक काही गुंड मंजूला किडनॅप करतात. आता सत्या मंजूला शोधू शकेल का? याची उत्सुकता वाढली आहे.
‘जुळली गाठ गं’ मालिकेत होळीच्या निमित्ताने धैर्य-सावी एकत्र नारळ वाहतात. या प्रसंगातून त्यांच्या नात्यात प्रेमाचे सूर लागणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकेत भैरवी आणि अंजली मिळून सईविरुद्ध नवा डाव रचतात. एकंदरीतच सर्व मालिकांमध्ये होळीच्या सणात थरारक आणि भावनिक वळणं अनुभवायला मिळणार आहेत.
होळीच्या आठवणी आणि आत्ममंथन – स्नेहलता वसईकर

‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकेत भैरवी हे पात्र साकारणारी अभिनेत्री स्नेहलता वसईकर होळीच्या निमित्ताने आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत, यंदा स्वभावातील एक गोष्ट ‘दहन’ करण्याची इच्छा व्यक्त करते.
“लहानपणीच्या आठवणी म्हणजे आईच्या हातची पुरणपोळी व कटाची आमटी – ती माझ्या सगळ्यात आवडत्या गोष्टी. शाळेत डब्बा भरून पुरणपोळी नेणं, होळीच्या लाकडं गोळा करणं आणि रंगांची धमाल – हे सगळं अजूनही मनात ताजं आहे. मला माझा रोखठोक स्वभाव आवडतो. मी मनातलं ओठांवर आणते, हे माझं वैशिष्ट्य आहे, पण माझ्यातील एक गोष्ट आहे जी मी यंदा होळीत दहन करू इच्छिते. कुठलीही गोष्ट मी ठरवल्यावर अर्ध्यावरच शंका घेते की मी करू शकेन का? त्यामुळे निर्णय मागे घेण्याची सवय झाली आहे. पण आता मी ठरवलंय – ‘अशक्य असं काहीच नसतं’, हा विचार घेऊनच पुढे जायचं.”
ऐतिहासिक होळीचाही अनुभव
स्नेहलता पुढे सांगते की, “मी जेव्हा ऐतिहासिक मालिकेत काम करत होते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील होळी अनुभवली होती – ती होळी माझ्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण ठरली.”
सध्या ‘तुझी माझी जमली जोडी’ मालिकेच्या सेटवरही होळीचं चित्रीकरण सुरू असून वातावरण आनंदमय आहे.
होळीचा रंग आणि कथा ट्विस्ट यांचा अनोखा संगम प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे.
नवनवीन कथानक पाहण्यासाठी जरूर बघा – ‘तुझी माझी जमली जोडी’, सोमवार ते रविवार, रात्री १०:०० वाजता, आपल्या ‘सन मराठी’वर.
